आश्वासक, निखळ, शांतपणा; पण त्याला करारीपणाची धार असे अलीकडे दुर्मीळ होत जाणारे रसायन म्हणजे मीना चंदावरकर. कोकण, कोल्हापूर, पुणे या तेथील माणसांच्या स्वभाव वैशिष्टयांसाठी ओळखल्या जाणाऱ्या प्रदेशात मीनाताईंची जडणघडण झाली. त्यामुळे सर्व प्रकारच्या माणसांना सामावून घेणे आणि त्याच वेळी समोरच्याचे परिस्थितीचे भान जागृत ठेवणे यात त्यांची हातोटी होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

त्या मूळच्या कोकणातील पांगड्र या गावच्या. शालेय शिक्षण कोकणात आणि काही दिवस कोल्हापूर येथे झाल्यानंतर उच्चशिक्षणासाठी त्यांनी पुणे गाठले. पुण्यात स्त्रीचा बिनधास्तपणा हा अगोचरपणा समजला जाण्याचा तो काळ. घरच्या परिस्थितीमुळे शिक्षण सोडावे लागते की काय अशा स्थितीत नोकऱ्या, शिकवण्या, कष्ट करून आपलेच नाही तर पाठच्या भावंडांचेही शिक्षण त्यांनी पूर्ण केले. एखाद्या कृष्ण-धवल सिनेमात शोभावेत किंवा एखादे जीवनोपदेश करणारे पुस्तक भलते रंजक व्हावे अशा अनुभवांची पोतडी मीनाताईंकडे होती. मात्र, तरीही ‘सेल्फमेड’ असल्याचा अहंकार त्यांना कधी शिवला नाही किंवा त्यांनी आलेल्या अनुभवांचे भांडवलही कधी केले नाही. त्यातून अधिक ताशीव झाली ती त्यांच्यातील संवेदनशीलता. त्यामुळे राष्ट्रीय, बहुराष्ट्रीय कंपन्यांमधील नोकरीनंतरही त्या मानापासून स्थिरावल्या त्या शिक्षणक्षेत्रात. तब्बल ४० वर्षे त्यांनी शिक्षण क्षेत्रात केलेल्या कार्यामुळे शाळा म्हणजे तुरुंग आहे, असे वाटणाऱ्या अनेक कोवळया जिवांना त्यांनी आधार आणि दिशा दिली.

हेही वाचा >>> व्यक्तिवेध: जॉन बार्थ

एखाद्या मुलाला शाळा सोडावी लागणार म्हणून होणारे दु:ख मी सहज समजू शकते, असे सांगताना मीनाताईंची होणारी घालमेल अगदी त्यांना पहिल्यांदाच भेटणाऱ्या कुणालाही सहज जाणवून जायची. अभिनव विद्यालयाच्या मुख्याध्यापिका, न्यू इंडिया शाळेच्या संचालक म्हणून त्या कार्यरत होत्या. त्यापलीकडे जाऊन राज्यातील अनेक शाळांशी त्या जोडलेल्या होत्या. राज्याच्या शालेय शिक्षणाच्या पटलावर शाळेकडे मुलांना कसे वळवावे आणि कसे रुळवावे अशा मूलभूत प्रश्नाचे उत्तरही न मिळण्याच्या काळापासून ते अलीकडच्या शिक्षणशास्त्र, अध्यापनशास्त्रातील विविध मॉडेल्स, प्रयोग यांच्या बुजबुजाटात मूल आणि त्याचे शिकणे हा एकमेव केंद्रबिंदू मानून काम करणाऱ्या मीनाताई अनेक शाळांसाठी आधार होत्या. शिक्षणशास्त्र, अध्यापनशास्त्र, बालमानसशास्त्र यांची पुस्तकी प्रारूपे आणि प्रत्यक्ष मुलांबरोबर काम याची समतोल सांगड घालून त्यांनी अनेक प्रयोग केले. नैमित्तिक अभ्यासक्रम, कौशल्य शिक्षणाबरोबरच संगीत, कला या विषयांतील शिक्षण प्रत्येक मुलाला मिळालेच पाहिजे यासाठी त्या आग्रही होत्या. मातृभाषेतील शिक्षणासाठी आग्रही असतानाच इंग्रजीचे शिक्षणही तितकेच आवश्यक आहे, हे मत मांडतानाच इंग्रजी शिकणे, शिकवणे ही प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी त्या विशेष प्रयत्नशील होत्या. मूल शिकते म्हणजे काय? पुस्तकातील माहिती मुलांच्या डोक्यात कोंबण्याऐवजी मुले एखादी संकल्पना आपसूक, अनुभवातून कशी आत्मसात करतील? अशा अनेक विषयांतील त्यांची मांडणी ही अध्यापन क्षेत्रातील प्रत्येकीची शहाणीव वाढवणारी होती. मात्र मते ठाम असली तरी त्याचा दुराग्रह कधी नव्हता. एखाद्या शाळेतील एखादा प्रयोग यशस्वी झाला की तेच अंतिम सत्य असा गाजावाजा करून ते सार्वत्रिक करण्यासाठी आग्रह केला जाण्याच्या सध्याच्या काळात मीनाताईंचे वेगळेपण अधिक ठसठशीतपणे समोर येते.

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Educationist meena chandavarkar life journey zws