सुकुमार  शिदोरे  sukumarshidore@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रसंग, किस्से सांगता-सांगता कोबाड गांधी यांच्या या आत्मकथनातून त्यांच्या तात्त्विक, आध्यात्मिक भूमिकाही उलगडतात..

नक्षलवादी म्हणून दशकभर (२००९-२०१९) तुरुंगात राहावे लागलेले कोबाड गांधी यांचे आत्मकथन ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम- अ प्रिझन मेम्वार’  नुकतेच प्रकाशित झाले आहे. ते तुरुंगापर्यंत कसे आले, याची कहाणी त्यात येते. सधन पारशी कुटुंबात जन्म. वडील बहुराष्ट्रीय कंपनीत उच्चाधिकारी. डेहराडूनचे सुप्रसिद्ध ‘डून स्कूल’ व मुंबईचे सेंट झेवियर्स कॉलेज येथील शिक्षणानंतर चार्टर्ड अकौंटंट बनण्यासाठी १९६८ साली लंडनला प्रयाण. तेथील अभ्यासक्रमात चांगली प्रगती करीत असताना त्यांच्या सामाजिक जाणिवा जागरुक होतात. वेळात वेळ काढून ते इतिहासाचा तसेच मार्क्‍सवादाचा अभ्यास करतात.. या टप्प्यावरून हे पुस्तक सुरू होते.

स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिश राज्यकर्त्यांनी भारताची साधनसंपत्ती लुटली व भारतीयांवर जुलूम केले; पण  स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही जनतेच्या- विशेषत: शोषितांच्या- हालअपेष्टा चालूच राहिल्या. या दोन्ही विदारक पैलूंचे समाधानकारक स्पष्टीकरण त्यांना केवळ मार्क्‍सवादी विश्लेषणातच आढळून येते. त्यांची वैचारिक बैठक घडत असताना त्यांना राजकारणही खुणावत असते. नाक्यावरच्या एका वंशभेद-विरोधी सभेत ते भाषण देत असताना त्या सभेवर गोऱ्या वंशवाद्यांचे टोळके हल्ला करते. हल्लेखोरांना रोखण्याऐवजी सभेतील वक्त्यांनाच पोलीस पकडून घेऊन जातात. यथावकाश कोबाड यांच्यावरही  खटला चालतो. तीन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा ते भोगतात. १९७२ साली कोबाड गांधी मायदेशी परततात, ते एक तरुण मार्क्‍सवादी म्हणूनच. 

मुंबईत परतल्यावर सुरुवातीला एका नक्षल-प्रेरित युवक चळवळीत कोबाड सहभागी झाले.  अनुराधा शानबाग या एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये शिकलेल्या बुद्धिमान व बाणेदार कार्यकर्तीशी त्यांचा परिचय होणे व त्या दोघांनी एकाच काळात शोषितांसाठी कार्यारंभ करणे हा दोघांच्या आयुष्यांतील  महत्त्वाचा टप्पा. या काळात दोघे वरळीच्या मायानगर या दलित भागात प्रबोधनाच्या व संघटनात्मक उपक्रमांमध्ये कार्यरत झाले. तेव्हाचे कम्युनिस्ट जातीव्यवस्थेच्या कळीच्या समस्येपासून फटकून राहात असत; पण कोबाड व अनुराधा या दोघांचे ठाम मत होते की कम्युनिस्टानी मार्क्‍सवादी संघर्षांच्या समवेत जाती-निर्मूलनाचे कार्यही हमखास करायला हवे. म्हणून, ‘दलित पँथर’च्या प्रखर चळवळीतही कोबाड यांनी जोमाने सहभाग दिला. नंतर १९७५-७७ च्या आणीबाणीत नक्षलवाद्यांना गुप्तपणे आणीबाणी-विरोधी पोस्टर्स लावण्याव्यतिरिक्त फारसे काही करता आले नाही. आणीबाणी उठल्यानंतर १९७७ मध्ये कोबाड -अनुराधा यांनी  ‘लोकशाही अधिकार- रक्षण समिती’ च्या स्थापनेला व कार्याला हातभार लावला . या समितीचे अध्यक्ष विजय तेंडुलकर तर उपाध्यक्ष असगर अली इंजिनियर होते.

