हा व्यर्थ भार विद्योचा?’ हे संपादकीय (२१ ऑक्टोबर) वाचले. अहमदाबाद येथील ‘नमस्ते ट्रम्प’ असो की ह्युस्टनमधील ‘हाऊडी मोदी’ हे सर्व दोन देशांतील संबंध वृद्धिंगत करण्यासाठी नव्हते तर दोन नेत्यांच्या प्रतिमा संवर्धनासाठी घडवण्यात आले होते.

विदेशनीतीच्या मर्यादा ओलांडून मोदी यांनी ‘अब की बार ट्रम्प सरकार’ची घोषणा दिली. परंतु डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा व्हाइट हाऊसमध्ये प्रवेश केला आणि विनाविलंब तथाकथित ‘फ्रेंड’ आणि ‘फ्रेंडशिप’ची कोंडी केली. भारतातील आणि अमेरिकेतील भक्त संप्रदायाचे जपजाप्य, प्रार्थना विचारात न घेता ट्रम्प यांनी टेरिफ, भारत – पाकिस्तान शस्त्रसंधीचे श्रेय, रशियाकडून तेल खरेदी आणि एचवनबी व्हिसाचे शुल्क असे एकापाठोपाठ एक भारतासाठी अडचणीचे निर्णय घेतले. ट्रम्प यांच्या भारतविरोधाची सुरुवात त्यांनी शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान मोदी यांना निमंत्रण दिले नाही तेव्हाच झाली होती. या सर्व विषयांवर भारत सरकारचे मौन अनाकलनीय आहे. ही सपशेल शरणागती ठरते. भारतीय वंशाचे अमेरिकी ट्रम्पविरोधी निदर्शनांत सहभागी होणार नाहीत, कारण तेथील अर्थार्जन आणि जीवनशैली मातृभूमीपेक्षा सरस आहे.-अॅड. वसंत नलावडेसातारा

पाकिस्तानबाबतच्या धोरणांत कमालीचा बदल

हा व्यर्थ भार विद्योचा…?’ हा अग्रलेख वाचला. आधीच्या कार्यकाळात पाकिस्तानविषयी सडेतोड भूमिका घेणारे ट्रम्प आता कमालीचे बदले आहेत. अमेरिकेचे पाकिस्तानशी वाढते संबंध डोकेदुखी वाढवणारे आहेत. आयात शुल्कावरून आधीच दुरावलेले भारत- अमेरिका संबंध अधिक तणाव निर्माण करतील. ‘ऑपरेशन सिंदूर’नतंर पाकिस्तान व अमेरिकेची जवळीक सातत्याने चर्चिली जात आहे. आज घडीला उत्पादन, व्यापार या क्षेत्रांत पाकिस्तान मागे आहे, हे जगजाहीर आहेच.

अमेरिका आणि पाकिस्तान यांच्या संबंधांना अनेक पैलू आहेत. भारतावर दबाब आणून आपले निर्यात धोरण स्वीकारण्यास भाग पाडणे हा त्यापैकी एक आहे. अमेरिकेचा अफगाणिस्तानातील बगराम एअरबेसवर डोळा आहे, मात्र तालिबानने तो देण्यास नकार दिला आहे. बगराम एअरबेस सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. आर्थिक दुष्टचक्राच्या गर्तेत सापडलेला पाकिस्तान क्रिप्टोकरन्सीचा आधार मिळावा यासाठी अमेरिकेकडे आशाळभूतपणे बघत आहे. पाकिस्तान व अमेरिकेतील संभाव्य दिलजमाई भारतासाठी धोक्याची आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडी पाहता अमेरिका नेहमीच दबाबतंत्राचा अवलंब करत आली आहे.- विनायक फडतरेपर्वती (पुणे)

सामंजस्यावर आधारित परराष्ट्र धोरण

हा व्यर्थ भार विद्योचा…?’ हा अग्रलेख वाचला. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची बेभान नकोशी विधाने सध्या भारतविरोधी भूमिका स्पष्ट दर्शवितात. आज जगभरातील नेत्यांकडून उत्तरदायित्व, संयम आणि सत्यनिष्ठा अपेक्षित आहे. ट्रम्प यांच्या वादग्रस्त आणि विभाजनकारी धोरणांमुळे अमेरिका आणि भारताच्या संबंधांवर दीर्घकालीन नकारात्मक परिणाम होऊ शकतात. भारतासारख्या उदयोन्मुख अर्थव्यवस्थेला सहकार्य आणि समन्वयाची गरज आहे, स्पर्धेची नव्हे. ट्रम्प यांच्या वक्तव्याने निर्माण झालेल्या चर्चेच्या वावटळीत भारत सरकारने संयम राखून मौन पाळले आहे. आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये प्रत्येक वक्तव्याचा परिणाम दूरगामी असतो. म्हणूनच, भारत सरकारची ही शांत भूमिका संवाद, स्थैर्य आणि सामंजस्यावर आधारित परराष्ट्र धोरणाचे प्रतिबिंब आहे.- प्रा. डॉ. योगेश खेडेकरबल्लारपूर

