‘तेल तळतळाट’ हा अग्रलेख (२४ ऑक्टोबर) वाचला. अखेर अमेरिकेने रशियावर आर्थिक निर्बंध लावल्यामुळे खनिज तेलाचे रशियाकडून खरेदी करणे आपल्याला अवघड जाणार आहे आणि अर्थातच त्याचा फटका भारतासारख्या विकसनशील देशाला बसणार आहे. खनिज तेल हे आपल्या अर्थव्यवस्थेचे नाक आहे आणि ते अर्थातच आपल्या हातात नाही कारण खनिज तेलाबाबत आपण दुसऱ्यावर अवलंबून आहोत. एकूण खनिज तेलातील ८० टक्के खनिज तेल आपण आयात करतो ! ट्रम्प हे भलेही ‘भारताने रशियाकडून तेल खरेदी न करण्याचे आश्वासन दिले आहे’ असे म्हणत असले तरी आता भारताला कुठलाही पर्याय राहिलेला नाही. रशियावरील आर्थिक निर्बंधांमुळे भारताला रशियाकडून तेल खरेदी करता येणार नाहीये म्हणजे ट्रम्प यांनी रशियाच्या आडून भारताचेच नाक दाबण्याचा कट केला आहे हे यावरून स्पष्ट होते! म्हणजे अमेरिकेने भारताची चहुबाजूने आर्थिक कोंडी करण्याचे ठरविलेलेच दिसत आहे आणि याला भारताचे परराष्ट्र धोरण कारणीभूत आहे तसेच आपण ट्रम्प यांच्या चाली ओळखण्यास असमर्थ ठरलो आहोत असे म्हणावे लागेल!- अनिरुद्ध गणेश बर्वे, कल्याण

बंदी ही मागे घेण्यासाठीच?

आवाज फाउंडेशन शासनाकडून आवाज निर्बंधासाठी काही कारवाई होण्याची अपेक्षा ठेवत आहे याचे नवल वाटते. कारण…

१. पीओपीच्या गणेशमूर्तींवर बंदी आणल्याचे नाटक केले जाते. संबंधित व्यावसायिक ओरड करू लागतात, मग बंदी मागे.

२. पीओपीच्या खूप उंच मूर्ती नैसर्गिक स्राोतात विसर्जित करण्याच्या मनाईला विरोध, बंदी मागे.

३. मूर्तींची उंची कमी करण्याला विरोध, मनाई मागे.

४. मंडपासाठी खड्डे खणण्यावर दंड आकारण्याला विरोध, दंड आकारणी रद्द.

५. कबुतरखाने बंद करण्याला विरोध, पण कबूतरखाने बंद करण्याला धार्मिक विरोध, कबुतरखाने सुरू राहणार.

६. दहीहंडी, गोकुळकाला दरम्यान सर्वत्र कानठळ्या बसवणारे संगीत, तसेच लावण्या. लावणीसाठी हे निमित्त योग्य नाही.

७. नवरात्रीत दांडियाला रात्री १२ पर्यंत परवानगी. पण तो उशिरापर्यंत आणि प्रचंड मोठ्या आवाजात चालतो.

८. तीच गोष्ट फटाक्यांच्या आवाजावर आणि वाजविण्याच्या वेळेवर बंदी, पण ती धाब्यावर बसवली जाते.

९. बेकायदेशीर बांधकाम पाडण्याला विरोध, करा नियमित.

१०. मशिदीवरील भोग्यांना विरोध, नंतर परवानगी.

११. झोपड़पट्टी वाढू द्यायची, नंतर पुनर्वसन करायचे.- नीता शेरेदहिसर (पूर्व), मुंबई</p>

लोकशाही बाह्यरूपात राहू नये…

स्वत:ला मेंढरू म्हणून घडवताना…’ हा पंकज फणसे यांचा लेख (२२ ऑक्टो) वाचला. एकाच विचारसरणीचा, निष्ठावान समाज घडविण्यासाठी विचारपूर्वक आखलेल्या प्रयोगाचा आज आपण भाग बनलो आहोत. हजारो वर्षांचा विविधतेने भरलेला सांस्कृतिक वारसा हळूहळू एकसुरी, ठरावीक प्रतिमेत बदलण्याचा हा प्रयन, समाजातील नैसर्गिक भिन्नतेला आव्हान देत आहे.

परिणामी आज सत्य-असत्य, ज्ञान-अज्ञान, तर्क-अतर्क या सर्वांच्या सीमारेषा पुसट झाल्या आहेत. नवचिंतनाची जागा प्रचाराने व्यापल्याने सत्याच्या शोधाची गरजच संपली आहे. त्यामुळे, सत्याऐवजी निष्ठा हे मोजमापाचे एकक बनले आहे. एकाच विचारांचे प्रतिबिंब ऐकू येण्यासाठी माध्यमांवर संवादाऐवजी आरडाओरडा अधिक झाला आहे. विशिष्ट विचाराच्या प्रभावाखाली आलेल्या समाजाने प्रश्न विचारण्याची, सत्य पाहण्याची व ऐकण्याची वृत्ती गमावली आहे. विशिष्ट विचारसरणीसाठी सुरू असलेला हा अट्टहास केवळ राजकीय सत्तेसाठी नसून तो सांस्कृतिक आणि सामाजिक पुनर्रचनेचा प्रयोग आहे. या प्रक्रियेत आपला सामूहिक विवेक व विचारशक्ती कमकुवत झाली आहे. आपले वर्चस्व टिकविण्यासाठी नियंत्रण आणि भीती निर्माण करणे हे या प्रयोगाचे शस्त्र बनल्याने लोकशाही केवळ बाह्यरूपात शिल्लक राहण्याची भीती निर्माण झाली आहे.-हेमंत सदानंद पाटीलनालासोपारा

फटाक्यांवर पूर्ण बंदी हवी…

दिवाळीत दुर्घटनांची मालिका’ आणि ‘पावसामुळे मुंबईच्या हवेत सुधारणा’ या बातम्या वाचल्या. राज्यात दिवाळीतल्या फटाक्यांमुळे सलग तीन चार दिवस अनेक ठिकाणी आग लागणे, जीवितहानी, वित्तहानी आणि प्रदूषण पातळी अत्यंत खालावणे या आणि अशा अनेक घटना दरवर्षी घडतात. यावर कायमस्वरूपी उपाय म्हणजे फटाक्यांच्या वापरावर पूर्णपणे बंदी घातली पाहिजे. सण उत्सवात, निवडणुकांच्या मिरवणुकीत प्रदूषणकारी फटाके, कर्णकर्कश वाद्यो, प्रकाश किरणोत्सर्ग करणारे डीजेच्या वापरावर पूर्ण बंदी आणणारा कायदा करावा.- कबीर चंदनशिवेडोंबिवली