अ‍ॅड. सविता अशोक प्रभुणे
मानसी चौधरी यांची ‘पिंक लीगल’ ही संस्था स्त्रियांच्या सबलीकरण आणि सक्षमीकरणासाठी काम करते. या कामाचा महत्त्वाचा भाग म्हणजे कायद्याच्या क्षेत्रात महिलांना कोणतीही अडचण आल्यास मदत करणारे पहिले डिजिटल कायदा-सल्ला व्यासपीठ. या संस्थेला संयुक्त राष्ट्रांनीही नावाजले आहे. मानसी चौधरी या स्वत: सर्वोच्च न्यायालय तसेच तेलंगणा उच्च न्यायालयात वकिली करतात. या मानसी चौधरी यांनी लिहिलेले ‘लीगली युअर्स- एव्हरी वुमन्स गाइड टु हर लीगल राइट्स’ हे पुस्तक दोन महिन्यांपूर्वी- ११ मे रोजी प्रकाशित झाले.

पुस्तकाच्या मुखपृष्ठावरच ज्येष्ठ वकील इंदिरा जयसिंग यांचे वाक्य आहे- स्त्री म्हणून तुम्हाला तुमचे हक्क माहीत असले पाहिजेत, कायदेशीर संकटे टाळता आली पाहिजेत, छळ आणि त्रासापासून स्वत:चा बचाव तुम्हाला करता यायला हवा. मालमत्ता हक्कांबाबत वाटाघाटी करता यायला हव्यात… तर तुम्ही स्वत:चे सबलीकरण आणि सक्षमीकरण करू शकता. जयसिंग यांनी व्यक्त केलेल्या या अपेक्षा पूर्ण करणारे हे पुस्तक आहे. ‘हे पुस्तक तुम्हाला व्याख्यान देत नाही, तर तुमची सतत पाठराखण करणाऱ्या एखाद्या मित्राप्रमाणे, समपातळीवरून तुमच्याशी बोलते’ हा नव्यनवेली नंदा यांचा याच पुस्तकाच्या मलपृष्ठावरील अभिप्रायही पटणारा आहे.

हे पुस्तक लिहिण्याची प्रेरणा मानसी चौधरी यांना स्वत:वरच गुदरलेल्या एका प्रसंगामुळे मिळाली. स्वत: वकील असूनदेखील पोलिसांकडे एक तक्रार दाखल करण्यासाठी तिला अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागले. वकील असलेल्या स्त्रीची आपल्या देशात जर ही कथा, तर सर्वसामान्य स्त्रियांना अनेक गोष्टी किती अवघड जात असतील, याचा विचार करून या पुस्तकाने आकार घेतला.

लेखिकेने जेव्हा ‘पिंक लीगल’ची स्थापना केली तेव्हा तिचा कयास असा होता की महिलांना सर्वात जास्त प्रश्न हे लैंगिक शोषण आणि लैंगिक हिंसाचाराबाबत भेडसावत असावेत. पण प्रत्यक्षात, सर्वात जास्त प्रश्न हे कौटुंबिक हिंसाचाराबाबत होते. बाहेरचे जग सोडा, जिथे स्त्रीला तिच्या घरीच असुरक्षिततेला सामोरे जावे लागत असेल; त्याबद्दल वाच्यता करायला, मन मोकळे करायला आणि प्रश्न विचारायला विश्वासाचे माणूस मिळणेही दुरापास्त असेल, तिथे अस्तित्वात असलेल्या कायद्याचा आधार घेण्यासाठीही किती वेळ लागत असेल. अशा प्रत्येक प्रश्नाची कायदेशीर बाजू नेमकी समजावून देणाऱ्या मार्गदर्शकाचे काम हे पुस्तक करते.

