Premium

सर्वकार्येषु सर्वदा : अक्षम मुलांना ‘पाठबळ’

पालकांनी पुढाकार घेऊन सुरू केलेल्या या शाळेने मुलांचे आणि पालकांचे पेणपर्यंतचे खेटे थांबविले आहेत.

information about ngo pathbal samajik vikas sanstha in alibaug
Pathbal Samajik Vikas Sanstha ngo

हर्षद कशाळकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिक्षण हक्क कायदा तर झाला, मात्र बौद्धिकदृष्टय़ा पुरेशा सक्षम नसणाऱ्या मुलांचे काय? अलिबागमधील अशा मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न ‘पाठबळ सामाजिक विकास संस्थे’च्या ‘राजमाता जिजाऊ विद्यामंदिरा’ने सोडविला आहे. पालकांनी पुढाकार घेऊन सुरू केलेल्या या शाळेने मुलांचे आणि पालकांचे पेणपर्यंतचे खेटे थांबविले आहेत.

सा मान्यपणे मुलांचा जन्म हा आई-वडिलांसाठी आनंदसोहळा असतो. त्यांच्या वाढीच्या प्रत्येक टप्प्यावर हा आनंद द्विगुणित होत जातो, मात्र काही पालकांसाठी हे टप्पे आनंदाऐवजी चिंताच वाढविणारे ठरतात. बाळाचे आकलन, त्याच्या हालचाली, त्याचे प्रतिसाद अन्य मुलांप्रमाणे नसतील, तर पालकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकते. आरोग्य तपासण्या केल्यावर लक्षात येते की बाळाच्या मेंदूची वाढ योग्य प्रकारे झालेली नाही. ते जन्मापासूनच बौद्धिकदृष्टय़ा सक्षम नाही. ‘आता पुढे काय?’ ही चिंता त्यांना सतावू लागते. अशा मुलांना स्वावलंबी करण्याचे, त्यांना रोजगारक्षम बनविण्याचे आणि आधार देण्याचे काम अलिबाग येथील ‘पाठबळ सामाजिक विकास संस्थे’चे ‘राजमाता जिजाऊ विद्यामंदिर’ करते. 

हेही वाचा >>> बुकबातमी : आजचे प्रश्न मांडणारी बुकर लघुयादी

अलिबाग तालुक्यात बौद्धिक अक्षम मुलांसाठी शाळा नव्हती. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांच्या पालकांना आपल्या मुलांना पेण येथे न्यावे लागत असे. तिथे विशेष मुलांसाठी दोन शाळा होत्या, मात्र मुलांना बसने ३० किलोमीटर दूर नेणे- आणणे अतिशय जिकिरीचे आणि खर्चीक होते. बसमध्ये एखादा मुलगा आक्रमक झाला, तर त्याला आवर घालताना पालकांची आणि आसपासच्या प्रवाशांची तारांबळ उडत असे. बस चालक- वाहकही या मुलांना बसमध्ये घेण्यास आडकाठी करत. ही रोजची ओढाताण कशी थांबवावी, हा प्रश्न या मुलांच्या पालकांना सतावत होता.

बौद्धिक अक्षम मुलांच्या सक्षमीकरणासाठी शाळेचे महत्त्व पालक जाणून होते. अशा मुलांसाठी अलिबागमध्येच शाळा असावी, याची जाणीव त्यांना होऊ लागली. यातूनच त्यांनी एकत्र येऊन अलिबाग येथे विशेष मुलांची शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. हे काम सोपे नव्हते. शाळेसाठी शिक्षक आणि शाळा चालवण्याचे कौशल्य गरजेचे होते. काही पालकांनी पुढाकार घेत या मुलांना प्रशिक्षण कसे द्यावे, याचा अभ्यास सुरू केला. त्यासाठीचे कौशल्य आत्मसात केले.

‘पाठबळ’ या सामाजिक संस्थेच्या पुढाकाराने २०१० मध्ये नेऊली येथे एका भाडय़ाच्या जागेत ‘राजमाता जिजाऊ विद्या मंदिरा’ची मुहूर्तमेढ रोवली गेली. शाळा सुरू करण्यासाठी पालकांनी पुढाकार घेतला. त्यास संस्थेचे अध्यक्ष सुरेंद्र ढवळे यांनी प्रोत्साहन दिले. शाळेसाठी मान्यता मिळवून दिली. सुरुवातीला शाळा सुरू करण्यासाठी लागणारा निधी स्वत:च उभा केला. प्रशिक्षित शिक्षकांची नियुक्ती करून मुलांना घडविण्याचे काम सुरू केले. सारे काही सुरळीत होत आहे, असे वाटत असतानाच, वर्षभरात जागा मालकाने जागा रिकामी करण्यास सांगितले.

