बिहारमधील जागावाटपावरून रालोआत वाद सुरू झाल्याने भाजपची डोकेदुखी वाढली आहे. मांझी हे पासवान यांना जास्त जागा दिल्याने नाराज आहेत. ती दूर करण्यासाठी काही जागा त्यांना वाढवून दिल्या जातील. नंतर हे सर्व नेते हातात हात घालून प्रचारात उतरले तरी त्याचा शेवटही अपेक्षेप्रमाणे असेलच असे नाही.
आपल्याकडे प्रत्येक निवडणुकीत दोन कंटाळवाणी दृश्ये हमखास दिसतात. एक म्हणजे निवडणूकपूर्व युत्या झाल्या की संबंधित पक्षांचे नेते एकमेकांना पेढे भरवतात आणि दुसरे म्हणजे ते भरवून झाले की अशा युतीच्या प्रचारसभांत सर्व नेते हातात हात गुंफवून वर करत जनतेस अभिवादन वगरे करतात. या दोन्ही दृश्यांत दोन गोष्टी हमखास उघडय़ा पडतात. हे युतीचे पेढे भरवून गोड तोंड केले जात असताना काही नेत्यांच्या चेहऱ्यावरचा कडवटपणा लपता लपत नाही आणि हात वर करून जनतेस अभिवादन करताना या नेत्यांची तुंदील पोटे त्यांच्या जाकिटांत मावता मावत नाहीत. निवडणुकोत्सुक पाटण्यात दोनच दिवसांपूर्वी यातील पहिला कार्यक्रम पार पडला. रामविलास पासवान ते अमित शहा व्हाया चि. चिराग पासवान ते अनंत कुमार या सगळ्यांनी एकमेकांना पेढे भरवले. यातील चि. चिराग याचा अपवाद वगळता सर्वानाच मधुमेहाने ग्रासलेले आहे. तेव्हा पेढय़ाचा जमेल तितका लहानसा कण तोंडात घेत मोठे हासू कॅमेराकांक्षी चेहऱ्यावर फुलवण्याची कसरत सगळे नेते जमेल तितक्या चोखपणे पार पाडताना दिसले. मात्र या पेढेभरवणीनंतर हात वर करून अभिवादन करण्यास काही काळ विलंब लागेल असे दिसते. याचे कारण झाले झाले असे सांगितले जात असले तरी जागावाटपांवर युतीतल्या संबंधित घटकांत न झालेले एकमत. ते यथावकाश होईलच. सत्तेच्या पेढय़ाने तोंड गोड करवून घेण्याची आस आणि गरज सर्वच पक्षांना असल्यामुळे हे निवडणूकपूर्व मतभेदही मिटतील आणि लवकरच सर्व जण आमच्यात मतभेद नाहीतच मुळी, ते मतभेद ही प्रसार माध्यमांची निर्मिती होती असे सांगत एकमेकांचे उमेदवार पाडण्याच्या नमित्तिक कामास लागतील. प्रत्येक निवडणुकीत असेच घडत असले तरी प्रत्येक निवडणुकीतून मिळणारा धडा मात्र निश्चितच प्रत्येक वेळी नवा असतो. दिल्ली विद्यापीठाच्या निवडणुकीने ते दाखवून दिले आहे.
दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघटनेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकांत भाजपचा महाविद्यालयीन अवतार असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने बाजी मारली. पण ते तितके महत्त्वाचे नाही. या निवडणुकांत अभाविप जिंकला यापेक्षा आम आदमी पक्षाची विद्यार्थी शाखा हरली, हे अधिक महत्त्वाचे आहे. याचे कारण दिल्ली विधानसभा निवडणुकांतील घवघवीत यशानंतर आपचे सर्वेसर्वा अरिवद केजरीवाल यांचा घोडा फारच उडत होता. तो या पराभवामुळे नुसताच जमिनीवर येईल असे नाही, तर तो बसेल. ही निवडणूक केजरीवाल यांनी अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. त्या पक्षाच्या छात्र युवा संघर्ष समिती या विद्यार्थी अंगाने मोठय़ा दणक्यात निवडणुकीत उडी घेतली होती. पारंपरिक पक्षांच्या विद्यार्थी शाखांना पर्याय म्हणून उभे राहण्याचा या संघटनेचा दावा होता. काँग्रेसप्रणीत नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया.. म्हणजे एनएसयूआय.. आणि भाजपप्रणीत अभाविप या दोघांनाही आपण बाजूला सारू असे या आपप्रणीत विद्यार्थी संघटनेस वाटत होते. ते सगळेच फोल ठरले. इतके की त्यांचा एकही उमेदवार या निवडणुकीत विजय मिळवू शकला नाही. या निवडणुकीसाठी आपने आपली सारी यंत्रणा कामाला लावली होती आणि दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल हे स्वत: प्रचाराच्या केंद्रस्थानी होते. ते सगळेच मुसळ अखेर केरात गेले आणि आप दणदणीत आपटला. अन्य कोणत्याही निवडणुकांतील पराभवापेक्षा विद्यार्थ्यांच्या हातून स्वीकारावा लागलेला पराभव आपच्या जिव्हारी लागणारा असेल. याचे कारण आप पक्ष म्हणून विद्यार्थ्यांमध्ये अत्यंत लोकप्रिय होता. आपमुळे प्रचलित राजकारणाची दिशा बदलेल असे वाटून विद्यार्थी प्रचंड संख्येने या नव्या पक्षाकडे आकृष्ट होत होते. परंतु आपल्या बिनबुडाच्या आणि बिनभरवशी राजकारणाने आप नेतृत्वाने, म्हणजेच केजरीवाल यांनी, या विद्यार्थी वर्गाचा स्वप्नभंग केला. त्याची शिक्षा त्यांना या निवडणुकीने दिली. जेथे हमखास विजयाची खात्री होती तेथे आपला दारुण पराभवास सामोरे जावे लागले.
