सोनिया गांधी यांचे वडील कोणत्या पक्षाचे सदस्य होते याची उठाठेव किंवा नेहरू-पटेल यांचे कसे पटतच नव्हते, याची उगाळणी काँग्रेसच्या मुखपत्रातूनच होण्यामधून अख्ख्या पक्षाचीच डुलकी दिसते.. ही मते पुन:पुन्हा मांडू इच्छिणारा गट पक्षाला मात्र अज्ञातच असतो. आपला नेता कोण आणि आपण नक्की कोणाच्या तोंडाकडे पाहावयाचे हे कार्यकर्त्यांनाही कळेनासे झालेल्या पक्षात आणखी काय होणार?
कोणत्याही राजकीय पक्षासाठी सत्ता हे ध्येय असायला हवे हे मान्यच. परंतु फक्त सत्ता हेच राजकीय पक्षाच्या अस्तित्वाचे एकमेव कारण बनून राहिले तर सत्ता गेल्यावर असे राजकीय पक्ष वादळातल्या पाचोळ्यासारखे भरकटू लागतात. उदाहरणार्थ काँग्रेस. आपल्या स्थापना दिनाच्या मुहूर्तावरच या पक्षाला स्वगृहातून लत्ताप्रहार मिळाला असून जे झाले ते पाहता महात्मा गांधी यांचा काँग्रेस विसर्जति करा हा सल्ला किती शहाणपणाचा आणि दूरदृष्टीचा होता ते कळून यावे. या पक्षातर्फे ‘काँग्रेस दर्शन’ नावाचे मुखपत्र प्रसिद्ध केले जाते. महाराष्ट्र आणि मुंबई काँग्रेसतर्फे प्रकाशित होणाऱ्या या नियतकालिकाचे स्वरूप अन्य राजकीय पक्षांच्या मुखपत्रापेक्षा वेगळे नाही. आपापल्या पक्षाची ध्येयधोरणे जनसामान्यांपर्यंत नेण्याऐवजी आपली राजकीय पक्षांची मुखपत्रे आपापल्या नेत्यांची आरती करण्यात रममाण असतात. अशा मुखपत्रांचे संपादक हेदेखील उच्च दर्जाचे भाटच. आपले नेते किती थोर हे अखंडित सांगता येणे हीच या संपादकांची मातबरी. अशा पाश्र्वभूमीवर ‘काँग्रेस दर्शन’ या मुखपत्राने जे प्रसिद्ध केले ते सर्वार्थाने धक्कादायक म्हणावयास हवे.
काँग्रेसाध्यक्षा सोनिया गांधी यांचे तीर्थरूप हे इटलीतील कुख्यात अशा फॅसिस्ट संघटनेचे क्रियाशील सदस्य होते या नव्या तपशिलाचे दर्शन या मुखपत्रातून होते. त्याचप्रमाणे सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रे घेतली, त्या वेळी त्या पक्षाच्या सदस्य नव्हत्या. आधी त्या पक्षाध्यक्ष बनल्या आणि नंतर पक्ष सदस्य. यात जवळपास ६२ दिवसांचे अंतर होते, याचाही साक्षात्कार वाचकांना या काँग्रेसी मुखपत्रातून होतो. वस्तुत: २००४ साली सोनिया गांधी यांनाच सरकार स्थापन करावयाचे होते. परंतु ते त्यांना जमले नाही, ते का याचेही विवेचन हे काँग्रेसचे मुखपत्र करते. हे एवढेच नाही. तर भारताचे पहिले पंतप्रधान, काँग्रेसाध्यक्ष सोनिया गांधी यांचे आजेसासरे पंडित जवाहरलाल नेहरू यांचेदेखील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय राजकारणात कसे आणि काय काय चुकत गेले, याचा साद्यंत आढावा या मुखपत्रात आहे. पं. नेहरू यांनी पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांचे सल्ले मानले असते तर काश्मीर आणि चीनचा प्रश्न चिघळलाच नसता, असे या मुखपत्रातील लेखकाचे मत आहे. जम्मू-काश्मीरचा मुद्दा संयुक्त राष्ट्र संघासमोर नेणे ही पं. नेहरू यांची कल्पना. परंतु तसे करण्यास सरदार पटेल यांचा सक्त विरोध होता. भारताच्या पंतप्रधानांनी सरदार पटेल यांचे ऐकले असते तर आज हा प्रश्न अस्तित्वातच राहिला नसता, असे काँग्रेस मुखपत्रास वाटते. पंडित नेहरू यांनी सरदार पटेल यांना उपपंतप्रधान आणि गृहमंत्री केले खरे, परंतु तरीही या दोघांतील संबंध हे तणावपूर्ण होते अशी माहिती हे मुखपत्र देतेच. परंतु ती देता देता पं. नेहरू आणि सरदार पटेल या उभयतांनी एकमेकांच्या निषेधार्थ अनेकदा राजीनाम्याचे इशारे दिले होते, असाही गौप्यस्फोट या मुखपत्रात आहे. अशा तऱ्हेने काँग्रेसच्या या मुखपत्राने स्वपक्षाचे पुरते वस्त्रहरण केले आहे. शिवसेनेतून नावारूपाला आलेले आणि पुढे तेथे डाळ शिजेनाशी झाल्यावर काँग्रेसवासी झालेले तोंडाळ संजय निरुपम हे ‘काँग्रेस दर्शन’ या मुखपत्राचे संपादक आहेत. निरुपम यांचा लाचारी पत्रकारितेचा अनुभव दांडगा आहे. शिवसेनेत असताना निरुपम हे सेनेच्या िहदी मुखपत्राचे संपादक होते. ‘दोपहर