डोंगरी शेत माझं गं मी बेनू किती?
आलं वरिस राबून मी मरावं किती?
नारायण सुर्वे यांच्या या कवितेचा पायल चव्हाण आणि स्वाती चव्हाण या इयत्ता सातवीत शिकणाऱ्या मुलीने ‘गोरमाटी’ भाषेत केलेला अनुवाद असा :
डुंगरेर खेत मारं यं मं काम करु कतरा?
अवगो बरस काम करण मं मरू कतरा?
मुखेड तालुक्यातील कमळेवाडीच्या शाळेत शिक्षक म्हणून काम करणारे शिवाजी आंबुलगेकर लमाण, पारधी, घिसाडी, वडार, वासुदेव, अहिराणी, दखनी मुसलमानी या मातृभाषा असणाऱ्या मुलांकडून एकेक शब्द गोळा करत आहेत. फूल शब्दाला वडार जातीतील मुले ‘पुऊ’ म्हणतात. मसणजोगी जमातीमध्ये ‘फुवूं ’ असा शब्दोच्चार. भाषेचे शिक्षक असणाऱ्या आंबुलगेकरांना वाटायचे, की मुलांना आपण शिकवलेले सारे समजतेय. पण भटक्या समाजातील मुलांची मातृभाषा निराळी. त्यांना प्रमाण मराठी शिकवायचे म्हणजे त्यांचा एक शब्द समजून घ्यायचा आणि मराठीतील शब्द समजून सांगायचा. शब्दाच्या देवाणघेवाणीची अध्ययन – अध्यापन पद्धती. पुढे याच पद्धतीतून मग मुलांनी काही शब्द गद्यात किंवा पद्यात गुंफले. नारायण सुर्वेंची कविता भटक्यांच्या शाळेतील मुले अशी समजून घेतात. म्हणजे शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये भाषेचा एक पूल तयार होतो. खरं तर ‘पूल’ हा शब्दही इंग्रजी. साकव म्हणू याला. भाषेचा साकव असा तयार होतो.
परप्रांतीय नसणारे आणि महाराष्ट्रातील इतर सगळे मराठी भाषक, असा आपला भ्रामक समज. मेळघाटातील आदिवासी कोरकू बोलतात. त्यांच्यासाठी मराठी ही परकी भाषा आहे. पण आमची भाषा बोला नाही तर गुद्दा घालू असे ते म्हणत नाहीत. कोणी पारधी असे म्हणत नाही, की आमची भाषा अनिवार्य करा. ते जगतात दोन – तीन भाषांची श्रीमंती घेऊन. त्याचे ते प्रदर्शनही करत नाहीत. भाषा ही श्रीमंती असते, हेही त्यांना तसे ठाऊक नसते. पण शिवाजी आंबुलगेकरांसारखी मंडळी भाषेला जोजवतात. असे करणारे ते काही एकटे नाहीत. परभणी जिल्ह्यात ग्रामीण भागातील शिक्षक म्हणून काम करणाऱ्या केशव खटिंग यांनी ग्रामीण आणि शब्द आणि म्हणी माहीत व्हाव्यात म्हणून समाजमाध्यमांमध्ये एक गट तयार केला.
‘रानशिन्या गवऱ्या’ म्हणजे रानात जनावरांचे शेण पडून आपोआप झालेली गोवरी. ‘वळशिन्या गवऱ्या’ म्हणजे हाताने थापलेल्या गोवऱ्या. बैलगाडीच्या मागच्या बाजूला ओझ्यामुळे उतार झाला तर शब्द आहे , ‘उल्हाळ’, काही भागांत त्याला ‘उन्हाळ’ असेही म्हणतात. ओझ्यामुळे बैलांच्या मानेवर ओझे येते तेव्हा ‘धुरजड’ असा शब्द. एखाद्या गायीचा वेत सतत असेल तर ती ‘सदाफळी’ आणि बिनकामाची गाय किंवा बैल ‘भाकड’, अशा शब्दाचे संकलन या गटातून आजही केले जाते.
