Pune ZP School / पुणे : एकीकडे सरकारी शाळांविषयी अविश्वासाची, अनास्थेची भावना समाजात असताना, दुसरीकडे पुणे जिल्हा परिषदेची जालिंदरनगर प्राथमिक शाळेचा आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरव झाला आहे. दुर्गम भागात असलेल्या या शाळेला ‘वर्ल्ड बेस्ट स्कूल प्राईज – कम्युनिटी चॉइस अवॉर्ड’ हा पुरस्कार मिळाला असून, एका अर्थाने जिल्हा परिषद शाळेचे हे ‘सीमोल्लंघन’ ठरले आहे. तसेच या शाळेची कामगिरी राज्यातील अन्य जिल्हा परिषद शाळांसाठीही प्रेरणादायी ठरली आहे.
जालिंदरनगर प्राथमिक शाळा पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात आहे. जागतिक पातळीवर कार्यरत असलेल्या टीफोन या संस्थेच्या ‘वर्ल्ड बेस्ट स्कूल प्राईज’ या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सपोर्टिंग हेल्दी लाइव्ह्ज, इनोव्हेशन, एन्व्हायर्न्मेंटल ॲक्शन, ओव्हरकमिंग ॲडव्हर्सिटी, लोकसहभाग असे विभाग होते.
त्यात ‘लोकसहभाग’ विभागात जालिंदरनगर शाळेला जुलैमध्ये नामांकन जाहीर करण्यात आले होते. या नामांकनामुळे या शाळेचा जगातील सर्वोत्कृष्ट दहा शाळांमध्ये समावेश झाला होता. त्यानंतर नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात जालिंदरनगर शाळेला ‘कम्युनिटी चॉईस ॲवॉर्ड’ मिळाल्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे ही शाळा जगातील सर्वोत्कृष्ट शाळांपैकी एक ठरली आहे.
शाळेचे मुख्याध्यापक संदीप म्हसुगडे, राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षक दत्तात्रय वारे यांच्या प्रयत्नांनी शाळेचा कायापालट झाला आहे. पुरस्काराबाबत दत्तात्रय वारे म्हणाले, ‘एका सरकारी शाळेला आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार मिळणे ही फार महत्त्वाची घटना आहे. विद्यार्थी, पालक, शिक्षक, प्रशासन यांनी एक दिलाने, एका विचाराने काम केल्यास कायापालट घडू शकतो याचे जालिंदरनगर शाळा उदाहरण ठरली आहे.
विशेष म्हणजे जालिंदरनगर शाळा दुर्गम भागात आहे. त्यामुळे एका दुर्गम भागात आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा उभी राहू शकते, तर तशा शाळा राज्यातील, देशातील कोणत्याही गावात उभ्या राहू शकतात. सरकारी शाळांमध्ये उत्तम, आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मोफत मिळते हा विश्वास या पुरस्काराने निर्माण होऊ शकतो. या पुरस्कारासाठी आम्ही कारणीभूत ठरलो याचा आनंद आणि अभिमान आहे. तसेच भविष्यात आणखी चांगले काम करण्यासाठीची उमेद मिळाली आहे.
जालिंदरनगर शाळेला मिळालेला पुरस्कार नक्कीच महत्त्वाचा आहे. जिल्हा परिषदेतर्फे मॉडेल शाळा उपक्रम राबवण्यात येत आहे. त्यात या शाळेचाही समावेश आहे. शाळेतील शिक्षक दत्तात्रय वारे यांच्यासह अन्य शिक्षकांचे योगदान महत्त्वाचे आहेत. अत्यंत प्रयोगशील पद्धतीने शाळेत अध्ययन अध्यापन होते. ‘मॉडेल शाळा’ उपक्रमात दत्तात्रय वारे मार्गदर्शक शिक्षक आहेत. याच पद्धतीने जिल्हा परिषदेच्या अन्य शाळाही विकसित करण्यात येणार आहेत. त्यामुळे अन्य शाळांसाठी जालिंदरनगर शाळेला मिळालेला पुरस्कार प्रेरणादायी ठरणार आहे. – गजानन पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे जिल्हा परिषद.