Premium

नरेंद्र मोदींचं स्वतःच्याच प्रतिमेवर एवढं प्रेम का आहे?

केदारनाथची गुहा असो, स्वतःच्याच घरात घेतलेली आईची भेट असो वा कोविड लसीकरण प्रमाणपत्रावरचं छायाचित्र असो… नरेंद्र मोदी यांचं स्वतःच्या प्रतिमेवरचं प्रेम हा नेहमीच चर्चेचा विषय ठरत आला आहे. यूजीसीने महाविद्यालयांना सेल्फी पॉइंट उभारण्याची शिफारस केल्यामुळे उद्भवलेला वाद आता शमला असला, तरीही त्यानिमित्ताने मोदींचं प्रतिमासंवर्धन पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.

Narendra Modi love image topic of discussion
नरेंद्र मोदींचं स्वतःच्याच प्रतिमेवर एवढं प्रेम का आहे? (संग्रहित छायाचित्र)

झालं असं, की विद्यापीठ अनुदान आयोगाने महाविद्यालयांना आपापल्या आवारांच्या दर्शनी भागात सेल्फी पॉइंट्स उभारण्याची शिफारस केली. त्याबरोबर एक ड्राइव्हची लिंकही होती. त्यात सेल्फी पॉइंट्सची संकल्पचित्र होती. नरेंद्र मोदी यांची भलीमोठी प्रतिमा आणि त्याबरोबर भारताने विविध क्षेत्रांत केलेल्या प्रगतीचा आढावा, असं या संकल्पचित्रांचं स्वरूप होतं. या सेल्फी पॉइंट्सवर सेल्फी काढून घेतल्याने विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल, अशी त्यामागची कल्पना असल्याचं म्हटलं होतं, पण हा २०२४च्या निवडणूक प्रचाराचा भाग असल्याची टीका होऊ लागली आणि सोमवारी (४ डिसेंबर) या ड्राइव्हमधील संकल्पचित्रं नाहीशी झाली. हा वाद आता शमला असला तरीही मोदींचं प्रतिमासंवर्धन आणि त्यासाठी सेल्फी, छायाचित्रं, वेशभूषेचा केला जाणारा वापर हा २०१४ पासून आजवर अनेकदा चर्चेचा विषय ठरला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
YouTube Poster

सेल्फीमुळे एफआयआर

२०१४ साली भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असताना मतदानानंतर मोदींनी टिपलेला सेल्फी वादात सापडला होता. त्यांनी पक्षाचं चिन्ह कमळ हातात घेऊन सेल्फी काढून तो समाजमाध्यमांवर पोस्ट केला होता. तेव्हा निवडणूक आचारसंहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात एफआयआर नोंदविण्यात आला होता. मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर वर्षभरातच काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी त्यांच्या या सेल्फी प्रेमावर टीका केली होती. मोदींनी सेल्फलेस गव्हर्नमेंटचे आश्वासन दिले होते, वर्षभरानंतर सेल्फीप्रेमी पंतप्रधान पाहायला मिळत आहेत, अशा शब्दांत त्यांनी मोदींच्या स्वप्रतिमेच्या प्रेमावर बोट ठेवलं होतं.


नरेंद्र मोदी लिहिलेला १० लाखांचा सूट

त्यानंतर काहीच दिवसांत मोदींचं स्वप्रेम पुन्हा एकदा चर्चेत आलं आणि यावेळी निमित्त होतं, त्यांचा नरेंद्र मोदी अशी अक्षरं लिहिलेला सूट. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा नवी दिल्लीला आले असता, त्यांच्या भेटीवेळी पंतप्रधानांनी हा सूट परिधान केला होता आणि तो तब्बल १० लाख रुपयांचा असल्याची चर्चा होती. आपल्या साधेपणाचे आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गातून आल्याचे दाखले देणाऱ्या मोदी यांच्या या अतिमहागड्या वेषभूषेवर त्यावेळी चौफेर टीका झाली होती.

जैसा देश वैसा भेस

मोदींचे पोषाख हा नेहमीच चर्चेचा विषय ठरत आला आहे. ‘जैसा देश वैसा भेस’ हा उपदेश ते फारच गांभीर्याने घेत असल्याचं वारंवार दिसून आलं आहे. त्यांच्या पगड्या, टोप्या, गमछे हा बातमीचा विषय होतो. भारतात वर्षानुवर्षे वापरलं जाणारं बिनबाह्यांचं जॅकेट नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर अचानक मोदी जॅकेट ठरलं आणि त्याला असलेली मागणी लक्षणीयरित्या वाढली, हा त्याचाच परिणाम. एका दिवसात चार कार्यक्रम असतील, तरीही मोदी प्रत्येक कार्यक्रमाला वेगळ्या पोषाखात दिसतात.


झकरबर्ग, जरा बाजूला व्हा!

