दत्तात्रय महादेवी पोपट पाचकवडे
१७ सप्टेंबर रोजी आपण मराठवाडा मुक्ती संग्राम दिवस साजरा करतो… १७ सप्टेंबर १९४८ रोजी स्वातंत्र्याच्या तब्बल १३ महिन्यानंतर मराठवाडा आणि हैद्राबाद संस्थान हे खऱ्या अर्थाने भारतमातेसोबत एकरूप झाले याची आपणास माहिती आहे. पण १७ सप्टेंबर रोजी असाच एक महत्त्वाचा दिवस आहे आणि भारतातच नव्हे, अन्य आशियाई देशांतही त्याकडे कायम दुर्लक्ष केले जाते. १७ सप्टेंबर हा ‘आंतरराष्ट्रीय सूक्ष्मजीव दिन’ (इंटरनॅशनल मायक्रोऑरगॅनिझम्स डे) म्हणून युरोपात मात्र आवर्जून साजरा केला जातो. वास्तविक सूक्ष्मजीव हे काय आहेत आणि याची ताकत काय आहे हे साऱ्या जगाने करोनाकाळात पाहिले आहे आणि याचा अनुभव आपल्याला आला आहे. हे सूक्ष्मजीव प्रत्येक क्षेत्रात आहेत असे म्हटले तरी वावग ठरणार नाही . वैद्यकीय क्षेत्राप्रमाणेच, कृषी क्षेत्रातील सूक्ष्मजीवांचा आपल्या जगण्याशी संबंध आहे! यामुळे भारतीयांनी या दिवसाबद्दल सजग व्हायला हवे. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जगाचा पोशिंदा असलेल्या आपल्या शेतकरी बांधवांचा मोठा वाटा मानवी आरोग्य टिकवण्याच्या कामी आहे, हे कोणी नाकारू शकत नाही. शेतीत पिकवलेले अन्नधान्य सकस असेल तरच आरोग्य टिकण्याची शक्यता वाढेल. ही सकस शेतीदेखील अनेक सूक्ष्मजीवावर अवलंबून आहे… जसे मराठवाड्याला निजामाच्या तावडीतून १७ सप्टेंबर रोजी सोडवले तसेच आपल्याला आज दिवसेंदिवस बेसुमार वापर होत असलेल्या हानिकारक रासायनिक शेतीपासून मुक्त होण्याची गरज आहे. आपल्याला आपल्या मातीतील सूक्ष्मजीव जे कसे जिवंत ठेवता येतील याकडे प्राधान्यक्रमाने लक्ष द्यायला हवे.  

हेही वाचा >>>जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्रीपद शोभेचे बाहुले!

आपल्या मातीची खरी गरज काय आहे हे आपण पाहत नाही. बेसुमार रासायनिक खते आणि औषधे यांचा आपण वापर करत आहोत आणि आपणच आपल्या मातीचा पोत बिघडवत आहोत, रासायनिक खतांचा बेसुमार वापर करून आपण भूमिप्रदूषण वाढवले आहे याचा फटका आपल्याला बसत आहे कारण यामुळे जमिनीतील सूक्ष्मजीवांची संख्या लोप पावत आहे आणि जे सूक्ष्मजीव आपल्या जमिनीला भुसभुशीत ठेवतात त्यांची आपण हत्या करत आहोत. आपल्या पणजोबा किंवा आजोबा यांनी लाकडी नांगराने शेती नांगरली आणि शेती केली मग आपल्या वडिलांनी शेती हा लाकडी नांगर सोडून लोखंडी नांगर वापरला आणि आत्ता आपली पिढी ही ट्रॅक्टरवर नांगरणी करत आहे… येणारी पिढी पुढील काही वर्षात जेसीबीच्या साह्याने नांगरणी करेल आणि काही काळाने आपल्या जमिनीत गवतसुद्धा उगवणार नाही अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते, कारण त्या जमिनीला सूक्ष्मजीवरहित जमीन हे आपणच बनवणार! 

त्यामुळे आज आपल्याला जैविक शेतीची खरी गरज आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही नैसर्गिक शेती/सेंद्रिय शेती/जैविक शेती बाबत स्वप्न पाहिले आहे आणि आपण सर्वांनी उज्ज्वल भविष्यासाठी त्यासाठी काम करायला हवे आवाहन केले आहे… पण याला आपला कृषिविभाग आणि त्यातील अधिकारी कितपत साथ देतात? उदाहरण द्यायचे झाले तर एखाद्या पिकावरील कीड रोग नियंत्रणासाठी जर उपाय द्यायचा असेल तर केवळ रासायनिक कीटकनाशक वापरण्याचा सल्ला दिला जातो (वास्तविक जैविक कीड नियंत्रणाबाबतच्या माहितीचा प्रसार करणे सहज शक्य आहे… काही कृषीविषयक दैनिकांतून तो अनेकदा होतही असतो, पण अधिकारी मात्र यापासून अलिप्त असतात!) 

हेही वाचा >>>सर्वकार्येषु सर्वदा : हुशार, गरजू विद्यार्थ्यांसाठी विद्यादानाचा निरंतर यज्ञ

समजा एखाद्या पिकाला हुमणी अळीचा प्रादुर्भाव आहे आणि त्या पिकाला आपण जर गांडूळखत दिले असेल तर निव्वळ कीडनाशक म्हणून आपण क्लोरोपायरियोफोस वा त्यासारख्या रासायनिक द्रावणाचा उपयोग करावा का? केलाच, तर ते गांडूळ जिवंत राहतील का, याचा शेतकऱ्यांनीही विचार करायला हवा. जर ‘बुव्हरिया बेसियाणा’ सारखी जैविक बुरशी ही जगाच्या पाठीवर आढळणाऱ्या कोणत्याही मातीत नैसर्गिकरीत्या वाढते आणि विविध कीटकांवर (संधिपाद किंवा ऑर्थोपॉड प्रजातींवर) परजीवी म्हणून कार्य करते आणि यामुळे देखील हुमणीचे नियंत्रण होते. दिवसेंदिवस याबाबत शेतकरी बांधवांना याचे महत्त्व पटत आहे त्या कारणामुळे आज ते स्यूडोमोनास, ट्रायकोडर्मा, मेटाऱ्हिझियम अनिसोप्लिए, व्हर्टिसिलम, अझाटोबॅक्टर, रायझोबियम अशी बुरशी-आधारित जैविक कीडनाशक आणि जैविक खते वापरत आहेत एक गोष्ट आपण कायम ठेवली पाहिजे ती म्हणजे बाह्यांगवर आपण फक्त विसंबून न राहता शेतीला जे महत्त्वपूर्ण आहे त्याकडे- अर्थात आपल्या माती कडे आपण लक्ष द्यायला हवे. फक्त आपण वर पाहून चालत आहोत आणि ठेच ही आपल्या पायाला लागत आहे. झाडाची पाने आणि फुले याकडे लक्ष देतो पण जमिनीकडे आपण लक्ष देत नाही. शेतीकडे व्यवसाय म्हणून पाहायला हवे जर आपल्याला येणाऱ्या पिढीचे भविष्य सुरक्षित ठेवायचे असेल तर आपल्याला शेतकरी बांधवांना सूक्ष्मजीव आणि त्याचे शेतीमध्ये होत असलेले फायदे आणि जैविक शेतीबाबत सजग करून योग्य त्या उपाय योजना करायला हव्यात.  

लेखक चिखर्डे (ता. बार्शी, जि. सोलापूर) येथील शेतकरी आहेत. datta.pachkawade233@gmail.com

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: International microorganism day marathwada and maharashtra need to get rid of harmful chemical farming amy