यंदा भारतीयांनी फटाक्यांवर तब्बल सात हजार कोटी रुपये इतका प्रचंड दौलतजादा केला… थोडक्यात तितक्या रकमेचा धूर केला.
याची जाणीव आहे की हे अरण्यरुदन ठरेल. याचीही जाणीव आहे की कोणा तरी असमंजस उन्मादाने भारलेल्या समाजास या सगळ्याची गरज वाटणारही नाही. हेही शक्य आहे की जोपर्यंत विजय मिळत आहे, तोपर्यंत आम्हास सांगणारे तुम्ही कोण शहाणे, असेही काहींना वाटेल. अल्पमती असलो तरी आम्हा सर्वांस बहुमताचा आधार आहे, अशा वेळी तुम्हा ‘विचारी’ अल्पसंख्यांस विचारतो कोण असे विचारले जाईल, ही शक्यताही नाकारता येत नाही. तरीही हे मुद्दे मांडले गेले पाहिजेत. जे काही सुरू आहे त्यातील हिणकसांबद्दल प्रश्न विचारले गेले पाहिजेत आणि रोष ओढवला जाण्याचा धोका पत्करूनही जे वाईट आहे त्याकडे लक्ष वेधले पाहिजे. कारण चांगले आणि वाईट यांची फारकत बहुसंख्य आणि अल्पसंख्य यामुळे होत नाही. ‘‘बहुसंख्य सहभागी आहेत म्हणून वाईट हे चांगले ठरत नाही’’ या तत्त्वज्ञ/लेखक लिओ टॉलस्टॉय यांच्या वचनाचा आधार घेऊन संस्कृतीचे प्रतीक गणल्या जाणाऱ्या सणांत सध्या जे काही सुरू आहे ते करणाऱ्यांच्या वृत्तीवर कोरडे ओढायला हवेत.
विश्वरूप सामावून घेणाऱ्या भगवान कृष्णाच्या बाललीलांचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या गोपाळकाल्याच्या उत्सवात अनेकांची हाडे मोडतात आणि काही जण दहीहंडीसाठी रचलेल्या मनोऱ्यावरून पडून मरतात. ज्ञानाचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या गणेशाच्या उत्सवातील मिरवणुकांचा गोंगाट ऐकला की बहिरेपण हे वरदान वाटते आणि दरवर्षी गणेशोत्सव हे वरदान अनेकांस देतो. इतकेच नाही. या मिरवणुकांतील प्रकाशयोजनेमुळे अनेकांस दृष्टिदोष निर्माण होतो. म्हणजे पंचेंद्रियांतील दोन- श्रवण आणि चक्षू- निकालात काढण्याची हमी एका उत्सवातून मिळते. त्यानंतरच्या उत्सवात देवीच्या नावे केल्या जाणाऱ्या जागरात नवरंगांतील वस्त्रप्रावरणांची खरेदी होऊन अर्थव्यवस्थेस चालना मिळणे, वर्तमानपत्रांतून बावळट छायाचित्रे प्रकाशित करण्याची संधी मिळणे इत्यादी सकारात्मक गोष्टी घडतात हे खरे. पण रात्रीच्या गरबा-नामे संस्कृती आविष्काराच्या आगेमागे जे आणि जितके काही घडते त्याविषयीच्या नाजूकपणामुळे त्याबद्दल न बोललेले बरे. या सगळ्याचा कळसाध्याय म्हणजे दिवाळी. खरे तर अंधारावर प्रकाशाचा विजय साजरा करणाऱ्या या उत्सवात एकेकाळी कमालीची कलात्मकता होती. मग ते आकाशदिवे असोत की रंगावली किंवा रंगीबेरंगी मिष्टान्न. शिशिराचे पायरव अंगावर रोमांच उभे करू लागले असताना पहाटेच्या दवात झगमगते आकाशदिवे आसमंताच्या जोडीने मनाचा कोपराही एकेकाळी उजळत. त्या आठवणींकडे स्मरणरंजन असे म्हणून त्यास नाके मुरडायची सोय असली तरी सणउत्सवाचे सध्याचे हिडीस स्वरूपही नाकारता येणारे नाही. अर्थात आनंदी उत्सव आणि सध्याचे वास्तव