१९७७ मध्ये कोबाड- अनुराधा विवाह-बद्ध झाले. आता कोबाड यांच्या राजकीय व सामाजिक कार्याची व्याप्ति चांगलीच वाढली. आंध्र प्रदेशातून आलेला अनुभवी नक्षली कार्यकर्ता रवी आणि कोबाड यांनी महाराष्ट्रात नक्षली संघटन बनवण्याचे काम हाती घेतले. १९८२ मध्ये तृणमूल पातळीवर कार्य करण्याच्या हेतूने कोबाड-अनुराधा नागपूर शहरातील इंदोरा भागात स्थलांतरित झाले. नागपूर- भंडारा परिसरातील औद्योगिक व खाण कामगारांच्या तसेच चंद्रपूरनजीकच्या आदिवासीच्या संघर्षांत ते सहभागी झाले. अनुराधा यांनी नागपुरातील कॉलेजमध्ये अध्यापनाचे काम सुरु केले; पण त्याच काळात बस्तरमधील महिलांच्या चळवळीत आणि ‘क्रांतिकारी आदिवासी महिला संघटने’च्या उभारणीतही त्या कार्यरत राहिल्या. या आदिवासी महिलांचे प्रबोधन अत्यावश्यक होते. परिणामत: अनुराधांच्या कॉलेजमधील कामाला विराम मिळाला. कोबाड व अनुराधा यांची कार्यक्षेत्रे वेगवेगळी होती, हे कोबाड यांनी स्पष्ट केले आहे. अनुराधांच्या कार्याचा केंद्रबिंदू म्हणजे बस्तरच्या आदिवासींचे हितसंवर्धन आणि संघर्ष हा होता, तर कोबाड मुख्यत: नागपूर भागातील औद्योगिक कामगारांच्या लढय़ांमध्ये कार्यरत होते. अनुराधांनी प्रकृतीची तमा न बाळगता, स्वत:चे नाव बदलून बस्तरच्या जंगलांमधील आदिवासींसाठी काम केले. मुंबईला परतल्यानंतरही  २००८ साली प्रकृती खालावलेली असतांनाही माओवाद्यांचे वर्ग घेण्यासाठी अनुराधा  झारखंडमध्ये राहून आल्या; आणि त्याच वर्षी १२ एप्रिल रोजी मुंबईच्या रुग्णालयात त्यांचा मृत्यू ओढवला. कोबाड यांच्यावर वज्राघातच झाला .

या पार्श्वभूमीवर, एक मोठी घटना घडली. सप्टेंबर २००९ मध्ये कोबाड गांधींना दिल्लीमधून ‘यूएपीए’ अर्थात बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायदा या कठोर कायद्याखाली, नक्षलवादी कारवायांच्या आरोपांवरून अचानक अटक करण्यात आली. यापुढली सुमारे सात वर्षे त्यांनी दिल्लीतील तिहार जेलमधील अतिसुरक्षा कक्षात आणि नंतरची सुमारे तीन वर्षे वेगवेगळ्या ठिकाणांच्या तुरुंगांमध्ये व्यतीत केली. प्रत्येक ठिकाणी तेथील कोर्टात त्यांना जामीन घ्यावा लागला. अखेरीस ऑक्टोबर २०१९ मध्ये शेवटच्या सुरत कोर्टात जामीन मिळाल्यावर त्यांचा एक-दशकीय तुरुंगवास संपुष्टात आला. कोबाड यांनी पुस्तकातही आवर्जून सांगितले आहे की, त्यांच्यावरील माओवादी आरोप दिल्ली न्यायालयाने फेटाळून लावले आहेत. केवळ फसवणुकीच्या- नक्षलवादापेक्षा वेगळ्या- आरोपाबद्दल त्यांना दोषी ठरवण्यात आले होते. 