शाळेचे व्यवस्थापन पाहणाऱ्या पालकांसाठी हा मोठा धक्का होता. सुरक्षित जागा मिळविणे गरजेचे होते. अखेर ‘आरसीएफ कंपनी’ने आपल्या वसाहतीतील एका इमारतीतील चार सदनिका या शाळेसाठी नाममात्र भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली. त्यामुळे तात्पुरता का होईना शाळेच्या जागेचा प्रश्न सुटला. गेली १२ वर्षे याच जागेत ही शाळा चालवली जाते.

हेही वाचा >>> चिंतनधारा : नामस्मरण कुणाचे व कशासाठी?

सुरुवातीला १० मुलांना घेऊन सुरू झालेल्या या शाळेत, आज ३६ मुले प्रशिक्षण घेत आहेत. ज्यात ५ ते ३५ वर्षे वयोगटातील मुलांचा समावेश आहे. सहा तज्ज्ञ शिक्षक मुलांना मार्गदर्शन करतात. १८ वर्षांवरील मुलांना व्यावसायिक प्रशिक्षणाची सोय आहे. सोमवार ते शुक्रवार १० ते ४ या कालावधीत ही शाळा चालवली जाते. आठवडय़ातून दोनदा फिजिओ थेरपी, स्पीच थेरपी दिली जाते. मानसोपचारतज्ज्ञ मुलांचे समुपदेशन करतात, अशी माहिती शाळेचे व्यवस्थापन पाहणारे विनायक देशपांडे यांनी दिली.  बौद्धिक अक्षम मुलांना स्वावलंबी करण्यावर शाळेत भर दिला जातो. पणत्या, शोभेची फुले, बुके, शुभेच्छापत्रे, अगरबत्ती, राख्या, कागदी पिशव्या, फाइल्स तयार करण्याचे प्रशिक्षण दिले जाते. या वस्तूंची बाजारात विक्री केली जाते. झेरॉक्स काढणे, प्रिंट्रआउट काढून देणे यांसारखी कामेही हे विद्यार्थी करतात. बालवाडी, पूर्वप्राथमिक, प्राथमिक, पूर्वमाध्यमिक आणि व्यावसायिक प्रशिक्षण अशा पाच टप्प्यांत प्रशिक्षण दिले जाते. मुलांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगले राहावे, यासाठी योगाभ्यास वर्गही चालविला जातो. सामान्यज्ञान, व्यवहारज्ञान वाढावे यासाठी विशेष प्रयत्न केले जातात.

पुस्तकी ज्ञानाबरोबरच मुलांच्या कलागुणांची जोपासना करण्यावर शाळेत भर दिला जातो. कारण हीच कला भविष्यात त्यांच्या रोजीरोटीची सोय करू शकते. संगीत, खेळ आणि नृत्य यांचे प्रशिक्षणही दिले जाते. शाळेत सण- उत्सव साजरे करून कला सादर करण्याची संधी दिली जाते. शिक्षण, पुनर्वसन आणि स्वावलंबन या त्रिसूत्रीवर शाळेची वाटचाल सुरू आहे. शारीरिक आणि बौद्धिकदृष्टय़ा अक्षम विद्यार्थ्यांसाठी होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धामध्ये या शाळेतील विद्यार्थी सहभागी होतात आणि बक्षिसेही मिळवतात, असे मुख्याध्यापिका सुजाता देसाई सांगतात. 

आज देशात शिक्षण हक्क कायदा अस्तित्वात आला आहे. मुलांना मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार प्राप्त झाला आहे, पण अशा विशेष गरजा असणाऱ्या मुलांच्या शिक्षणाबाबत शासनस्तरावरील उदासीनता कायम आहे. शासनाकडून शाळेला कोणत्याही प्रकारे मदत मिळत नाही. पालकच शाळेचा आर्थिक भार सोसतात, गरज पडल्यास पदरमोड करतात. काही सामाजिक संस्था या कामाला हातभार लावतात. आज सुदृढ मुलांना दर्जेदार शैक्षणिक सुविधा मिळाव्या, यासाठी शासनाकडून विविध उपक्रम राबविले जातात, पण त्याच वेळी बौद्धिक अक्षम विद्यार्थ्यांकडे शासनाचे लक्षच नाही, अशी खंत शाळेतील विद्यार्थ्यांचे पालक असलेले नागेश कुलकर्णी व्यक्त करतात.    