जनावरांच्या बाजारात घडणारे बदल नोंदविण्यासाठी राज्यभर फिरणारे मोतीराम पौळ जनावरांच्या बाजाराची भाषा, नवे शब्द जाणून घेतात. जनावरांच्या बाजारातील दलालांना ‘हेडा’ असे म्हटले जाते. येथे बोटांच्या इशाऱ्यावर व्यवहार ठरतात. पारुषी ही जनावरांच्या बाजारातील भाषा. उपरणे, दस्ती, रुमाल याखाली बोटाच्या आधारे व्यवहार ठरतात. बाजार कर्नाटकाला लागून असणाऱ्या वागदरीसारख्या खेड्यात असेल तर हजार या शब्दाला टोकन असं म्हणतात. तीन हजाराला गला टोकन, चार हजाराला नाकी टोकन, पाच हजाराला सब टोकन आणि दहा हजाराला हत्तू टोकन असे शब्द. कानडीमधील दहा अंकाला हत्तू असे म्हणतात, हे लक्षात घेतले की कन्नड भाषेचा यावर प्रभाव आहे, हे लक्षात येईल. केशव खटिंग यांनी तयार केलेल्या समाजमाध्यमाच्या गटात पोलीस, इंजिनीअर, गुराखी असे सारे जण दररोज भाषा अभ्यास करतात. शब्द दिवसभरासाठी एक व्यवसाय क्षेत्र निवडायचे आणि त्या क्षेत्रातील शब्दभेंड्या खेळायच्या हा तो उपक्रम. रोज नवे क्षेत्र आणि हरवलेले शब्द असा खेळ. भाषा ही तान्हुल्यासारखी असते. तिला जोजवावं लागतं. न्हाऊमाखू घालावे लागते. गंध, पावडर करावे लागते. तीट लावावे लागते. हे काम रोज करावे लागते. असे काम २५९ शिक्षक परभणी, नांदेड जिल्ह्यात काम करतात. कोणी ‘कंधारी’वर काम करते तर कोणी ‘मन्याडी’ भाषेतील शब्द शोधून सांगतात. या गटाच्या ‘अॅडमिन’ला सारे जण प्रेमाने ‘मुकादम’ म्हणतात. यांनी आता हरवलेले सात हजार शब्द संकलित केले आहेत. युवा साहित्य अकादमी पुरस्कार मिळविलेले वीरा राठोड असो किंवा पारधी समाजातील यमगरवाडीत काम करणाऱ्या प्रणिता मिटकर असोत त्यांनीही लमाण आणि पारधी भाषेतील शब्द एकत्रित केले आहेत. भाषेबरोबर काम करताना त्या भाषेतील संस्कृतीची देवाणघेवाणही होत असते.
कर्नाटकाशी जोडलेल्या उमरगा तालुक्यात बालाजी इंगळे यांनीही वेगळाच प्रयोग केला. ‘झिम्म पोरी झिम्म’ या त्यांच्या कादंबरीमधील वाक्ये अशी आहेत, ‘जरा वत्तलाखाली घाल. आंघुळ करणारेव’, आता बरं वाटलालंय का? ‘कडुसं पडलालेत रानातले जनावरं गावात यीवलालेव’. ‘सांज्यापरचं आंगण झाडलतं. अप्पा असंच येऊन टेकलते.’ अशी वाक्यं आहेत. यातील ‘वत्तल’ म्हणजे पाणी तापवण्याचे भांडे. वाटू लागलं आहे, करू लागले आहे, येऊ लागले आहे अशा शब्दसमूहांसाठी यीवलालेव. करुलालाव असे एकत्रित शब्दप्रयोग होतात. उमरगा, उदगीर, अहमदपूर, चाकूर अशा कर्नाटकाच्या सीमेलगत जवळ असणाऱ्या तालुक्यात लहेज्यातील थोड्याफार फरकाने कानडीचा कमालीचा प्रभाव. हेल, उच्चारही बदलत जाणारे. असा लहेजा लिहणारी मंडळीही भाषा पुढे नेत असतात. अशी किती तरी माणसे असतात आपल्या भोवताली. फुशारकी न मारता भाषेसाठी काम करणारी. धरणी आणि चिखलदरा या दोन तालुक्यांत कोरकू भाषेत बोलणारी अनेक गावे. नवा कोणी गावात आला तर थोडीफार हिंदी. त्यामुळे त्यांना प्रमाण मराठी शिकवणे हे मोठे आव्हान. ही भाषा येणारे आठ-दहा शिक्षक भाषेचा साकव उभारायच्या कामाला लागले. गणेश जामुनकर, अनिल झामनरकर, शेवंती कासदेकर, मनोज बेठे यांच्यासह आठ-दहा जणांनी प्रमाण भाषेतील शब्द, वाक्य कविता कोरकू भाषेत अनुवादित केल्या. ‘समोर पाहा’ या शब्दासाठी ‘सम्मा डोगे’, पुढे चला या शब्दसमूहासाठी ‘संम्मन सेने ’ असे शब्द. आता या शिक्षकांनी शब्दांचा, वाक्यांचा, गोष्टीचा आणि अगदी पाठ्यपुस्तकाचाही अनुवाद केला आहे. कारण त्यांना मुलांना मराठी शिकवायचे आहे. आता या मुलांना हिंदीची सक्ती करणे किती योग्य? पण भाषा लादून पुढे जात नाही. तसे असते तर मराठवाड्याची भाषा उर्दू व्हायला हवी होती. हैदराबाद संस्थानात शासकीय व्यवहाराची भाषाच उर्दू होती. अर्थात या भाषेचा मराठीवर परिणाम नक्की दिसून येतो. पण निजामाच्या राजवटीत मराठी टिकवली ती महिलांनी. घरात मराठी आणि बाहेर उर्दू असे चित्र अनेक वर्षे होते. सत्ताधाऱ्यांनी प्रयत्न करुनही उर्दू ही सर्वसामान्यांची दैनंदिन व्यवहाराची भाषा झाली नाही. उर्दूतून शिक्षण घेणारी एक पिढी मराठवाड्यात होती. पण लादण्याने गोष्टी बिघडतात. हे पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांना कळले नाही म्हणूनच भाषेच्या प्रेमातून बांगलादेश स्वतंत्रपणे उभा राहू शकला.