ते’ या फंदात पडणार नाहीत

हा व्यर्थ भार विद्योचा…?’ हे आजच्या संपादकीयाचे शीर्षक आणि ‘ही फसगत झाली तैशी’ हा शेवटी आलेला चरण यांचा संदर्भ अमेरिकेतील अनिवासी भारतीयांना पुढच्या अमेरिका वारीत प्रत्यक्ष विश्वगुरूंनीच समजावून सांगणे गरजेचे आहे. नाही तर त्यांना त्यातून काहीच कळणार नाही. ट्रम्प यांच्या विरोधात होणाऱ्या निदर्शनांत अमेरिकेत स्थायिक झालेले किंवा होण्याचा संकल्प करून तिथे गेलेले भारतीय पुरेशा प्रमाणात न दिसण्यात नवे काही नाही. ‘संधींचा देश’ अशी अमेरिकेची ख्याती आहे आणि आधी गेलेल्या अनिवासी भारतीयांच्या प्राप्तीविषयी तरुणांना त्यांच्या आई-वडिलांनी जे सांगितले ते खरे मानून ते मोठा आटापिटा करून तिथे गेले आहेत. त्यांनी ट्रम्प यांना ताळ्यावर आणण्याच्या फंदात पडावे ही अपेक्षा अवास्तव आहे.- गजानन गुर्जरपाध्येदहिसर (मुंबई)

दोन्ही देशांच्या मानसिकतेत फरक

हा व्यर्थ भार विद्योचा?’ हे संपादकीय वाचले. अमेरिका आणि भारतातील नेतृत्वाच्या लहरीपणात गुणात्मक फरक आहे असे दिसत नाही. बिनडोक विधाने करण्यात दोघेही पटाईत आहेत. फरक आहे तो अमेरिकी आणि भारतीय जनतेच्या मानसिकतेत. अमेरिकेला गेलेला भारतीय देशप्रेमी असला तरी धर्मवेडा आहे. आर्थिक बाबतीत भारताचा अपमान केला तर त्याला फारसे वाईट वाटत नाही. एखाद्या मंदिर किंवा मशिदीत अपवित्र वस्तू दिसली तर मात्र भारतातील हिंदू- मुस्लीम भेद विसरून रस्त्यावर उतरतील. पैसा कमावण्यासाठी जगणारी माणसे देशात राहिलीत काय आणि परदेशात गेलीत काय पैसा हेच त्यांचे सर्वस्व असते. जगण्यासाठी पैसा लागतो आणि तो मिळत असेल तर कसली लाचारी, कसला अपमान, कसली देशभक्ती आणि कसला राष्ट्राभिमान?- नंदन नांगरेनांदेड

शिंदेंना भयगंडाने ग्रासले असावे

राज्यात मनोमिलनाचे नाटक’ हे एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य (लोकसत्ता, २० ऑक्टोबर) वाचले आणि मनोरंजन झाले. अगदी काही दिवसांपूर्वीपर्यंत स्वत: शिंदे व त्यांचे मंत्री राज ठाकरेंच्या घराचे उंबरठे झिजवत होते, हे महाराष्ट्राने पाहिले आहे. त्या प्रयत्नांना अपयश आल्यावर दोन भाऊ एकत्र येणार म्हटल्यावर शिंदेंना नैराश्य आल्याचे दिसते. तसेच हे दोन्ही भाऊ एकत्र आल्यावर मराठी माणसांची साथ आपल्याला कितपत मिळेल या भयगंडाने त्यांना ग्रासले असावे असे वाटते. शिंदेंनी भाजपच्या सर्वोच्च नेत्यांच्या मेहेरबानीवर पक्ष व चिन्ह पदरात पाडून घेतले. त्याआधी २०२१ पूर्वी ते त्या पक्षाच्या अध्यक्षांच्या अवतीभवती फिरण्यात धन्यता मानत होते. तुम्ही जर मनात येईल तशा कोलांटउड्या मारू शकता तर इतर जे करतात त्याची खिल्ली कशाला उडवायची? शिंदेंनी अशी मुक्ताफळे उधळण्याऐवजी भाजपच्या कृपेने जे मिळाले आहे ते सांभाळण्याचा विचार व प्रयत्न करावा.-चंद्रशेखर खारकरठाणे

कंटेनर शिपिंग ही उत्तम संधी

‘‘कंटेनर शिपिंग’मध्ये भारत-उदय’ हा लेख (२१ ऑक्टोबर) वाचला. चीन, जपान, कोरिया यांना शह देता आला नाही तरी किमान जगात आपली ओळख निर्माण व्हावी, यासाठी हे महत्त्वाचे पाऊल ठरेल.

देशाला भलामोठा सागरी किनारा लाभला आहे. ‘कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’सारखी केंद्रीय आस्थापना आहे, लोहमार्ग व रस्त्यांचे उत्तम जाळे आहे, मनुष्यबळ आहे शिवाय ‘अमृतकाल व्हिजन २०४७’चे आपले उद्दिष्ट आहेच. सध्या ‘ट्रम्प डंखा’मुळे आपल्याला नवनवीन क्षितिजे पादाक्रांत करण्यास वाव मिळत आहे त्याचा फायदा जेवढा करून घेता येईल तेवढा घ्यावा. नवीन व्यापार पद्धती, नवे मित्र, नव्या नीती यांची जेवढ्या लवकर सांगड घालता येईल तेवढा आपल्या देशाला फायदा होईल. याचे नियोजन करताना नवीन कंटेनर टर्मिनल, बंदर विस्तार, कंटेनर जहाजांची बंदरावर अनुकूलता, गोदाम बांधणे, बंदरापासून अंतर्गत रस्ते बांधणी, लोहमार्गचे वाढीव जाळे व संबंधित क्षमता याचा अभ्यासपूर्ण विचार करून नियोजन केले तर नागरिकांना उत्तम वस्तू, कमी किमतीत व वेळेत उपलब्ध होतील. ट्रक वाहतुकीचा ताण कमी होईल. इंधनाची बचत होऊन पर्यावरणाचा समतोल साधला जाईल. अपघात कमी होतील, लाखो लोकांना रोजगार मिळेल. सकल राष्ट्रीय उत्पादनात वाढ होऊन दरडोई उत्पन्नही वाढू शकेल.-मिलिंद वराळेमुलुंड (मुंबई)