का सामना’ हे त्याचे नाव. वास्तविक सेनेचा जन्म हा मराठी माणसाच्या उद्धारासाठी. तेव्हा त्यांना मुखपत्र िहदीतून काढावे असे का वाटले, हा प्रश्न आता विचारणे म्हणजे घोडा खालून निघून गेल्यावर टांग टाकण्यासारखे ठरेल. निरुपम तेथून काँग्रेसमध्ये आले, खासदार बनले आणि निवडणूक हरल्यानंतर पुन्हा संपादक बनले. उचलली जीभ लावली टाळ्याला असा त्यांचा स्वभाव. याहीआधी आपल्या वादग्रस्त विधानांनी त्यांनी अनेकदा आपल्या वाचाळतेचा अनुभव दिलेला आहे. सध्या निरुपम मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आहेत आणि एक वर्षभरावर आलेल्या मुंबई महापालिका निवडणुका हे त्यांच्यासाठी मोठे आव्हान आहे. त्यासाठी खटपटी लटपटी करण्यात ते मग्न असताना नेमके हे मुखपत्राचे प्रकरण घडले. आता ते निरुपम यांच्या चांगलेच अंगाशी येईल अशी लक्षणे दिसतात. या मुखपत्राचे संपादक असूनही जे काही छापून आले आहे त्याच्याशी माझा संबंध नाही, अशी साळसूद भूमिका निरुपम यांनी घेतली आहे. पण ती जनसामान्यांना सोडा, पण काँग्रेसच्या विख्यात श्रेष्ठींनाही पटण्याची शक्यता नाही. या दोन्ही लेखांचा लेखक अज्ञात आहे. म्हणजे त्यांची जबाबदारी संपादकावरच पडते. पण आपल्या संपादकत्वाखालील अंकात काय छापून येते हे पाहण्याची जबाबदारी त्यांची नसेल आणि ‘आओ जाओ घर तुम्हारा’ या उक्तीनुसार या मुखपत्रात काहीही छापून येत असेल तर त्यास मुदलात संपादकाची गरजच काय, असा प्रश्न पडतो.
वास्तविक परिस्थिती अशी की हा प्रश्न समग्र काँग्रेसलाच पडू शकतो. सत्ता गेल्यामुळे सरभर झालेले नेते, आपला नेता कोण आणि आपण नक्की कोणाच्या तोंडाकडे पाहावयाचे हे स्पष्ट नसल्यामुळे एकूणच गोंधळलेले कार्यकत्रे अशी या पक्षाची तूर्त अवस्था आहे. सोनिया गांधी की चि. राहुलबाबा याचा मुद्दा निकालात काढावयास पक्षाने बराच वेळ लावलेला असल्यामुळेही काँग्रेस हा दिशाहीन झालेला आहे. तेव्हा या मुखपत्रात जे काही छापून आले त्याचे वर्णन उपसंपादकाच्या नव्हे तर खुद्द संपादकाच्या डुलक्या असेच करावे लागेल. त्यासाठी कागदोपत्री निरुपम जबाबदार असले तरी समग्र पक्षालाच डुलकी लागलेली असल्याने हे असे झाले त्याचे आश्चर्य नाही. या अंकात जे काही छापून आले ते एक विशिष्ट विचारधारा मानणाऱ्यांचे जुने मत आहे. काहीही बोल पण रेटून बोल या गुणवैशिष्टय़ामुळे या मतांवर अनेक भाबडेजन विश्वास ठेवतात. पण पं. नेहरू आणि सरदार पटेल यांच्याबाबतची ही मते किती निराधार आहेत, हे अनेकांनी सोदाहरण स्पष्ट केलेले आहे. तरीही हीच मते वारंवार उच्चारली जातात आणि या वेळी तर ते काँग्रेसच्या मुखपत्रातही छापून आले. याचा अर्थ एवढाच की या मतधारकांची शिरकाव क्षमता किती प्रभावी आहे, हेच यातून दिसून येते. दुसरा मुद्दा सोनिया गांधी यांच्या वडिलांचा. वादासाठी ते फॅसिस्ट संघटना सदस्य होते हे जरी मान्य केले तरी त्यामुळे सोनिया गांधी कशा काय फॅसिस्ट ठरणार? संघाच्या वैचारिक मुशीतून कै. प्रमोद महाजन, कै. गोपीनाथ मुंडे असे अनेक नेते तयार झाले. पण म्हणून या नेत्यांची पुढची पिढीदेखील हा वारसा जोपासते असे म्हणता येईल काय? तेव्हा कोणाच्या तरी वडिलांनी काही तरी केले म्हणून मुलाबाळांकडे बोट दाखवणे हे ज्ञानेश्वरकालीन कृत्य झाले. ते ज्यांनी केले ते वैचारिकदृष्टय़ा किती मागास आहेत, तेच यातून दिसून येते. अर्थात या प्रसंगी हा मुद्दा नाही.
तो आहे काँग्रेसच्या एकूणच ढिल्या झालेल्या व्यवस्थेबद्दल. त्यातही कहर म्हणजे हा पक्ष १३१ वा वर्धापन दिन साजरा करीत असताना हा मुखपत्रीय हास्यास्पद प्रकार घडला. हे असे का होते याचे उत्तर काँग्रेसचे भावी पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्या वर्धापनदिनी युरोप दौऱ्यावर रवाना होण्याच्या कृतीतून दिसते. ज्यांच्या नावावर काँग्रेस पक्ष चालतो ते नेतेच असे खुशालचेंडू असतील तर मुखपत्रातूनसुद्धा हा असा मुखभंग होतच राहणार.