या विजयी दाव्यांच्या पाश्र्वभूमीवर बिहारमधील निवडणुकीच्या रणदुंदुभी वाजू लागल्या आहेत. नितीशकुमार, लालूप्रसाद यादव आणि येऊन जाऊन असलेले मुलायमसिंह यादव यांच्या हातमिळवणीस भाजपने आपली समीकरणे जुळवली. कशीही पडली तरी पुन्हा बुडावर उभ्या राहणाऱ्या बाहुलीप्रमाणे असलेले रामविलास पासवान, अशीच दुसरी जडबुडाची बाहुली असलेले उपेंद्र कुशवाह यांची राष्ट्रीय लोकसमता पार्टी आणि भाजप यांची तिरंगी युती आहे. यातील भाजप वगळता अन्य पक्ष हे एकाच वेळी नितीशकुमार, लालू आणि काँग्रेस या आघाडीशीही चर्चा करीत होते. खुद्द नितीशकुमार यांच्या सरकारात भाजप सहभागी होता. म्हणजेच कोणत्याही पक्षाचे अन्य कोणत्याही पक्षाशी काहीही सोवळेओवळे नाही. परंतु भाजपच्या बरोबर राहिल्यास नरेंद्र मोदी यांच्या आश्रयाने सत्ता मिळण्याची अधिक संधी असल्याने ही मंडळी भाजपच्या शाखेत तूर्त वसतीस आहेत. शनिवारी त्यांनी एकत्र बठक घेऊन आपल्यात कसे एकमत झाले आहे, बिहारच्या विकासासाठी आम्ही कसे एकदिलाने काम करणार आहोत, नितीशकुमार आणि लालू यांची हातमिळवणी कशी संधिसाधू आहे आणि आमचे एकत्र येणे कसे तत्त्वाधिष्ठित आहे हे परस्परांना पेढे भरवत जाहीर केले. परंतु त्यांनी पेढे भरवल्याचा हात पुसून व्हायच्या आत त्यातील एकाने तोंडातील घास थुंकून दिला असून आपणासमोर नितीशकुमार यांच्या हातूनही पेढे खाण्याचा पर्याय उपलब्ध असल्याचे जाहीर करून अन्य पेढेभरल्या तोंडांची चांगलीच पंचाईत केली. हे असे करणारे नुसतेच दलित नाहीत तर महादलित असलेले जितराम मांझी हे असल्याने भाजप आघाडीत काहीसे तणावाचे वातावरण आहे. या मांझी यांना अर्थातच अधिक जागा हव्या आहेत. भाजपने रामविलास पासवान यांच्यासाठी ४१ जागा सोडल्या आणि मांझी यांची फक्त १३ जागांवर बोळवण केली. तेव्हा मांझी यांचा संताप साहजिक म्हणावा लागेल. निवडणुकीच्या जातपंचायत राजकारणात हा माजी मुख्यमंत्री असलेला महादलित नेता फुरंगटून बसल्याने भाजपची अडचण झाली अणि जागावाटप जाहीर होऊ शकले नाही. २८२ सदस्यांच्या बिहार विधानसभेत कुशवाह यांनाही भाजपने १३ जागाच दिल्या आहेत तर स्वत:कडे १६० जागांचा घसघशीत गुच्छ राखला आहे. मांझी आणि कुशवाह यांची एकमेकांच्या जागांविषयी तक्रार नाही. मांझी रागावलेत ते पासवान यांना इतक्या जागा दिल्याबद्दल. त्यांच्या मते पासवान हे कमअस्सल मागास आहेत आणि आपणच खरे दलित आहोत. पासवान यांच्यावर मांझी यांनी अलीकडेच जाहीर टीका करून त्यांच्या मागासतेस आव्हान दिले होते. तरीही हे सर्व एकमेकांना पेढे भरवण्यात आघाडीवर होते. आता या अडलेल्या मांझी यांच्यासाठी भाजप अतिरिक्त दोन-चार जागा सोडेल आणि मांझीदेखील आपण कसे नाराज नव्हतो असे सांगतील. त्यानंतर सगळेच गुंफवलेले हात वर करीत जनतेस अभिवादन करतील. येथपर्यंतचे सर्व जरी अपेक्षेप्रमाणेच घडत निवडणूक तयारीस सुरुवात झाली असली तरी त्याचा शेवटही अपेक्षेप्रमाणे असेलच असे नाही.
सध्या सूर्य आणि गुरू हे सिंह राशीत असल्याने नाशकात सिंहस्थ योग आहे. हे झाले धर्माचे. परंतु राजकारणातील सूर्य आणि गुरू हे बिहारच्या राशीकडे सरकत असल्याने तेथील कुंभ पाटण्यातील गंगाकिनारी भरेल. नाशकातील कुंभाप्रमाणेच बिहारातही विविध आखाडय़ांत त्याची जय्यत तयारी सुरू झाली असून ८ नोव्हेंबरास मतमोजणीने ही पर्वणी संपेल.