यातील फरक समजून घेण्याची बौद्धिक, सांस्कृतिक कुवतही असायला हवी हे खरे. तिचा अभाव असलेल्यांसाठी निखळ विनोदाने निर्माण होणारे नैसर्गिक हास्य आणि हल्ली मोबाइलमधील बिनडोकीय विनोदामागील कृत्रिम ख्खिख्खिख्खिकी हसणे असा दाखला द्यायला हवा. किंवा ज्येष्ठ मासाच्या मध्यास आकाशातील काळ्या ढगांची वाजत-गाजत मिरवणुकीने आलेली बरसात अनुभवणे आणि बिनचेहऱ्यांच्या सोसायट्यांतील रेनडान्स यांची तुलना करायला हवी. यावरूनही डोक्यात प्रकाश पडत नसेल तर सध्या दिवाळी उत्सवात जे काही सुरू आहे, ते अनुभवावे.
दिवाळीच्या पहिल्याच दिवशी फक्त मुंबईत आगीच्या/भाजण्याच्या घटनांत सहा तरुणांचा जीव गेला. तितकेच वा अधिकही होरपळून जखमी आहेत. आगीच्या विविध तक्रारींमुळे अग्निशमन दलास रात्रभर निमंत्रणे येत गेली. हवेचा दर्जा दिल्लीकरांनी आपणास हसावे इतका खालावला. हे फक्त दृश्य रूप. फटाक्यांच्या कानठळी आवाजांनी निसर्गाची, प्राणीपक्ष्यांची, वृद्धांची जी काही अवस्था झाली असेल तिची कल्पनाही करवत नाही. यातून सांस्कृतिक दारिद्र्यरेषेखालील आपले जगणे अधोरेखित होते. सण/समारंभ म्हटले की अंगावर काटा यावा, घरातून बाहेर पडू नये असे वाटावे आणि सामाजिक बेशिस्तीचा उन्माद पाहून धडकी भरावी असे वारंवार घडते. वास्तविक दिल्लीच्या तुलनेत समुद्रसान्निध्यामुळे मुंबईस निसर्गाची साथ अधिक आहे. वाहत्या वाऱ्यांमुळे धूळ/धुके मुंबईत सहज दूर होते. पण आपले कुकर्तृत्व इतके की आपल्या वर्तनामुळे या समुद्रसान्निध्याचाही उपयोग मुंबईसाठी होईनासा झाला. दिल्लीतील ३५ पैकी ३३ हवामान क्षेत्रांत या काळात हवेची गुणवत्ता इतकी घसरली की श्वासोच्छ्वास जणू विषप्राशन वाटावा. मुंबईदेखील आता त्या दिशेने निघालेली आहे. एक तर हे असे आपले सांस्कृतिक वर्तन आणि त्यात ‘रिडेव्हलपमेंट’च्या नावाने सुरू असलेले इमारत पाडकाम आणि बांधकाम. यामुळे मुंबईची हवा कमालीची प्रदूषित असून त्यामुळे आता मुंबईकरांना दिल्लीच्या हवेस नाके मुरडण्याची सोय राहिलेली नाही. हे वास्तव आपल्या सर्व शहरांस लागू होते. मुंबई वा दिल्ली हे केवळ दाखले. पुण्यासारख्या शहराचे हाल तर यापेक्षाही वाईट. ना धड आधुनिक शहर ना धड जुनेपुराणे. अनेक ठिकाणी बहुमजली इमारतींच्या पदराखाली जुने वाडे. त्यामुळे ना वाड्यात राहणारे आनंदी ना बहुमजली इमारतींना उंचीचे सुख. अशा कोंडीत हे असले कर्णकटू सणवार. परत त्याबाबत बोलायची सोय नाही. पुण्यासारख्या शहरास इतिहास तरी आहे. डोंबिवली, कल्याण अशा मुंबईजीवी शहरांस तर आहे नुसते वर्तमान. तेही बकाल आणि बेशिस्त. त्यामुळे शहरात नाव घ्यावे अशा एकुलत्या एका मार्गावर हजारो जण नटूनथटून गर्दी करतात तेव्हा मिरवण्याचा उन्माद इतका असतो की गेल्या १०० वर्षांत या एका रस्त्यापलीकडे आपणास काहीही मिळालेले नाही, हे कळण्याइतकेही भान त्या समुदायांस राहात नाही.