मोदी आणि कॅमेरा यांच्यामध्ये आल्याचे परिणाम थेट फेसबुकचा संस्थापक मार्क झकरबर्गलाही भोगावे लागले होते. २०१५मध्ये मोदी फेसबुकच्या मुख्यालयात गेले होते. तेव्हा कॅमेरा आणि मोदींच्यामध्ये आलेल्या झकरबर्ग यांना त्यांनी हाताने बाजूला केल्याचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता. ट्विटर प्रतिक्रियांनी ओसंडून वाहू लागलं होतं. अमेरिकेतील प्रसारमाध्यमांनीही मोदींच्या कॅमेराप्रेमाची दखल घेतली होती.


गुहेत ध्यान करतानाही फोटो

ध्यानधारणा करतानाही फोटो काढण्याची संधी मोदींना दवडता आली नव्हती. २०१९च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी मोदी हृषिकेश येथील गुहेत ध्यानधारणेसाठी गेले होते, मात्र तिथूनही त्यांचे कशायवेशधारी साधूप्रमाणे वेशभूषा केलेले फोटो व्हायरल झालेच.


मातोश्रींचीही भेटही चर्चेचा विषय

मोदी त्यांच्या मातोश्रींना भेटायला जातात किंवा त्यांच्याबरोबर भोजनाचा आनंद घेतात तेव्हाही त्यांची छायाचित्रं ताबडतोब प्रसारित होतात. आपल्याच कुटुंबियांबरोबर आपल्याच घरी जेवतानाची नेत्यांची छायाचित्रं टिपली जाणं आणि ती व्हायरल होणं ही तशी नित्याची बाब नसल्यामुळे नेटिझन्सही त्यांचं अगदी ‘वाजतगाजत’ स्वागत करतात.


कोविड प्रमाणपत्रावर प्रतिमा

मधल्या काळात कोविड लसीकरण प्रमाणपत्रावर मोदींचं छायाचित्रं झळल्यावरूनही टीकेची झोड उठली होती. लसीकरण मोहीम सरकारची आहे, तर मोदींचा फोटो का, असा प्रश्न उपस्थितीत केला गेला होता.

स्टेडियमपासून योजनांपर्यंत सर्वत्र

मार्च २०२३ मध्ये झालेल्या एका सोहळ्यात बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी नरेंद्र मोदींना, नरेंद्र मोदी स्टेडियमवर, नरेंद्र मोदींचंच छायाचित्र भेट दिलं होतं. त्यावर काँग्रेससह विविध विरोधीपक्षांनी टीका केली होती. मोदी हे नार्सिसिस्ट आहेत, त्यांना ‘मी’, ‘माझे’ ‘माझ्यामुळे’ याशिवाय काहीही दिसत नाही, असे ताशेरे विरोधकांनी ओढले होते.

विविध योजना आणि ठिकाणांना नरेंद्र मोदींचं नाव दिलं गेलं आहे. गुजरातमधल्या मणीनगर इथल्या एका पालिका रुग्णालयाला नरेंद्र मोदी वैद्यकीय महाविद्यालय असं नाव देण्यात आलं आहे, तर सिक्कीमधल्या सीमाभागातल्या पूर्वी जवाहरलाल नेहरू रोड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रस्त्याचं नामकरण आता नरेंद्र मोदी मार्ग असं करण्यात आलं आहे. ‘नमो’ नावाने तर अनेक योजना आहेत, मात्र ती नरेंद्र मोदी यांच्या नावातील अद्याक्षरं आहेत की नमन या अर्थी आहेत, यात अस्पष्टता आहे.

चंद्रयान-२च्या अपयशानंतर तत्कालीन इस्रो प्रमुख के. सिवन यांचं सांत्वन असो वा नुकत्याच झालेल्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचा अंतिम सामन्यात झालेला पराभव असो, मोदींचं सांत्वनही नेहमीच चर्चेचा आणि काहीशा टीकेचाही विषय ठरत आले आहे.

देशात सर्वत्र आणि सदैव मोदी दिसत असतात. कधी योग करताना, तर कधी मोरांच्या सहवासात रमलेले असतात. राजकारणात प्रतिमासंवर्धनाचं महत्त्व कोणीही नाकारणार नाही, मात्र प्रतिमा शब्दशः नव्हे, तर अर्थशः निर्माण करावी लागते. ‘रॉकस्टार’ या हिंदी चित्रपटात एक वाक्य आहे, ‘इमेज इज एव्हरिथिंग, एव्हरिथिंग इज इमेज…’ असं होऊन चालत नाही, हे मात्र खरं!


vijaya.jangle@expressindia.com

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Narendra modis love for his image has always been a topic of discussion dvr

First published on: 05-12-2023 at 11:34 IST
Next Story
नौदलाने असे यशस्वी केले ‘ऑपरेशन जॅकपॉट’…