Sabudana Makhane Ladu: शारदीय नवरात्रीचा उत्सव सध्या देशभर मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा होत आहे. या नऊ दिवसांत देवी दुर्गेच्या विविध रूपांची पूजा केली जाते. प्रत्येक ठिकाणी भक्ती, आराधना, जागरण आणि उत्सवाचे वातावरण दिसून येते. या काळात अनेक श्रद्धाळू उपवास धरतात. उपवास करताना आहाराकडे विशेष लक्ष द्यावे लागते. कारण- चुकीचे किंवा अपुरे खाल्ल्यास शरीरात कमजोरी येण्याचा धोका असतो. विशेषतः दिवसभर उपवास करूनसुद्धा घरातील दैनंदिन कामे, पूजा आणि सणासंबंधीची गडबड सांभाळताना शरीराला पुरेशी ऊर्जा मिळणे आवश्यक असते.
उपवासात बहुतेक वेळा लोक साबुदाणा, शेंगदाणे, मखाने, रताळे अशा पदार्थांचा आहारात वापर करतात. हे पदार्थ केवळ पोट भरणारेच नसून ऊर्जादायीदेखील असतात. त्यामध्ये प्रथिने, कार्बोहायड्रेट्स, कॅल्शियम, लोह यांसारखी पोषक द्रव्ये मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे उपवासातही शरीरातील ताकद आणि ताजेतवानेपणा टिकून राहतो. अशा वेळी जर तुम्हाला काहीतरी स्वादिष्ट, सोपे आणि पौष्टिक पदार्थ बनवायचा असेल, तर साबुदाणा-मखाना लाडू हा उत्तम पर्याय ठरू शकतो. हे लाडू केवळ उपवासातच खाण्यास योग्य आहेत, असे नव्हे, तर रोजच्या आहारात नाश्ता किंवा हलक्या जेवणासोबतही खाण्यास उपयुक्त आहेत.
साबुदाणा-मखाना लाडू बनविण्यासाठी लागणारे साहित्य
- १ कप साबुदाणा
- अर्धा कप मखाना
- अर्धा कप शेंगदाणे
- ४ मोठे चमचे तूप
- अर्धा कप गूळ
- काजू, बदाम, मनुका आवश्यकतेनुसार
साबुदाणा मखाना लाडू बनवण्याची कृती
स्टेप १
सर्वप्रथम पॅन गरम करून त्यात साबुदाणा आणि मखाना वेगवेगळे भाजून घ्या. ते हलके सोनेरी रंगाचे झाले की, गॅस बंद करा. पूर्णपणे थंड झाल्यावर मिक्सरमध्ये टाकून बारीक पूड करून घ्या.
स्टेप २
आता शेंगदाणे भाजून घ्या. त्यासाठी एका पॅनमध्ये थोडे तूप गरम करा आणि त्यात शेंगदाणे टाकून सोनेरी होईपर्यंत भाजा. दुसऱ्या पॅनमध्ये गूळ टाकून थोडे पाणी घाला आणि घट्ट पाक करून घ्या. पाक घट्ट झाला की, त्यात साबुदाणा-मखान्याची पूड टाका आणि चांगले ढवळा.
स्टेप ३
त्यानंतर त्यामध्ये भाजलेले शेंगदाणे, काजू, बदाम व मनुके घाला. सर्व मिश्रण छान एकत्र झाले की, गॅस बंद करा आणि ते थंड होऊ द्या. मिश्रण थंड झाल्यावर हाताने छोटे छोटे लाडू वळा.
साबुदाणा-मखाना लाडूचे फायदे
साबुदाणा सहज पचणारा असून, त्यामध्ये कार्बोहायड्रेट्स भरपूर प्रमाणात असतात. हे त्वरित ऊर्जा देतात आणि उपाशीपोटी खाल्ल्यास शरीराला थकवा जाणवत नाही. मखाना हा कॅल्शियम व प्रथिनांचा चांगला स्रोत आहे, ज्यामुळे हाडे मजबूत राहतात आणि पचनसंस्था चांगली राहते. शेंगदाणे आणि सुका मेवा यामध्ये हेल्दी फॅट्स व प्रथिने असतात, जे उपवासात ऊर्जा टिकवून ठेवतात. गुळामुळे रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी चांगली राहते, तर तुपामुळे चव वाढते आणि लाडू नरमसर होतात.