तात्यासाहेब काटकर
वर्षानुवर्षे, पिढ्यानपिढ्या चालत आलेली पंढरीची वारी कधीच चुकू नये ही वारकऱ्यांची भावना असते. कधी एकदा पंढरीला जातो आणि पांडुरंगाचे दर्शन घेतो ही भावना मानस साद घालत असते. म्हणून तर जिवाचा आटापिटा करून तिथपर्यंत जाण्याची ओढ, तळमळ! यंदा पंढरीत दाखल होणाऱ्या वारकऱ्याची संख्या १५ लाखांवरून २७ ते २८ लाखांवर गेली. पण आजही सोहळ्यातील विधी, परंपरा, पद्धती आणि व्यवस्थापन शैली तीच आहे. इथे गर्दी असली तरी बंदोबस्ताला महत्त्व नाही… तरीदेखील काही अनुचित प्रकार नाहीत, कारण ज्याचे त्याचे काम जो तो करीत राहतो. या सगळ्यांचे ईप्सित एकच- पांडुरंगाचे दर्शन !
वारीचे पारंपरिक स्वरूप कसे आहे? ‘पंढरीची वारी आहे माझे घरी । आणिक न करी तीर्थव्रत ।।’ अशा श्रद्धेपायी पंढरपुरात राज्यभरातून वारकरी दाखल होतात. काहींना विठुरायांचे थेट दर्शन होते, काही दुरूनच मुखदर्शन घेतात, बरेच जण नामदेव पायरी आणि विठुरायाच्या मंदिर कलशाचे दर्शन झाले तरी कृतकृत्य झालो, या भावनेने आनंदित होऊन गावाची वाट धरतात. या वारीसाठी निमंत्रण पत्रिका नाही, राहण्या-खाण्याच्या सोयींची हमी देणारा कुठलाही संयोजक नाही, कोणाचा कोणावर रागरुसवा नाही, तर कुठल्याही वाहनाची निवड अथवा वाहनाचा हट्टही नाही!
इरावती कर्वे यांनी म्हटले आहे, ‘वारीला येणाऱ्या लोकांचे राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र’ महाराष्ट्रातील समाजाचे एकत्र दर्शन घ्यायचे असेल तर वारीसारखे साधन नाही. वारीत पारंपरिक ज्ञानाची जोपासना, संवर्धन व पुढच्या पिढीत संक्रमण ही शिक्षणाची तीन अंगे प्रकर्षाने आहेत. धर्म व तत्त्वज्ञान याखेरीज गायन, नर्तन व नाट्य या तीन्ही कलांचा समावेश वारीत असतोच. शिवाय सर्व समाजाचे एकत्र जीवनही त्यात आहे. वारीच्या सोहळ्याचा मूलभूत संदेश प्रेम, भक्ती, शांती आणि मानवतेची समानता हा असतो. म्हणून आचार, विचार आणि उच्चार यातली शुद्धता, पारदर्शकता आणि प्रामाणिकपणा यांचे प्रतीक म्हणून वारकऱ्यांकडे बघितले जाते.
चौदाव्या शतकाचा कालखंड मोठा विचित्र होता. वाढती सामाजिक विषमता, धर्मातील नको तेवढे कर्मकांड, जातीभेद आणि यामुळेच संतांची मांदियाळी जमली, त्यांनी कर्मकांडाला दूर सारण्याचा प्रयत्न वारीतून केला. एकही जात अशी राहिली नाही की ज्यात वारकरी संत झाले नाहीत, सगळ्यांना सामावून घेऊन वारीचा महिमा सर्वांनी वृद्धिंगत केला.
परिवर्तनशीलता हा जगाचा नियम आहे आणि कालमानानुसार बदल आपणही स्वीकारले पाहिजेत यात शंका नाही. आज आधुनिक काळात वारीचे स्वरूपही आधुनिक झाले आहे, साधने आणि माध्यमेही बदलली आहेत. सोशल मीडिया, टिव्ही व चित्रपट यांच्या माध्यमातून वारी घरोघर पोहोचली व लोकांना वारीची दृश्ये दिसू लागली. वारीबद्दल कुतूहल वाढले, उत्सुकता निर्माण झाली.
हल्ली वारीतील फोटो व्हॉट्सअपवर, फेसबुकवर ताबडतोब अपलोड होतात व क्षणात वारीचा आनंद ऑनलाइन जगभर पोहचतो. वारीत सहभागी झालेल्या पत्रकारांमुळे वारीच्या बातम्या, फोटो, व्हिडिओ सर्व काही बघायला मिळते. वारीचे कव्हरेज मंग उभे रिंगण गोल रिंगण, विविध ठिकाणच्या पालखी मुक्कामाची सोय व इतर गोष्टीचे कव्हरेज करता यावे म्हणून चित्रवाणी वाहिन्या व इतर माध्यमांची धावपळ बघायला मिळते. वारकऱ्यांबरोबर परदेशी नागरिक आणि आता तर पुढाऱ्यांची वारीत चालण्यासाठी स्पर्धाच लागली आहे. त्यामुळे वारी आता सोहळ्यापेक्षा ‘इव्हेंट’ झालेली आहे.
अर्थात एवढे होऊनही, वारी ही कधीही राजकीय पुढाऱ्यांची होणार नाही. जोवर नित्यनेमाने वारीला येणारा वारकरी हा श्रध्दाळू, शेतकरी, मजूर, कष्टकरी आहे, त्याचे पांडुरंगाशी अतूट नाते आहे, तोवर माध्यमखोर किंवा प्रसिद्धीखोर लोकांच्या हस्तक्षेपामुळे वारकऱ्यावर काही परिणाम होईल असेही वाटत नाही. पण आज वारी बदलून डिजिटल झाली असताना बदल झपाट्याने घडत आहे. त्यात श्रद्धेचा भाग किती हा प्रश्न पडतो. वारी चालू झाल्यापासून ते संपेपर्यंत म्हणजे २१ दिवस उत्तम खाण्यापिण्याची व्यवस्था, कपडे, छत्री, राहण्याची व्यवस्था म्हणून काही जण वारीसाठी येतात. पूर्वीचा रिंगण सोहळा आणि आताचा रिंगण सोहळा फार बदलला आहे. पूर्वी जिथे रिंगण असे तिथे आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थ हाजारोंच्या संख्येने रिंगण पाहण्यासाठी व त्यात धावण्यासाठी येत होते. परंतु काळ बदलला आता लोकांना पांडुरंगासाठी व रिंगणात धावण्यासाठी वेळच नाही. आता रिंगण ‘पाहण्यासाठी’ व धावण्यासाठी सोबतचे वारकरीच असतात. पालखीचे दर्शन तर जेवण करून पाय मोकळे करायला यायचे आणि दर्शन घेऊन जायचे इतकेच. थोडक्यात शतपावली सारखे. वारीत पांडुरंगाच्या भेटीसाठी जी आतुरता होती ती आता राहिली नाही. त्यामुळेच आजच्या काळात वारी ही एक इव्हेंट झाली आहे.
(लेखक करिअर समुपदेशक असून शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. )
tatyasahebkatkar28@gmail.com