सध्या २९ जणांच्या मंत्रिमंडळात मूळच्या भाजपचे सदस्य आठच. विस्तार ४३ पर्यंत झाला तरी त्यापैकी १४ पदे तीन पक्षांत विभागली जाणार..

त्याच त्या वर्गात बसण्याचा कंटाळा अजितदादा पवार यांस अजून कसा आला नाही, हा प्रश्नच आहे. खरे तर ‘ढ’तला ‘ढ’ विद्यार्थीसुद्धा एकाच वर्गात सतत बसायची वेळ आली की कंटाळतो. त्यात अजितदादा तर हुशार आणि तडफदार. तरीही पाच-पाच वेळा उपमुख्यमंत्रीपदाचा वर्ग ते गोड मानून घेतात, ही बाब तशी कौतुकास्पद म्हणायची. ‘‘समस्या सोडवायची असेल तर त्याच प्रतलावर असून चालत नाही; समस्येच्या वर जाता आले पाहिजे,’’ असे आईन्स्टाईनसारखा तत्त्वज्ञ वैज्ञानिक म्हणत असे. अजितदादांनी आईन्स्टाईन वाचलेला आहे किंवा काय, हे माहीत नाही आणि तसे ते माहीत करून घेणेही अवघड. पण तसा तो त्यांनी वाचला असता तर उपमुख्यमंत्रीपदाचा त्यांच्यावर पडलेला वेढा सोडवण्यास निश्चित मदत झाली असती. दोनदा पृथ्वीराज चव्हाण, मधे अत्यंत अल्पकाळ देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि आता एकनाथ शिंदे अशा अनेक मुख्यमंत्र्यांच्या हाताखाली अजितदादा उपमुख्यमंत्री राहिलेले आहेत. यातील चव्हाण आणि फडणवीस हे ज्ञान आणि प्रशासकीय कौशल्य या आघाडीवर अजितदादांपेक्षा सरस. पण तुलनेने अगदीच नवखे उद्धव ठाकरे वा आता एकनाथ शिंदे यांचे उपमुख्यमंत्री म्हणून राहणेही अजितदादांनी गोड मानून घेतलेले आहे. वास्तविक ‘उपमुख्यमंत्री’ या पदास कोणताही घटनात्मक अर्थ नाही. कायद्यानुसार हे पदच अस्तित्वात नाही, हे उत्तम प्रशासकीय ज्ञान असलेल्या अजितदादांस माहीत नसणे अशक्य. तरीही पाच-पाच वेळा त्यांनी ते पद आनंदाने स्वीकारले यात त्यांची आणि महाराष्ट्राच्या राजकारणाची अपरिहार्यता आणि असहायता दिसून येते. या प्रसंगी तीवर भाष्य गरजेचे.

कारण अलीकडे राजकारणात झालेला सराईत पक्षबदलूंचा सुळसुळाट. सत्तेच्या आसऱ्याने राहावे, भरपूर माया करावी, राजकारणाशिवाय कोणतेही कौशल्य मिळवू नये आणि सत्ता गेली की ती ज्यांच्या हाती आहे त्यांच्या आश्रयास जावे अशी ही संस्कृती. तिचे पाईक छगन भुजबळ ते नारायण राणे यांप्रमाणे अनेक नेते सत्ताधारी पक्षात आढळतील. सध्या महाराष्ट्रात  भाजप-एकनाथ शिंदे यांची शिवसेना-अजितदादांचा राष्ट्रवादी यांची सत्ता आहे. त्यातील किती मंत्री आपापल्या मूळ पक्षांचे सदस्य आहेत यावर नजर टाकली तरी हा पक्षबदलूंचा पथ किती राजमार्ग झालेला आहे, हे दिसेल. त्यात या सगळय़ास आणखी एक लबाड पैलू आहे. तो जाती-पातीच्या राजकारणाचा. त्यामुळे भुजबळांस मंत्रीपद अव्हेरले तर तो ‘अन्य मागासांवर’ (ओबीसी) अन्याय ठरतो आणि रामदास आठवले मंत्री झाले की समस्त दलितांस हायसे वाटते, हे कसे? इथे भुजबळ, आठवले ही केवळ उदाहरणे. आणखीही असे अनेक सापडतील. एका व्यक्तीस गडगंज माया करण्याची संधी दिली गेल्याने त्या व्यक्तीच्या समाजाने आनंद मानण्याचे कारण काय? प्रातिनिधिक एकास भरपेट जेवू घातल्याने त्याच्या समाजातील इतरांचे पोट भरते काय? या असल्या खुळचट आणि बनेल युक्तिवादांमुळे सराईत पक्षबदलूंचे चांगलेच फावते. आताही शिंदे मंत्रिमंडळात नव्याने वर्णी लागलेल्यांची नावे पाहा. सरकार कोणत्याही पक्षाचे असो, मंत्रीपद यांना मिळतेच मिळते. यातून जसे त्यांचे कौशल्य दिसते तसेच त्यातून समाजाच्या व्यापक राजकीय बावळटपणाचेही दर्शन होते.

