नरेश म्हस्के

एकनाथ शिंदे यांच्या जम्मू काश्मीर दौऱ्याकडे राजकीय चष्म्यातून पाहिले जात आहे. आदिल या स्थानिक व्यक्तीच्या कुटुंबीयांना मदत करून त्यांनी हिंदूमुस्लीम ऐक्याचा संदेशही दिल्यामुळे काही राजकीय गटांत अस्वस्थता निर्माण झाली आहे, मात्र संकटसमयी मदतीसाठी धाव घेणे, हीच शिवसेनेची कार्यपद्धती आहे…

जम्मू-काश्मिरातील भ्याड इस्लामी दहशतवादी हल्ल्यात मृत्यमुखी पडलेल्या तसेच जखमी झालेल्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: काश्मीरला रवाना झाले. काश्मीरशी शिवसैनिकांचे भावनिक नाते आहे. एकनाथ शिंदेंच्या जम्मू – काश्मीर दौऱ्याकडे राजकीय चष्म्यातून पाहणे चुकीचे ठरेल. या दौऱ्याचा अर्थ लावताना शिवसेना या पक्षसंघटनेची पार्श्वभूमी, काश्मीरशी असणारे नाते, बाळासाहेब ठाकरेंचे संस्कार आणि हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या आदिल नावाच्या स्थानिक रहिवाशाच्या कुटुंबीयांना त्यांनी केलेली मदत अशा विविध पैलूंचा विचार करावा लागेल.

८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या भूमिकेतून शिवसेना या संघटनेची स्थापना झाली होती. संकटकाळी सर्वसामान्यांची सर्वतोपरी मदत-सेवा करण्याची शिकवण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी दिली आहे. बाळासाहेबांच्या संस्कारात लहानाचा मोठा झालेला कोणताही शिवसैनिक अशा प्रसंगी घरी स्वस्थ बसू शकत नव्हता. परंतु नव्याने ‘सेक्युलर’ झालेल्या काही विघ्नसंतोषी लोकांना एकनाथ शिंदे साहेबांकडून सुरू झालेले प्रयत्न पाहून पोटशूळ उठला. देशावरील संकटसमयी स्वत: युरोपात पर्यटन करणाऱ्यांच्या प्रवक्त्यांनी शिवसेनेच्या सेवाकार्यावर पातळी सोडून टीका केली.

शिवसेना हा केवळ राजकीय पक्ष नाही तर शिवसेनेची स्थापनाच एक सामाजिक संघटना म्हणून झाली होती. कोणत्याही संकटकाळात प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित राहून सेवाकार्यात सहभाग घेणे हा सामाजिक संघटनेचा स्वभाव असतो. आपत्तीस्थळी स्वत: मदत घेऊन पोहोचणे हा एकनाथ शिंदे यांचा स्वभाव आहे. महाड, इरशाळवाडी, कोल्हापूरचा पूर अशा सर्वच आपत्तीप्रसंगी एकनाथ शिंदे यांच्या कार्यपद्धतीत एक सातत्य दिसते. दरवेळी ते घटनास्थळी गेले आहेत. पहलगाम हल्ल्यानंतर त्यांनी त्यांच्या स्वभावाला साजेशी कृती केली. त्यांनी वेगळे काही केले असे नाही. परंतु एकनाथ शिंदे त्यांच्या कृतीमुळे इतरांपेक्षा वेगळे ठरले, हे नक्की.

काश्मिरी पंडितांवर अत्याचार झाले, त्यांना जम्मू – काश्मीर सोडून जावे लागले तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी काश्मीरमधील हिंदू निर्वासितांसाठी आरक्षणाची तरतूद होईल, याची काळजी घेतली. अमरनाथ यात्रा बंद करण्याची दहशतवाद्यांनी धमकी दिली तेव्हा अमरनाथ यात्रा झाली नाही तर मुंबईतून हजला एकही विमान जाणार नाही, अशी भूमिका बाळासाहेब ठाकरेंनी घेतली होती. तेव्हापासून महाराष्ट्रातील असंख्य शिवसैनिक काश्मीरला जाऊ लागले, अमरनाथ यात्रेत सहभागी होऊ लागले. त्यामागे पर्यटन नव्हे तर देशासाठी भूमिका घेणे हा शिवसैनिकांचा उद्देश असे. बाळासाहेब ठाकरेंनी प्रत्येक शिवसैनिकाला जम्मू- काश्मीरशी जोडले ते कायमचेच.

एकनाथ शिंदे यांनी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या मराठी बांधवांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांनी संवेदना व्यक्त करताना शासकीय पातळीवर सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. याशिवाय, स्थानिक नागरिकांनाही त्यांनी आधार दिला. सय्यद आदिल या स्थानिक व्यक्तीचाही यात बळी गेला असून त्याच्या नातेवाईकांना शिंदे यांनी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. ज्यामुळे त्यांच्या कुटुंबाला दिलासा मिळाला. त्याचे घर बांधून देण्याचा निर्णय एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला. काश्मीरमधील दहशतवादी यासीन मलिक याला दिल्लीत बोलवून जेवणाच्या पंक्तीत बसणाऱ्या संजय राऊत यांच्या पक्षाला आदिलच्या कुटुंबीयांना एकनाथ शिंदेंनी केलेल्या मदतीचे महत्त्व कळणार नाही. आमच्यासाठी आदिल महत्त्वाचा आहे यासीन नाही. आम्ही दहशतवाद्यांना गोळी घालू तर देशभक्ताचा सत्कार करू, हा संदेश जगाला देणे गरजेचे होते.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जम्मू- काश्मीर दौरा ही केवळ राजकीय कृती नसून, संकटकाळात नेतृत्व आणि मानवतेच्या मूल्यांचा प्रत्यय देणारा एक उत्तम नमुना आहे. काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यानंतर तेथील परिस्थिती गंभीर झाली होती. पर्यटक आणि स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. या हल्ल्यात मराठी पर्यटकांचा मृत्यू झाल्याच्या आणि काही जण अडकल्याच्या बातम्या समोर आल्या. अशा वेळी एकनाथ शिंदे यांनी क्षणाचाही विलंब न करता विशेष विमानाने काश्मीर गाठले. त्यांचा मुख्य उद्देश होता पीडित कुटुंबांना आधार देणे, अडकलेल्या मराठी पर्यटकांना सुरक्षितपणे परत आणणे आणि स्थानिक प्रशासनाशी समन्वय परिस्थितीवर नियंत्रण मिळवणे.