प्रस्तावनेत लेखिकेने हे पुस्तक का वाचावे याचे विवेचन केले आहे. एका छोट्याशा प्रश्नावलीनेच ती सुरुवात करते. या प्रश्नावलीची सर्व उत्तरे सामान्यजनांना देता येणार नाहीत, परंतु प्रत्येकाला यापैकी एक तरी- किंवा सर्वच- प्रश्न नक्कीच पडलेले असणार. वानगीदाखल- (१) तुमचा जोडीदार तुमचे खासगी फोटो समाजमाध्यमांत प्रसारित करण्याची धमकी देतो आहे, (२) तुमच्या मैत्रिणीचा घटस्फोट होतो आहे आणि तिला तिच्या मुलांचे हक्क अबाधित ठेवायचे आहेत, (३) तुम्हाला कोणाविरुद्ध तरी पोलिसांकडे तक्रार दाखल करायची आहे, (४) तुमच्या परिचित व्यक्तीला गर्भपात करायचा आहे, (४) तुमच्या मैत्रिणीला तिच्या नोकरीवरून, केवळ ती गरोदर आहे म्हणून काढून टाकणार आहेत- अशा परिस्थितीत तुम्ही काय कराल?

या आणि अशा सर्व प्रश्नांची उत्तरे हे पुस्तक तुम्हाला निश्चित मिळवून देते.

बऱ्याचदा आपल्याला आपलाच प्रश्न किती बावळट आहे असे वाटते आणि तो जर एखाद्या वकिलाला विचारला तर आपले हसे होईल का अशी भीती वाटते. बऱ्याचदा कायद्याची भाषा अवघड आणि किचकट, दुर्बोध वाटते. या सगळ्याच्या पलीकडे जाऊन हे पुस्तक ‘मित्र- तत्त्वज्ञ- वाटाड्या’ची भूमिका पार पाडते.

आपल्या आयुष्यात घडलेल्या घटना आपल्याला वाटते की केवळ आपल्याचबाबत घडल्या… म्हणून आपण त्याबद्दल वाच्यता केलेली नसते. आपल्याला भीती असते, लाज असते आणि ती घटना आपल्याच बाबतीत घडली म्हणजे आपल्यातच काहीतरी उणेपणा आहे, आपलीच काहीतरी चूक आहे असेही आपल्याला वाटते. उदाहरणादाखल लेखिका एका मुलीला, तिच्या आजोबांच्या वयाच्या नातेवाईकाकडून विनयभंगाला सामोरे जावे लागले ही घटना नमूद करते. त्या पीडितेने कायद्याच्या चौकटीत बसणाऱ्या कोणत्या गोष्टी कराव्यात हे लेखिका सांगतेच पण प्रत्यक्षात पीडितेने काय केले हेही विस्तृतपणे नमूद करते. अनेकदा त्या नातेवाईकाची इभ्रत हा त्या पीडित मुलीच्या घरच्यांचा प्रमुख काळजीचा विषय होतो. परंतु खरा काळजीचा विषय हा ती मुलगी- तिची मानसिकता- त्यावर उठलेले ओरखडे आणि ते बिनदिक्कत ओढणाऱ्या त्या नातेवाईकाचा खोटा, नकली चेहरा हा असायला हवा.

अशा प्रत्येक घटनेबाबत पीडितेला, जेव्हा घटना घडते तेव्हा जवळच्या व्यक्तीला विश्वासात घेऊन त्याबद्दल सांगावे, यासाठी लेखिका प्रोत्साहित करते. घटना घडत असताना तत्क्षणी आरडाओरडा करून, आसपासच्यांना हाका मारून मदतीसाठी धावा करण्यास उद्याुक्त करते आणि सरतेशेवटी शक्य तितक्या लवकर पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यास सांगते. बहुतांश वेळा ही चतु:सूत्री साधीसोपी भासली तरी घटना घडत असताना आपण इतके भांबावून जातो की हमखास हे सर्व विसरतो. तसे विसरू नका, लक्षात ठेवा, हे सकारण सांगणारे हे पुस्तक इतके विश्वासार्ह वाटते की, जगण्याच्या परीक्षेत गाइडप्रमाणे ते उपयोगी पडू शकेल.