उदाहरणार्थ शिंदे यांचे मंत्रिमंडळ. त्यात रविवारी अजितदादांच्या बरोबर आलेल्या राष्ट्रवादी जथ्यास देण्यात आलेली खाती ही भाजपच्या वाटय़ातील आहेत, असा युक्तिवाद शिंदे गटाचे करतात. तो त्यांच्यापुरता योग्यच. पण तरीही त्यामुळे मंत्रिमंडळाची संख्याक्षमता घटतेच आणि त्यातून अन्यांच्या मंत्रीपदाच्या आशा कमी होतात. अर्थात शिंदे गटाकडे काही हिरेमाणके आहेत असे नाही. पण शिंदेंच्या चरणी पहिल्या दिवसापासून निष्ठा वाहूनही माजी शिवसैनिकांच्या तोंडचा घास अजितदादा गटाचे दांडगेश्वर काढून घेणार असतील, तर शिंदेंचे साथीदार नाराज होणे साहजिक. त्यापेक्षाही केविलवाणी अवस्था आहे भाजपची. हिंदूत्व, राष्ट्रवाद, नैतिकता इत्यादी बौद्धिकी खुराकावर पोसल्या गेलेल्या मूळ अनेक भाजपवासीयांची राजकीय कारकीर्द सत्तेच्या गावकुसाबाहेरच वाया जाताना दिसते. बिचारे काही तक्रार करीत नाहीत आणि सर्व काही मुकाटय़ाने सहन करतात. पण भाजपस अत्यंत जिव्हाळय़ाच्या हिंदूत्वादी मुद्दय़ांवर यथेच्छ तोंडसुख घेणारे अन्यपक्षीय नेते सत्ता आली की आपल्या पक्षात येतात आणि आपल्या डोक्यावर बसतात याच्या कितीही नाही म्हटले तरी त्या सर्वास वेदना होत असणारच. आताही २९ सदस्यीय महाराष्ट्र मंत्रिमंडळात शुद्ध भाजप मंत्र्यांची संख्या फक्त आठ इतकीच आहे. कायद्यानुसार राज्य मंत्रिमंडळात जास्तीत जास्त ४३ मंत्री असू शकतात. म्हणजे जास्तीत जास्त आणखी १४ मंत्र्यांची भर शिंदे घालू शकतील. म्हणजे आता ही १४ पदे तीन पक्षांत वाटली जातील. याचा साधा अर्थ असा की राज्यातील सरकारचे कर्ते-करविते असूनही बहुसंख्य भाजपवासी सत्तापरिघाच्या बाहेरच राहणार, हे नक्की.