भाषा संस्कृतीचा अभ्यास ही एक स्वतंत्र शाखा आहे. आपल्या देशात त्याचे दोन गट. एक द्राविडी आणि दुसरी भारतीय आर्यन. सिंधू संस्कृतीची भाषा आणि लिपी वेगळी. ती उलगडलीच नाही. पुढे संस्कृत ही सर्वात जुनी भाषा. मग मागधी, शूरसेनी असा प्रवास करत महाराष्ट्रात पाकृत भाषेतून मऱ्हाटी, मरहट्टी आणि पुढे अपभ्रंश होऊन महाराष्ट्री असा मराठी भाषेचा इतिहास थेट दोन हजार ३०० वर्षे मागे जातो. पण भाषेवर इतिहासातील प्रभाव राहतात. पण ते चिरकाल टिकत नाहीत. त्याला सामाजिक परिस्थिती आणि बदलते तंत्रज्ञानही कारणीभूत असते.
खरे तर मराठी मुलखात आदिवासी आणि भटक्यांच्या जवळपास ६० हून अधिक बोली आहेत. त्यातील भटक्यांच्या भाषेवर ते कोणत्या बाजूने फिरत आले यावर त्याचा प्रभाव ठरतो. याचा अभ्यास विदर्भातील डॉ. श्रीकृष्ण काकडे यांनी केला आहे. शिकलकरी, नंदीबैलवाले, मरिआईवाले, वैदू, वडार, कैकाडी, स्मशानजोगी हे दक्षिणेतून आल्याने त्यांच्यावर द्राविडी बोलीचा प्रभाव. उत्तरेतून आलेल्या बंजारा, कांजरभाट यांच्यावर हिंदीचा प्रभाव, पारधी जमातीत बोलल्या जाणाऱ्या भाषेला वाघरी म्हणतात. त्यावर गुजराती, राजस्थानीचा प्रभाव, छत्तीसगडकडून येणाऱ्यांची खडी बोली यामध्ये तुंबडीवाले. त्यामुळे मराठी टिकवायची असेल तर भाषेच्या संवादाचे पूल बांधावे लागतील. त्याला उत्तर – दक्षिण किंवा दक्षिणोत्तर अशी प्रवासदिशाही देऊन चालणार नाही.
वऱ्हाडी, कोहळी, नागपुरी, हलबी, झाडी, अहिराणी, डांगी, कोकणी, अशा किती तरी भाषा आहेत. पण या भाषांमधील आणि प्रमाण मराठीतील अनेक शब्द आता हरवत चालले आहेत. आता आड, पोहरा, रहाट हे शब्द तसे बाद होत गेलेले शब्द. त्यांचे काम करणारा विद्याुत पंप आला. मोटार हा त्या प्रक्रियेतील शब्द आता केंद्रस्थानी आहे. हरवलेले हे शब्द गोळा करणाऱ्या, दोन भाषांमध्ये दुवा म्हणून काम करणाऱ्या माणसांचे महत्त्व एवढ्यासाठीच की जेव्हा केव्हा समाज बदलाच्या नोंदी शोधल्या जातील तेव्हा हे शब्द इतिहासातील समाजजीवन सांगण्यास मदत करतील. त्यामुळे भाषेत काम करायचे असेल तर भाषातज्ज्ञ होण्याची किंवा दर्जेदार कविता किंवा अस्सल साहित्यनिर्मितीची गरज असतेच असते असे नाही. येथे भाषा सांभाळणारी खूप माणसे लागतील. कोणी बोलीवर काम करेल तर कोणी प्रमाण भाषेवर. छत्रपती संभाजीनगरच्या सरस्वती भुवनमध्ये सहशिक्षक म्हणून काम करणारे नागेश अंकुश प्रमाण भाषेच्या निर्दोष लेखनाचा इतिहास लिहीत आहेत. सुधीर रसाळ यांच्यासारखे ज्येष्ठ समीक्षक त्यांना मार्गदर्शन करत आहेत. ४०० वर्षांची प्रमाण मराठीची जडणघडण त्यामुळे पुढे येणार आहे.
भाषेवर खूप पद्धतीने काम करावे लागते. भाषेचे बियाणे पेरावे लागते, मग पुढे झाड येते. भाषेत काम करणाऱ्यांनी झाडासारखे बी पेरायला शिकले पाहिजे. गुद्दागुद्दी करून किंवा पाट्या बदलून काय उपयोग? पाट्या बदलणाऱ्यांना माहीतच नाही ते भाषेचा नाही तर लिपीचा आग्रह धरताहेत. भाषा ही नेहमी एक शब्द देऊ आणि एक शब्द घेऊ अशीच वाढते.