पुस्तक एकदा वाचायला हाती घेतले की ते खाली ठेववत नाही. पुस्तक इंग्रजीत आहे पण लेखिकेने भाषा अतिशय सोपी आणि ओघवती वापरली आहे. सोपे, समजेल असे लिखाण – तेही कायद्यासारख्या कठीण परंतु अतिमहत्त्वाच्या विषयाबद्दल- करण्याचे आव्हान लेखिकेने लीलया पेलले आहे. कोणताही वकील वयाने लहान असो वा मोठा, एखाद्या विषयाचे आकलन हे बुद्धीवर अवलंबून असते. लेखिका वयाने लहान आहे पण तिला घटनांचे आकलन आहे, परिस्थितीचे भान आहे, वास्तवाची जाणीव आहे आणि कायदेशीर तरतुदी तसेच प्रक्रियांची माहिती आहे. लेखिका बहुश्रुत आहे, जागतिक पटलावर काय चालले आहे याबाबत ती सजग आहे. लिखाणातून दिसणाऱ्या या गुणांसाठी लेखिकेचे अभिनंदन करावे तितके थोडे ठरेल.

संपूर्ण पुस्तकभर वेगवेगळ्या चित्रपटांतली उदाहरणे वानगीदाखल देण्यात आली आहेत. चित्रपट हे लोकप्रिय आणि प्रभावी माध्यम असल्याने या उदाहरणांमुळे वाचकांना गोष्ट पटकन समजते आणि दृश्य माध्यमातून त्यांनी ती पाहिली असल्याने, तिच्याबद्दल मांडलेला मुद्दाही नेमका भिडतो. चित्रपटाचा अनुभव आणि संदर्भ निराळा, पण त्याकडे कायद्याच्या चौकटीतून पाहाताना याच परिस्थितीचा वेगळा परीघ वाचकांपर्यंत पोहोचतो. जिथे मुलाने मुलीच्या मागे लागणे, तिच्याकडे टक लावून पाहाणे इत्यादी गोष्टी या ‘प्रेमाच्या आर्जवाची प्रतीके’ मानल्या जातात, तशाच अर्थाने त्या गौरवल्याही गेल्या आहेत आणि तसे एखाद्या पुरुषाने वा मुलाने करण्यात काही गैर नाही हे चित्रपटांतून बिंबवण्यात येते, अशा समाजात याच प्रसंगांकडे कायद्याच्या नजरेतून पाहाणे गरजेचे ठरतेच. त्या मुलाची तीच कृती कायद्याच्या दृष्टीने गुन्ह्याच्या व्याख्येत कशी बसते, हे लेखिका अत्यंत रोचक पद्धतीने सांगते आणि मग रांझणा, दिल धडकने दो, थप्पड़, कबीर सिंग यांसारख्या चित्रपटांतील त्या प्रसंगांकडे आपण नव्या नजरेतून पाहातो. मग ‘थप्पड़’ आपल्याला जास्त आवडू लागतो.

सरोगसीबद्दल समजावून सांगताना लेखिका ‘चोरी चोरी चुपके चुपके’ चित्रपटाचे उदाहरण देते, तर इच्छापत्राबद्दल (विल) लिहिताना ‘३६ चायना टाउन’चे उदाहरण घेते. लैंगिक अत्याचार, सायबर गुन्हेगारी, कामाच्या ठिकाणी असलेले स्त्रियांचे हक्क, कौटुंबिक हिंसाचार, विवाहसंदर्भातील कायदा, घटस्फोटासंबंधातील कायदा, लिव्ह इन रिलेशनशिप, वारसा हक्क आणि स्त्रियांचे मालमत्ता हक्क, सरोगसी व गर्भपाताबद्दलचे कायदे, पोलीस तक्रार, कोर्टातील केस, अटक आणि जामीन यासंदर्भातील तरतुदी, जमिनीसंदर्भातील कायदे अशा अनेक महत्त्वाच्या बाबींना स्पर्श करणारे हे पुस्तक आहे. कायद्याविषयी सोप्या भाषेत सांगणारी जी काही मोजकीच पुस्तके आहेत त्यांपैकी हे पुस्तक अग्रणी ठरेल, असा विश्वास वाटतो. त्यामुळेच ते संग्रही असायला हवे.
अ‍ॅड. सविता अशोक प्रभुणे, अधिवक्ता, मुंबई उच्च न्यायालय
‘लीगली युअर्स’
●लेखिका व अनुवादक
●प्रकाशक : हार्पर कॉलिन्स
●पृष्ठे : ३५२ ●किंमत : ३९९ रु.