एकनाथ शिंदे यांनी यापूर्वीही पूर, वादळ, दरड कोसळणे यांसारख्या नैसर्गिक आणि मानवनिर्मित संकटांमध्ये तत्परतेने कारवाई केली आहे. त्यामुळे त्यांचा अनुभव आणि संकटकाळातील व्यवस्थापनकौशल्य यामुळे काश्मीरमधील पर्यटकांना आणि पीडितांना विश्वास वाटला. काश्मीरमध्ये अडकलेल्या अनेक मराठी पर्यटकांना सुरक्षितपणे महाराष्ट्रात परत आणण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी विशेष विमानाची व्यवस्था केली. त्यांनी काश्मीरमधील स्थानिक प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणांशी थेट संपर्क साधला. पर्यटकांच्या सुरक्षित स्थलांतरासाठी आणि औषधोपचारांसाठी आवश्यक ती सर्व मदत पुरवली.

एकनाथ शिंदे यांच्या या दौऱ्याने राजकीय आणि सामाजिक स्तरांवर अनेक चर्चांना जन्म दिला. काहींनी यावर राजकीय टीका केली, तर बहुतेकांनी या दौऱ्याला संकटकाळातील खऱ्या नेतृत्वाचे उदाहरण मानले. शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्ते याला बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे पालन मानतात, जिथे मराठी माणसाच्या हक्कांसोबतच मानवता आणि एकता यांना प्राधान्य दिले जाते.

संजय राऊत यांनी, शिंदे यांच्या दौऱ्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी या दौऱ्याचे राजकारण करण्याचा प्रयत्न केला. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार अशा संकटसमयी परदेशात जाऊन बसणारे असू शकत नाहीत. प्रत्यक्ष संकटाच्या ठिकाणी जाऊन पीडितांना मदत करणे, त्यांच्या नातेवाईकांना धीर देणे ही शिवसेनेच्या कामाची पद्धत आहे. शिंदे यांनी केवळ मराठी माणसांनाच नव्हे, तर सर्व पीडितांना मदत केली. आदिल या स्थानिक व्यक्तीच्या कुटुंबीयांना मदत करून त्यांनी हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेशही दिला, ज्यामुळे काही राजकीय गटांत अस्वस्थता निर्माण झाली.

एकनाथ शिंदे यांचा हा दौरा त्यांच्या नेतृत्वशैलीचे एक वैशिष्ट्य अधोरेखित करतो – संकटकाळात त्वरित कृती आणि जनतेशी थेट संवाद. त्यांनी यापूर्वीही ठाणे जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात अनेक संकटांमध्ये आपली कार्यक्षमता सिद्ध केली आहे. महाड, इरशाळवाडीतील संकट अशा सर्वच ठिकाणी एकनाथ शिंदे स्वत: हजर राहिले. त्यांनी कोणत्याही पदावर असताना संकटसमयी शक्य ती सर्व मदत नेहमीच केली आहे.

एकनाथ शिंदे यांचा काश्मीर दौरा हा संकटकाळातील नेतृत्व आणि मानवता यांचा संगम होता. त्यांनी दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर तातडीने कारवाई करत मराठी बांधवांसह सर्व पीडितांना मदत केली. या दौऱ्याने त्यांची जनसेवेची वृत्ती पुन्हा एकदा अधोरेखित केली, तसेच राजकीय चर्चांना नवे वळण दिले. सामान्य जनतेच्या दृष्टीने हा दौरा शिंदे यांच्या कृतिशील नेतृत्वाचा पुरावा ठरला. भविष्यातही कधी अशी संकटे उद्भवल्यास त्यांचा सामना करण्यात एकनाथ शिंदे योगदान देतील आणि त्यांचे नेतृत्व महाराष्ट्राच्या राजकारणात एक उदाहरण प्रस्थापित करेल, असा विश्वास वाटतो.

१९६२ च्या युद्धाच्या वेळी कुसुमाग्रजांनी काव्यरचना केली,

बर्फाचे तट पेटुनी उठले

सदन शिवाचे कोसळते

रक्त आपुल्या प्रिय आईचे

शुभ्र हिमावर ओघळते

सह्यगिरीतील वनराजांनो

या कुहरातुन आज पुढे

रक्त हवे जर स्वतंत्रतेला,

रक्ताचे पडतील सडे

एक हिमाचल राखायास्तव

करा हिमालय लक्ष खडे

समरपुराचे वारकरी हो

समरदेवता बोलविते

कुसुमाग्रजांच्या कवितेत सह्यगिरीतील वनराजा म्हणून मराठी माणसासमोर जबाबदारी उचलण्याचे आव्हान आहे, तर ‘एक हिमाचय राखायास्तव करा हिमालय लक्ष खडे,’ हा उपाय. अशा युद्धप्रसंगी एकनाथ शिंदे ‘समरपुराचे वारकरी’ ठरले याचे मला समाधान वाटते.

ठाणे मतदारसंघातील शिवसेनेचे खासदार