– सुचेता भिडे, मराठी विज्ञान परिषद
महाराष्ट्र आणि तेलंगण या दोन राज्यांमधल्या सीमावर्ती प्रदेशातला काही भाग प्राणहिता-गोदावरी खचदरीच्या (रिफ्ट व्हॅली) क्षेत्रात येतो. अर्थातच हा प्रदेश अंशत: महाराष्ट्रात, आणि अंशत: तेलंगणात येतो. प्राणहिता-गोदावरी खचदरीच्या क्षेत्रात गोड्या पाण्यात निर्माण झालेले काही पाषाणसमूह आढळतात. त्यातल्या खडकांमध्ये अनेक प्रकारच्या सजीवांचे जीवाश्म सापडतात. महाराष्ट्राच्या सीमेला अगदी लागून असणाऱ्या तेलंगण राज्याच्या काही क्षेत्रांत डायनोसॉरच्या ‘बरापासॉरस’ आणि ‘कोटासॉरस’ या दोन प्रजातींचे अवशेष गेल्या शतकाच्या उत्तरार्धात मिळाले होते.
या प्राणहिता-गोदावरी खचदरीच्या क्षेत्रातच गडचिरोली जिल्ह्यातला सिरोंचा तालुकाही येतो. सिरोंचा तालुक्यात वडदम हे एक अगदी छोटेसे गाव आहे. गर्द जंगलाने वेढलेल्या आणि कोणालाही माहिती नसणाऱ्या या गावाच्या आसपास सर्वेक्षण करत असताना २०१८ मध्ये काही वैज्ञानिकांना तिथल्या खडकांमध्ये जीवाश्मांचे जतन झाल्याचे कळले. डायनोसॉरवर्गीय सजीवांपैकी सॉरोपॉड गटातल्या काही सजीवांचे अवशेष तिथे आढळतात असे लक्षात आले. सॉरोपॉड गटातल्या डायनोसॉरांचे वैशिष्ट्य असे, की ते शाकाहारी होते. त्यांची मान आणि शेपटी लांब असे. चारी पाय वापरून ते चालत असत. आणि आकाराने ते अवाढव्य होते. पण शरीराच्या एकूण आकारमानांच्या तुलनेत त्यांचे डोके मात्र आकाराने फारच लहान होते.
याचबरोबर या परिसरात काही वनस्पतींचे जीवाश्मही मिळाले. भारतात अन्य ठिकाणी सापडतात, तसे इथेही हे अवशेष दोन वेगवेगळ्या कालखंडात विकसित झाले होते. त्यातला आधी, म्हणजे पर्मियन (२९.९ ते २५.२ कोटी वर्षांपूर्वी) कालखंडात विकसित झालेल्या वनस्पतीसमुदायाला ‘ग्लॉसॉप्टेरिस वनस्पतीसमुदाय’ म्हणतात. या समुदायात सर्वात प्रबळ असणाऱ्या प्रजातीचे नाव ग्लॉसॉप्टेरिस असल्याने, त्या समुदायाला ते नाव मिळाले आहे. यात जास्त करून नेचेवर्गीय वनस्पतींची (फर्न्स) संख्या जास्त आहे. सायकडवर्गीय आणि सूचिपर्णी वनस्पती आहेत. तथापि, त्या संख्येने अल्प आणि उत्क्रांतीच्या अगदी प्राथमिक अवस्थेतल्या आहेत.
दुसरा वनस्पतीसमुदाय जुरासिक (२०.१ ते १४.३ कोटी वर्षांपूर्वी) कालखंडात अस्तित्वात होता. या समुदायातल्या सर्वात प्रबळ प्रजातीचे नाव ‘टिलोफिलम’ असे आहे, म्हणून त्याला ‘टिलोफिलम वनस्पतीसमुदाय’ म्हणतात. याच वनस्पतीसमुदायातल्या वनस्पती हे सॉरोपॉड गटातल्या डायनोसॉरांचे अन्न होते.
याखेरीज इथे मानवाच्या पूर्वजांनी अश्मयुगात तयार केलेली दगडी हत्यारेही विपुल प्रमाणात सापडतात. या उद्यानाचे काही काम झाले असून उर्वरित काम सुरू आहे. हे उद्यान पर्यटनक्षेत्र म्हणून विकसित करण्याच्या दृष्टीने सरकारचे प्रयत्न सुरू आहेत.