पाच राज्यांतील सात तुरुंगांमधील अनुभव, कार्यपद्धती, भेटलेल्या व्यक्ती, घडलेले प्रसंग आदींच्या तपशीलवार वर्णनांनी पुस्तक ओतप्रोत आहे. तिहार जेल सर्वात त्रासदायक होता. तुरुंगांच्या संवेदन-शून्य व्यवस्थेमुळे कोबाड यांचे हाल झाले, त्यांची प्रकृती ढासळली. मात्र, त्यांना कोठेही यातना देण्यात आल्या नाहीत. बहुतांश अधिकारी वा न्यायाधीशांबाबत त्यांचे अनुकूल मत दिसते. ते नक्षली असल्यामुळे त्यांच्याबद्दल सर्वत्र कुतुहूल दिसून आले. सगळीकडे बरे-वाईट अनुभव आले. उदाहरणार्थ, पतियाला येथील शीख धर्मीय सह-कैदीच नव्हे तर शीख वकील, न्यायाधीश आणि  पोलीस- कर्मचाऱ्यांमध्ये नक्षलवाद्यांब्द्द्ल आत्यंतिक आदराची भावना आढळून आली. याचे श्रेय मानवतावादी शीख धर्माला कोबाड देतात.  गुजरात व आंध्र/ तेलंगणामध्येही नक्षलीबद्दल आदर असल्याचे दिसून आले.  तिहार जेलमध्ये वेळोवेळी तेथे राहून गेलेल्या विविध व्यक्तींना कोबाड भेटू शकले. उदाहरणार्थ, विचारवंत सुधींद्र कुलकर्णीशी राजकीय मतांची देवाण-घेवाण करता आली तर काश्मिरी अफजल गुरुकडून सुफी विचारधारा जाणून घेता आली.  तुरुंगांत टाकलेले  इतर नक्षलवादी, राजकारणी पुरुष व गावगुंड यांचेहि  रसभरीत वर्णन पुस्तकात आहे.  तसेच, लेखकांनी प्रत्येक तुरुंगाच्या विविध पैलूंचे दर्शन वाचकाला घडवले आहे. उदाहरणार्थ, झारखंडच्या तुरुंगांचे व्यवस्थापन कैदीच करतात व त्यांना न्यायालयांपुढे केवळ व्हिडीओ- कॉन्फरन्सद्वारा हजर करण्यात येते अशा गोष्टी लेखकांच्या नजरेतून सुटलेल्या नाहीत. कारावासांतील शेवटच्या टप्प्यात झारखंडचा पोलीस-ताफा कोबाडना जेव्हा गुजरातेत नेतो , तेव्हा तेथे गुजरात पोलीसच उपलब्ध नसल्याने विनोदी प्रसंग घडतो, ते वर्णन मुळातच वाचले पाहिजे. समग्र  लिखाणाला नर्म विनोद व सौम्य उपरोध यांची रोचक झालर असल्याचे जाणवते. एका महत्त्वपूर्ण  प्रकरणात दीर्घ व जीवघेण्या कायदेशीर प्रक्रियेच्या तपशीलासह उद्बोधक भाष्यहि आहे.

नक्षलवाद्यांच्या हिंसाचारांबाबत नेहमीच तीव्र आक्षेप घेतला जातो. त्याला थोडक्यात उत्तर देताना लेखकांनी  माहिती-अधिकार क्षेत्रातल्या कार्यकर्त्यांच्या खुनांचे व  खाण-उद्योगातील माफियाने केलेल्या खुनांचे दाखले दिले आहेत. ‘अडीच लाख शेतकऱ्यांच्या आत्महत्या नि दररोज सात हजार उपासमारीचे बळी व हजारो हुंडा-बळी आणि हलाखीचे जिणे जगणारे कोटय़वधी गरीबकंगाल’ – या सर्वावर त्यांनी बोट ठेवले आहे. ‘मानवता-वादी उपायांच्या दिशेने सरकारी प्रयत्न होत नसतात’ असे त्यांचे मत आहे. (लेखकांनी ९ एप्रिल २०१२ ला गौतम वोहरांना लिहिलेल्या पत्राचा संपादित अंश. ) तरीही, नक्षली हिंसाचाराचे समर्थन कदापि होऊ शकत नाही.

