संयुक्त राष्ट्रांच्या आमसभा अधिवेशनात गेले काही दिवस अनेक राष्ट्रांचे प्रमुख विचार मांडत आहेत. त्यांतील सारेच सत्याधारित आहेत असे नाही. संयुक्त राष्ट्रांच्या व्यासपीठावर आपल्या देशाची बाजू मांडताना धडधडीत खोटे तरी बोलू नये ही किमान अपेक्षा असते. सारेच नेते ती पाळतात असे नाही. यंदाच्या सत्रामध्ये उदाहरणच द्यायचे झाल्यास अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, तुर्कीयेचे अध्यक्ष रिसेप तय्यिब एर्दोगान, इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाझ शरीफ ही नावे ठळकपणे समोर येतात. यांपैकी ट्रम्प महाशयांना कदाचित आपण असत्यकथन करतो हे ठाऊकही नसेल किंवा त्याची फिकीर नसेल. बाकीच्यांचे तसे नाही. शरीफ आणि नेतान्याहू यांनी असत्यकथनाची नवी खोली यंदा गाठून दाखवली. यांत अर्थातच आपल्या दृष्टीने महत्त्वाचे ठरतात शरीफ यांचे दावे. आमसभेच्या व्यासपीठावर बिनबुडाचे दावे करणारे शरीफ हे पहिलेच पाकिस्तानी पंतप्रधान नव्हेत. पण शरीफ यांच्या भाषणाला पहलगाम हल्ला आणि ‘ऑपरेशन सिंदूर’ची पार्श्वभूमी होती.
त्यामुळे या दाव्यांची दखल घेणे आवश्यक ठरते. मे महिन्यात झालेल्या त्या संघर्षात पाकिस्तान विजयी झाला, असे शरीफमियाँ एकतर्फीच जाहीर करून टाकतात. त्या वेळी भारताची ‘सात’ लढाऊ विमाने पाडल्याचाही दावा करतात. आजवर भारताची सहा विमाने पाडल्याचा दावा पाकिस्तानकडून होत असे. अशा पद्धतीने भिन्न आकडे सादर होणे हे मूळ दाव्यातच खोटेपणा असल्याचे ठळक लक्षण. खरे तर भारताच्या अनपेक्षित माऱ्यामुळे पाकिस्तानातील मोठे दहशतवादी तळ उद्ध्वस्त झालेच, पण अनेक महत्त्वाच्या लष्करी आस्थापनांचाही भारतीय क्षेपणास्त्रांनी वेध घेऊन पाकिस्तानला इंगा दाखवला. अगदी गेल्या महिन्यापर्यंत पाकिस्तानचे किमान दोन हवाई तळ भारताकडून झालेल्या माऱ्यानंतर रोजच्या वापरासाठीही सिद्ध होऊ शकलेले नाहीत हे वास्तव. पुन्हा ही कबुली पाकिस्ताननेच दिलेली आहे. सिंधू नदीचे पाणी रोखून धरल्यास ती युद्धसदृश कृती मानून भारतावर हल्ला केला जाईल अशी धमकी शरीफ यांनी दिली. इतक्यावरच ते थांबले नाहीत.
तर पाकिस्तानी लष्कर आणि अमेरिकेचे अध्यक्ष या दोन कृपाकेंद्रांवर स्तुतिसुमने उधळण्याचे सोपस्कारही त्यांच्या भाषणात पार पडले. त्या वेळी – १० मे च्या सकाळी भारतीय माऱ्याची तीव्रता कैक पटींनी वाढल्यावर अगतिक पाकिस्तानने त्यांच्याच एका लष्करी अधिकाऱ्यामार्फत संघर्ष थांबवण्याचे आर्जव भारताला सादर केले; हे वास्तव ठाऊक असूनही पाकिस्तानी सैन्यदलांच्या ‘मर्दुमकी’बद्दल शरीफ आभार मानते झाले. वर, विध्वंसक युद्ध ट्रम्प यांनी थांबवले. त्यामुळे नोबेल पारितोषिकासाठी त्यांना नामनिर्देशित करणे, हे परमकर्तव्य असल्याचे शरीफ कबूलही करते झाले! या आचरट दाव्यांचा समाचार घेणे आवश्यक होते. अशा प्रसंगी उपलब्ध असलेल्या प्रत्युत्तर अधिकाराचा वापर भारताने पुरेपूर केला. ही जबाबदारी संयुक्त राष्ट्रांमधील भारताच्या कायमस्वरूपी कचेरीतील प्रथम सचिव पेतल गेहलोत यांनी योग्यरीत्या पार पाडली. शरीफ यांच्या दाव्यांची चिरफाड पेतल गेहलोत यांनी थेट आणि निःसंदिग्ध प्रकारे केली. ‘ऑपरेशन सिंदूर’पश्चात उडालेला संघर्ष थांबवा अशी याचना पाकिस्तानी लष्कराकडूनच भारतीय लष्कराकडे झाली याकडे त्यांनी लक्ष वेधले. या संघर्षादरम्यान भारताने घडवलेल्या विध्वंसाची छायाचित्रे सर्वत्र उपलब्ध आहेत असे सांगून त्यांनी भारताच्या सच्चेपणाची प्रचीती आणून दिली. हे करत असताना, भारत-पाकिस्तान संघर्ष मीच थांबवला या ट्रम्प यांच्या दाव्यातील खोटारडेपणाही सर्वांसमक्ष उघडा पाडला. दहशतवादाचे उदात्तीकरण करण्यासाठी या आमसभेत पाकिस्तानने नेहमीचीच नाटके करून दाखवली, अशी जळजळीत टीकाही गेहलोत यांनी शरीफ यांचे नाव न घेता केली.
पण पाकिस्तानची खरी फजिती शनिवारी झाली. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी ‘दहशतवाद हेच राष्ट्रीय धोरण राबवून त्याचे समर्थन करणाऱ्या राष्ट्रा’चा उल्लेख त्यांच्या भाषणात केला. पाकिस्तान हा देश कशा प्रकारे उपद्रव आणि विध्वंस घडवतो यावर त्यांनी प्रकाश टाकला. त्यावर पाकिस्तानच्या एका मुत्सद्द्याने ‘पुरावे दिले नाहीत भारताने अजून’ हे नेहमीचे पालुपद चालवले. भारताने यावरही उत्तर दिले नि ज्या देशाचे नावही घेतले नाही त्याच देशाला खुलासा करण्याची गरज का पडते, असा रोकडा प्रश्न उपस्थित केला.या सगळ्या बाबी अर्थातच भारताने यापूर्वीही प्रकाशात आणलेल्या आहेत. पण आमसभेसारख्या बहुराष्ट्रीय व्यासपीठावर प्रथमच शाहबाझ शरीफ यांनी असत्यकथन केल्यानंतर पाकिस्तानचा कांगावा चव्हाट्यावर आणण्याची संधी आपल्याला मिळाली आणि सर्वस्तरीय, तयारीनिशी आपण तिचा वापर केला हे महत्त्वाचे. पाकिस्तानविरुद्ध संघर्ष राजनैतिक पातळीवरही जिंकत राहावा लागेल, हेही अधोरेखित झाले.