आपली बौद्धिकदृष्टय़ा अक्षम मुले आयुष्यभर इतरांवर अवलंबून राहतील, आपल्यामागे त्यांचे काय होईल, अशी काळजी पालकांना असते. त्यामुळे मुलांना स्वावलंबी करणे हे शाळेचे मुख्य उद्दिष्ट आहे. दुर्दैवाने अशा मुलांविषयीचा समाजाचा दृष्टिकोनही नकारात्मक असतो. अनेकजण त्यांना वेडे ठरवून मोकळे होतात. समाजातील अनुत्पादक घटक म्हणून त्यांच्याकडे पहिले जाते. अशा मुलांना रोजचे जेवण दिले, की आपली जबाबदारी संपली अशी मानसिकता दिसते. हा दृष्टिकोन बदलून मुलांमध्ये आणि पालकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचा वसा या शाळेने घेतला आहे.     

आज बौद्धिक अक्षम मुलांच्या निरनिराळय़ा क्षेत्रांतील पालकांनी एकत्र येऊन संस्थेसाठी निरपेक्ष भावनेने काम करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे समाजाची सद्भावना त्यांच्या पाठीशी आहे. आज तेच संस्थेचे मुख्य संचित आहे. नियतीच्या फटक्यामुळे मुलांची परिस्थिती काहीशी दुबळी असली तरी ते शाळेच्या पाठबळामुळे परिस्थितीपुढे हतबल राहिलेले नाहीत.  त्यांना आज सहानुभूतीची गरज नाही, गरज आहे ती फक्त प्रोत्साहन देऊन लढ म्हणण्याची..

शाळाबाह्य मुलांसाठी प्रयत्न

राजमाता जिजाऊ विद्यालयात सध्या ३६ मुले शिक्षण घेत आहेत. अलिबाग तालुक्यात आणखी ४० मुले आहेत, ज्यांना अशा शाळेची गरज आहे. पण जागेअभावी आम्ही त्यांना प्रवेश देऊ शकलो नाही. भविष्यात शाळेचा विस्तार करून या शाळाबाह्य ४० मुलांना आमच्या शाळेत सहभागी करून घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. या मुलांना शाळेत नेण्या- आणण्यासाठी वाहन सुविधा उपलब्ध करून देण्याचाही मानस आहे. 

– सुजाता देसाई, मुख्याध्यापक

संस्थेपर्यंत कसे जाल?

राजमाता जिजाऊ विद्यामंदिर, बिल्डिंग नंबर ए- ३०, तळमजला, आरसीएफ कॉलनी, कुरूळ, अलिबाग, जिल्हा रायगड-  ४०२२०९

धनादेश या नावाने काढावा

पाठबळ सामाजिक विकास संस्था

Pathbal Samajik Vikas Sanstha

धनादेश येथे पाठवा.. एक हजार किंवा त्याहून अधिक रुपयांची देणगी देणाऱ्यांची नावे ‘लोकसत्ता’त प्रसिद्ध केली जातील.

मुंबई कार्यालय

लोकसत्ता, संपादकीय विभाग,मफतलाल सेंटर, सातवा मजला, नरिमन पॉइंट, मुंबई – ४०००२१,  ०२२-६७४४०२५०

महापे कार्यालय  

संपादकीय विभाग, प्लॉट नं. ईएल १३८, टीटीसी इंड. एरिया, एमआयडीसी, महापे, नवी मुंबई – ४००७१०.  ०२२-२७६३९९००

ठाणे कार्यालय    

संपादकीय विभाग, कुसुमांजली बिल्डिंग, तिसरा मजला, गोखले रोड, नौपाडा, ठाणे.  ०२२-२५३९९६०७

पुणे कार्यालय      

संपादकीय विभाग, एक्स्प्रेस हाऊस,

प्लॉट नं. १२०५/२/६, शिरोळे रस्ता, पुणे- ४११००४.  ०२०-६७२४११२५

नागपूर कार्यालय       

संपादकीय विभाग, प्लॉट नं. ३८, अ‍ॅडिसन ट्रेड सेंटर, अंबाझरी, नागपूर – ४४००१०, ०७१२ झ्र् २२३०४२१

दिल्ली कार्यालय       

संपादकीय विभाग, द इंडियन एक्स्प्रेस बिल्डिंग, बी१/ बी, सेक्टर १०, नॉएडा- २०१३०१. ०१२०- २०६६५१५००

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Information about ngo pathbal samajik vikas sanstha in alibaug zws

First published on: 23-09-2023 at 04:06 IST
Next Story
राज्यकर्त्यांना मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचा विसर…