छे! छे! तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. महात्मा गांधींच्या बाबतीत विश्वगुरू जे बोलले ते खोटे नाहीच. तेच खरे व तेच सत्य. ॲटनबरोच्या चित्रपटाआधी गांधींना जग ओळखत नव्हते हे त्यांचे वाक्यसुद्धा वास्तववादी. गेल्या ७५ वर्षांत गांधींना आपण जगभर पोहचवू शकलो नाही ही त्यांची खंतही रास्तच. गांधींवरचा चित्रपट इंदिरा गांधींच्या कार्यकाळात प्रदर्शित झाला. त्याला सरकारने अर्थसाहाय्य पुरवले होते हा काँग्रेसने पसरवलेला भ्रम हो! तो दूर करण्याचे काम विश्वगुरूंच्या या वक्तव्याने केले. त्यामुळे कसलाही समज करून घेण्याआधी यावर विश्वास ठेवायलाच हवा.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> संविधानभान: मेरी मर्जी!

इंग्लंडमधून वकिलीची पदवी घेतल्यावर गांधी दक्षिण आफ्रिकेत गेले. तिथे वर्णद्वेषाविरुद्ध लढा उभारला. त्याने जगाचे लक्ष वेधले हे चूक. हा एक देश म्हणजे संपूर्ण जग असा समज तर अजिबात करून घ्यायचा नाही. कोण ओळखत होते तेव्हा या देशाला? आपल्यासारखीच ब्रिटिशांची वसाहत होती ती. गांधी तिथे असताना जोसेफ डोक नावाच्या लेखकाने त्यांच्या कार्यावर पुस्तक लिहिले. तेही कुणी वाचलेच नाही. आफ्रिकेच्या जनतेला गांधी समजले ते चित्रपटातून. तेही १९८२ साली. हाच तर्क विश्वगुरूंच्या या विधानामागे हे ध्यानात असू द्या. गांधी नावाचा हाडामांसाचा माणूस पृथ्वीतलावर होऊन गेला यावर भविष्यात जग विश्वास ठेवणार नाही असे अल्बर्ट आईनस्टाईन म्हणून गेला. तेही कितीतरी आधी. अशा वचनांची आठवण तर अजिबात नको. कोण हा आईनस्टाईन? मिळाले असेल की त्याला नोबेल. त्यात काय एवढे! याच भावनेतून विश्वगुरू बोलले. शेवटी काहीही झाले तरी ते अविनाशी, अवतारी पुरुष. त्यामुळे त्यांचेच म्हणणे ग्राह्य धरायला हवे.

अमेरिकन व फ्रेंच राज्यक्रांती आणि गांधींच्या नेतृत्वातला स्वातंत्र्यलढा या जगभरातील विद्यापीठात शिकवल्या जाणाऱ्या इतिहासाची आठवण तर आता नकोच. एंटायर पोलिटिकल सायन्समध्ये हा इतिहास नव्हता त्यासाठी विश्वगुरूंना कसे दोषी ठरवणार? प्रख्यात फ्रेंच नाटककार रोमा रोला गांधींमुळे प्रभावित झाले होते. त्यांनी त्यावर एक पुस्तकही लिहिले. याचेही स्मरण नको. एक नाटककार म्हणजे सगळे जग असा अर्थ काढायची काहीएक आवश्यकता नाही. त्यामुळे केवळ फ्रेंचच नाही तर साऱ्या युरोपला गांधी ठाऊक झाले ते चित्रपटामुळे. म्हणून विश्वगुरू म्हणतात तेच योग्य. मार्टिन ल्युथर किंग, नेल्सन मंडेला यांच्या चळवळी व लढे गांधी विचाराने प्रभावित होते. गांधी हे त्यांचे आदर्श होते या इतिहासाची आठवण काढायची गरज नाही. हा डाव्यांनी, समाजवाद्यांनी पेरलेला इतिहास. तो पुसून टाकायच्या इराद्यानेच विश्वगुरू बोलले. जगभरातील एकही देश असा नसेल जिथे गांधींचा पुतळा नसेल, त्यांच्या विचारांवर चालणारे एखादे केंद्र वा संस्था नसेल असा युक्तिवाद आता करायचा नाही. तो खरा ठरला २०१४ नंतर. म्हणजे विश्वगुरूंच्या जगभरातील दौऱ्यानंतर. त्याआधीची ६५ वर्षे यातले काहीच अस्तित्वात नव्हते हेच विश्वगुरूंना सांगायचे होते. ते हेसुद्धा म्हणाले की सर्व समस्यांचे मूळ गांधी विचारांत आहे. यावर इतिहास ठाऊक नसण्याची व वैचारिक अपंगत्वाची समस्या सोडवण्याची ताकद गांधी विचारांत आहे का असला विनोदी प्रश्न तर विचारायचाच नाही. अन्यथा त्याची गंभीर दखल घेतली जाईल.

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta satire article on pm modi remark on mahatma gandhi zws