राज्यात बोकाळलेल्या पक्षांतर संस्कृतीचा हा परिणाम! यातही या वेळी भाजपवासीयांस अधिक वेदनादायी ठरेल ते देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांचे एकाच पायरीवर असणे. दोघेही उपमुख्यमंत्रीच! अजितदादांच्या कथित जलसिंचन घोटाळय़ाविरोधात जनजागृतीसाठी फडणवीस यांनी किती उरस्फोड केली. पण परिणाम काय? केवळ अजितदादाच नाही तर अजितदादांच्या निष्ठावानांसही सत्तेत सामावून घेण्याची वेळ भाजपवर आली. ‘‘अजितदादांचे स्थान खरे तर तुरुंगात आहे’’, या फडणवीसांच्या खणखणीत भूमिकेवर त्या वेळी त्या पक्षाचे कार्यकर्तेच काय पण सामान्य नागरिकही फिदा झाले होते. पण कसचे काय? आता त्याच अजितदादांस त्यांच्याविरोधात जिवाचे रान उठवणाऱ्या फडणवीस यांच्याकडील अर्थ इत्यादी महत्त्वाचे खाते द्यावे लागणार. दुसरीकडे अजितदादांनीही अलीकडेच ‘‘मी मरेपर्यंत राष्ट्रवादीतच राहीन’’, अशा जाहीर आणाभाका घेतलेल्या. तांत्रिकदृष्टय़ा त्यांनी ‘राष्ट्रवादी’चा त्याग केलेला नाही, हे खरे. पण असे म्हणणे हे एकनाथ शिंदे यांनी शिवसेना सोडलेली नाही, या ‘सत्यावर’ मान डोलावण्यासारखेच. खरे तर अजितदादा स्वत:चा पक्ष वाहून नेण्याचे इतके कष्ट करताना पाहून त्यांनी मुख्यमंत्रीपदावरच दावा सांगणे गरजेचे आहे. पण एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या आधी असे पक्षवहनाचे कष्ट केलेले असल्याने मुख्यमंत्रीपद तूर्त त्यांच्याकडे आहे.

म्हणजे तोपर्यंत हे पद ना अजितदादांस मिळणार ना फडणवीस यांना. त्यात फडणवीस निदान व्यापक आणि दीर्घकालीन राष्ट्रहितासाठी उपमुख्यमंत्रीपदी राहणे सहन करतीलही. पण अजितदादांचे काय? उपमुख्यमंत्रीपदाच्या अस्तित्वात नसलेल्या पदावर किती काळ काढायचा हा त्यांच्यासमोरचाही गंभीर प्रश्न असणार. राजकारणात योग्य संधीची वाट पाहणे हे फार महत्त्वाचे असते, असे त्या क्षेत्रातील जाणकार म्हणतात. देवेंद्र फडणवीस हे त्याचे उदाहरण. पण अजितदादांस असे वाट पाहणे अमान्य असावे. आपल्या ताटात रास्त काही पडावे याची वाट पाहण्यापेक्षा मुदपाकखान्यात जाऊन वाढप्याकडील ताटच हिरावून घेणे त्यांस पसंत दिसते. कधी तरी असे करणे यांस धडाडी म्हटले जात असेलही. पण वारंवार असे करणाऱ्यास आततायी म्हणतात. आपण असे तर नाही, याचा विचार अजितदादांस यापुढच्या काळात तरी करावा लागेल. अन्यथा काँग्रेसमध्ये जा, भाजपत जा; पण मुख्यमंत्रीपद नाही ते नाहीच अशा नारायणराव राणे यांच्यासारखी त्यांची अवस्था होईल.

पुरोगामी-प्रतिगामी घर्षण तीव्र नव्हते तेव्हा विवाहितेस ‘अखंड सौभाग्यवती भव’ असा आशीर्वाद देण्याची प्रथा होती. त्याप्रमाणे अजितदादांस ‘अखंड उपमुख्यमंत्री भव’ असा आशीर्वाद कोणी दिला आहे किंवा काय, हे माहीत नाही. पण तसे असेल तर हा आशीर्वाद की शाप या प्रश्नाचा विचार ते करतील काय?