Navratri 2023: नवरात्रीनिमित्त नऊ दिवस उपवास असल्याने रोज काय बनवयाचे, असा प्रश्न अनेकांना पडतो. त्यात रोज साबुदाणा खिचडी, राजगिऱ्याचा लाडू, रताळे, बटाट्याचे वेफर्स, भगरीची भाकरी, असे तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो. त्यामुळे आम्ही तुम्हाला उपवासासाठी बटाट्यापासून बनवले जाणारे तीन वेगवेगळे पदार्थ सांगणार आहोत; जे तुम्ही नवरात्रीत उपवास असेल, तर नक्की आजमावून पाहा.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उपवासासाठी बटाट्यापासून बनवा ‘हे’ तीन पदार्थ

१) बटाट्याचा हलवा : उपवासाच्या दिवशी काहीतरी चटपटीत खावेसे वाटत असेल, तर तुम्ही बटाट्याचा हलवा बनवून खाऊ शकता. त्यासाठी आधी बटाटे उकडून, सोलून त्याचे तुकडे करून घ्या. आता कढईत तूप गरम करून, त्यात थोडे जिरे, हिरवी मिरची टाका. मग त्यात चिरलेला बटाटा घाला आणि नंतर ढवळत राहा. आता सैंधव मीठ टाका. वरून कोथिंबीर आणि भाजलेले शेंगदाणे घाला. अशा प्रकारे चवदार बटाट्याचा हलवा तयार आहे.

हेही वाचा – Navratri 2023: नवरात्रीनिमित्त यंदा मुंबईतील देवींच्या ‘या’ ९ प्रसिद्ध मंदिरांना नक्की भेट द्या!

२) बटाट्याचा गोड हलवा : उपवासाला तुम्ही बटाट्यापासून गोड हलवा बनवूनही खाऊ शकता. त्यासाठी बटाटे उक़डून, सोलून घ्या आणि नंतर ते बारीक मॅश करा. आता कढईत थोडे तूप घालून, खोबरे व चारोळी हलकेसे भाजून, एका प्लेटमध्ये काढा. आता कढईत तूप घाला आणि नंतर त्यात मॅश केलेले बटाटे घालून परतत राहा. बटाटे हलके तपकिरी होईपर्यंत शिजवा. त्यानंतर त्यात साखर आणि थोडी वेलची घाला. या मिश्रणाला हलकासा तपकिरी रंग आला की, त्यात भाजलेले खोबरे व चारोळी मिसळा. अशा प्रकारे बटाट्याचा गोड हलवा खाण्यासाठी तयार आहे.

३) दही बटाटा : उपवासाला तुम्ही तेल आणि तुपाचा वापर न करता, दही बटाटा बनवून खाऊ शकता. त्यासाठी घट्ट दही घेऊन, त्यात उकडलेले व चिरलेले बटाटे मिसळा. हवे असल्यास दही थोडे पातळ करूनही घेऊ शकता. आता त्यात सैंधव मीठ आणि भाजलेली जिरे पावडर घाला. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही त्यात हिरवी मिरची किंवा काळी मिरी पावडरही घालू शकता. अशा प्रकारे चविष्ट दही बटाट्याची डिश तयार आहे.

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shardiya navratri 2023 potato recipes for navratri fasting food for fast what eat in navratri fast sjr