‘ते’ सत्तेत आले तर देशातील बहुसंख्याकांना दुय्यम नागरिकाचा दर्जा मिळेल ही विश्वगुरूंची प्रचारसभेतील भविष्यवाणी ऐकताच काँग्रेस मुख्यालयातील धोरण समितीची सभा तातडीने बोलावली गेली. त्यात ठरवण्यात आलेला दुय्यम नागरिकत्वासंबंधीचा मसुदा खालीलप्रमाणे होता. (१) एखाद्या श्रद्धेय व्यक्तिमत्त्वाची जाहीर सभा उन्हात होत असेल तर तब्येत खराब होऊ नये म्हणून पाण्याची बाटली, जेवणाची शिदोरी, ग्लुकोज पावडर, उन्हापासून बचाव करणारी छत्री प्रत्येकाने सोबत ठेवावी. हे न करता त्रास झाला म्हणून आयोजकांची तक्रार करणाऱ्याला दुय्यम नागरिक ठरवले जाईल.

(२) वर्दळीच्या रस्त्यावरचा एखादा जाहिरात फलक वाऱ्याने हलतोय असे लक्षात येताच त्याची तक्रार करत यंत्रणेला त्रास देण्यापेक्षा त्या फलकापासून दूर उभे राहावे. इतर कुणी उभे राहिल्यास त्यांना धोक्याची जाणीव करून देण्याची काही आवश्यकता नाही. नाही तर तुम्ही दुय्यम ठराल.

(३) ‘गेमिंग झोन’मध्ये मुलांना घेऊन जाताना तिथे संकटकालीन गमन मार्ग आहे की नाही याची चौकशी करू नये व मालकाशी वाद घालून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू नये, अन्यथा…

(४) प्रसूती वा अन्य कारणांसाठी रुग्णालयात दाखल होताना ‘फायर एग्झिट’ कुठे याची चौकशी करून व्यवस्थापनाला अकारण त्रास देऊ नये. आग लागलीच तर आरडाओरडा न करता रुग्णाला घेऊन बाहेर पडण्याची तयारी ठेवावी. नाही तर…

(५) जोखमीच्या ठिकाणी नोकरी करताना संकटसमयीच्या उपाययोजना नाहीत म्हणून आंदोलन करता येणार नाही. तसे केले तर दुय्यम ठरवण्यासोबत नोकरीतून काढले जाईल.

हेही वाचा >>> लालकिल्ला: ‘ब्रॅण्ड मोदी’चे काय होणार?

(६) विषारी दारूने बळी गेले तर व्यवस्थेवर दोषारोपण करता येणार नाही. आपण चांगली दारू पिऊ शकत नाही हा आपला दोष आहे असे समजून आत्मपरीक्षण करावे. तसे केले नाही तर…

(७) तुमच्या रोजच्या रस्त्यावर ‘मॅनहोल’चे झाकण नसेल तर त्याला वळसा घालून चालायचे कसे याचा सराव करून घेतला तर उत्तम. फोन करून यंत्रणांवरील ताण वाढवला तर तुम्हाला…

(८) एखादी कार भरधाव जात असेल तर त्याला तत्परतेने वाट मोकळी करून द्यावी. त्या चालकाची चूक समाजाच्या लक्षात आणून देण्याकरिता स्वत:चा जीव धोक्यात घालू नये. तुमचा जीव गेला तर तुम्हाला मरणोपरांत दुय्यम नागरिक ठरवले जाईल.

हेही वाचा >>> अन्वयार्थ: ..तर तैवानचा ‘युक्रेन’ होईल?

(९) पावसाळी व वादळी वातावरणात सकाळी फिरायला जाण्याची हौस भागवून घ्यायची असेल तर हलणारी झाडे व रस्ता या दोन्हीकडे नजर ठेवून चालण्याचे कसब शिकून घ्यावे. नाही तर…

(१०) या दुय्यम नागरिक धोरणाला कोणीही नकारात्मक समजू नये. कोणतीही तक्रार न करता, सारे नियम पाळूनही तुमचा जीव गेला तर भरपाई मिळणारच आहे! निवडणुकीच्या प्रचारात व्यग्र असलेल्या भाजप नेत्यांच्या हाती हा मसुद्याचा कागद पडला. तो वाचल्यावर कुणी उत्साही कार्यकर्ता तर चित्कारलाच- ‘‘हे धोरण तर आपणच राबवतो की! आपलेच धोरण प्रतिपक्षाने चोरले…’’