पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए ) शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी येरवडा ते कात्रज हा २० किलोमीटर लांबीच्या बोगद्याचा प्रकल्प प्रस्तावित केला होता. हा बोगद्याचा प्रकल्प व्यवहार्य नसून, खर्चाच्या दृष्टीनेदेखील परवडणारा नसल्याने महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितले.
‘पुणे एकीकृत महानगर परिवहन प्राधिकरणा’च्या (पुम्टा) बैठकीत या प्रकल्पावर चर्चा झाली. त्यावेळी हा प्रकल्प महापालिकेला करणे शक्य नसल्याचे महापालिका आयुक्त राम यांनी सांगितले. त्यामुळे येरवडा ते कात्रज या बोगद्याची संकल्पना महापालिकेच्या पातळीवर गुंडाळण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
शहराचा उत्तर ते दक्षिण भाग जोडण्यासाठी येरवडा ते कात्रज असा बोगदा तयार करण्याचे नियोजन केले जात होते.
‘पीएमआरडीए’च्या ४ हजार ५०३ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकाला मान्यता देताना कात्रज ते येरवडा असा बोगदा करण्याचा प्रस्ताव मांडला होता. मुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस यांनीदेखील त्यावेळी या प्रकल्पाला मान्यता देत त्याचा अभ्यास करून सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या सूचना केल्या होत्या.
या प्रकल्पाचा अहवाल (डीपीआर) तयार करण्यासाठी ‘पीएमआरडीए’ने ‘मोनार्क’ नावाची एजन्सी नेमली आहे. ‘पुम्टा’च्या नुकत्याच झालेल्या बैठकीत ‘मोनार्क’ने दिलेल्या अहवालातील प्राथमिक बाबींवर चर्चा झाली. त्यामध्ये सुमारे १८ ते २० किलोमीटर लांबीच्या सहा लेनचे दोन बोगदे तयार करावे लागणार आहेत. या कामासाठी सुमारे ७ हजार ५०० कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याचे समोर आले. केवळ २० किलोमीटर रस्त्याच्या कामासाठी ७ हजार ५०० कोटी रुपये खर्च हा महापालिकेच्या दृष्टीने मोठा आहे. या रस्त्यावरुन धावणारी वाहनांची संख्या आणि प्रकल्प उभारण्यासाठी होणारा खर्च यामध्ये मोठी तफावत आहे.
महापालिका आयुक्त राम म्हणाले, ‘येरवडा ते कात्रज बोगदा तयार करण्याचा प्रकल्प व्यवहार्य नाही. ‘पुम्टा’च्या बैठकीतदेखील महापालिकेची भूमिका स्पष्ट करण्यात आली.’
आमदार रासनेंची संकल्पना कागदावरच?
शहरातील मध्यवर्ती भागात होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने यांनी शनिवारवाडा ते स्वारगेट आणि स्वारगेट ते शनिवारवाडा या दोन मार्गांवर बोगद्यांचा प्रकल्प करण्याचे जाहीर केले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाला (पीडब्ल्यूडी) या कामाचा अहवाल तयार करण्याचे आदेश दिले होते. मात्र हे काम शक्य नसल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाने महापालिकेला कळवले आहे.
या कामांसाठी अडीच ते तीन हजार कोटी रुपये खर्च येणार आहे. महापालिकेला एवढ्या मोठ्या प्रमाणात खर्च करणे अशक्य आहे. त्यामुळे येरवडा ते कात्रज बोगद्याच्या प्रकल्पाप्रमाणेच हे दोन्ही बोगद्यांची संकल्पना कागदावरच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.