हे या सणांस ठरवून देण्यात आलेले आजचे स्वरूप. सण म्हणजे समुदाय आणि समुदाय म्हणजे कोणत्या ना कोणत्या कारणाने त्यातील एकेकाच्या जाणिवा चेतवण्याची संधी इतक्या सोयीस्कर नजरेनेच या सांस्कृतिक सोहळ्याकडे अलीकडे पाहिले जाते. झाडावरच्या कोवळ्या पालवीपेक्षा चैत्राची अलीकडे जाणीव होते ती नऊवारी नेसून, गॉगलभरल्या चेहऱ्यांनी मोटारसायकली चालवणाऱ्या ‘रणरागिणी’ वगैरेंच्या हास्यास्पद मिरवणुकांनी. श्रावण/भाद्रपद म्हणजे काय माहीत असेल/नसेल. पण बिनकाम्या तरुणांच्या मालमोटारीतून निघालेल्या झुंडीच्या झुंडी आणि कर्कश्श मिरवणुकांची वाहतूक कोंडी सणवार जवळ आल्याची आठवण करून देतात. नवरात्रात नव्या धान्याच्या कोंबांपेक्षा डोळ्यासमोर येतात साच्यातल्या मूर्तींप्रमाणे कोणी तरी सांगते म्हणून एका रंगात स्वत:स लपेटून घेणारे स्त्रीपुरुष. आणि आता ही दिवाळी आणि त्यातील हे असे अधिकाधिकांच्या समुदायाने फटाके फोडणे. यंदा तर या फटाक्यांवर भारतीयांनी तब्बल सात हजार कोटी रुपये इतका प्रचंड दौलतजादा केला. ही इतकी रक्कम मध्य प्रदेश, महाराष्ट्र आदी राज्यांतील महामार्ग उभारणीसाठी अलीकडे मंजूर केली गेली आणि बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगालात लोहमार्ग उभारणीसाठीही तितक्या रकमेची तरतूद केली गेली. लष्करासाठी अत्याधुनिक शस्त्रास्त्रे खरेदी करण्यासाठीही साधारण एवढ्याच रकमेचा विनियोग होणार आहे. आणि दिवाळीत आपण इतक्या रकमेचा धूर केला.
एकीकडे सौर ऊर्जा, विजेवरील वाहने इत्यादी उपाय योजायचे. का? तर प्रदूषण कमी व्हावे म्हणून. आणि दुसरीकडे सणासुदीच्या हंगामात स्वत:च्या हाताने हवा, पाणी, प्रकाश अशा सगळ्यांचेच प्रदूषण करायचे. इतकी वर्षे हेच सुरू होते हे खरे असले तरी आता हे जीवघेणे होऊ लागलेले आहे. सण सर्जनाचे, निर्मितीचे, आनंदाचे असतात. असायला हवेत. पण ते विनाशकारी, वेदनादायी आणि नकोसे होत असतील तर हा सणसंहार रोखणे हे अल्पमतातील शहाण्यांचे कर्तव्य ठरते. तेवढे शहाणपण अद्याप शिल्लक आहे काय?