गेल्या चाळीस वर्षांत देशाची सामाजिक व आर्थिक अधोगती झाली आहे, असे कोबाड दर्शवतात. ‘उदारीकरणाची ही फलश्रुती आहे. सामाजिक व्यवस्था अधिकाधिक अन्याय्य, मानवता-विरोधी, विषम आणि विनाशक होत चालली आहे. राजकीय वर्ग अधिकाधिक रांगडा, असंस्कृत आणि फॅसिस्ट होत चालला आहे-’  हे सांगणाऱ्या कोबाड यांचे नक्षलवादी कार्यदेखील फारसे पुढे गेलेले नाही.तिकडे जागतिक स्तरावर मार्क्‍सवादी शक्तींची पीछेहाट झाली आहे, तर देशात संसदीय मार्गाने जाणाऱ्या कम्युनिस्ट घटकांची वाटचाल खुंटली आहे. तथापि ‘ही भीषण परिस्थिती बदलण्यासाठी मार्क्‍सवादाचेच सहाय्य घ्यावे लागेल’ अशी कोबाड यांची ठाम धारणा आहे. मात्र तीन पूरक मुद्दय़ांचा त्यांनी पुरस्कार केला आहे. सर्वप्रथम, खरेखुरे व्यापक अर्थाचे स्वातंत्र्य आणि लोकशाही प्रस्थापित व्हायला हवी.  दुसरा मुद्दा म्हणजे आपण नवी मूल्ये अंगिकारली पाहिजेत, ज्यांच्यामध्ये पुरातन शिकवणी ( पंचतंत्र, जातक कथा, हितोपदेश), भक्ति परंपरा , कबीर, गुरु नानक , सुफी तत्त्वज्ञान आदींचा अंतर्भाव व्हायला हवा. आपले अंतिम उद्दिष्ट वैश्विक आनंद हे असले पाहिजे , हा तिसरा मुद्दा.  कोबाड गांधी यांचे विद्यमान परिस्थितीचे विेषण बरेचसे समर्पक आहे. मात्र, त्यांनी सुचवलेले पूरक मुद्दे वरकरणी आकर्षक वाटले तरी सद्य:स्थितीत ते फारसे व्यवहार्य नसून स्वप्नरंजनात्मक आहेत, असे म्हणावेसे वाटते. अर्थात त्यांचे विचारमंथन स्वागतार्ह नक्कीच आहे. त्यांच्या दुसऱ्या मुद्दय़ाविषयी त्यांच्याच नक्षल सहकाऱ्यांचे मतभेद असण्याची शक्यता आहेच.

 गांधी व शानबाग या दोन्ही परिवारांच्या प्रमुख सदस्यांची माहिती पुस्तकात दिलेली आहे. अनेक सह-नक्षल्यांच्या व्यतिरिक्त कला व साहित्य क्षेत्रातील नामवंतांचे व लेखकांच्या स्नेह्यांचे जागोजागी उल्लेख आहेत, त्यांच्यापैकी काहींची अवतरणे पुस्तकात वापरली आहेत.  तसेच वकिलांचेहि नामोल्लेख आहेत. सर्वच न्यायालयीन खटल्यांमध्ये कोबाड गांधींना उत्कृष्ट वकिली मदत मिळाली – आणि बहुतांश वकिलांनी त्यांच्यासाठी मोबदला न घेता काम केले.  या सर्वाच्या छायाचित्रांनी, या पुस्तकाची आठ पाने व्यापली आहेत. पुस्तकाचा आशय बहु-आयामी असल्यामुळे सूज्ञ वाचक त्याच्या वेगवेगळ्या पैलूंवर सखोल विचार करतील अशी आशा आहे.

‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम  ’

लेखक : कोबाड गांधी 

प्रकाशक :  रोली बुक्स प्रा. लि.

पृष्ठे : २९४ + ८ ;

किंमत  :  ५९५ रु.

मराठीतील सर्व बुकमार्क बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Review of book fractured freedom written by kobad ghandy zws
First published on: 04-12-2021 at 04:43 IST