पुण्याचा गणेशोत्सव म्हणजे संस्कृती आणि परंपरेचे संचित समृद्ध करणारा लोकोत्सव. या उत्सवातून गणेश मंडळे सामाजिक भान, जिव्हाळा, अवतीभवतीच्या माणसांच्या दुःखाला वाचा फोडत आलेली दिसतात. त्याचे बाळकडू अर्थातच मिळते ते गणेशोत्सवातील मंडपात! समाजकारण आणि राजकारणाची बालवाडी म्हणूनही गणेश मंडळे ओळखली जातात. पुण्यातील या गणेश मंडळरुपी शाळांंतून अनेक राजकीय नेत्यांनी राजकारणाचा श्रीगणेशा करून दिल्ली गाठली आहे. त्यामुळे पुण्यातील गणेशोत्सव हा संस्कृतीरक्षणाबरोबरच कार्यकर्ते घडविणारी चालतीबोलती शाळा बनला आहे. आजवर अनेक मातब्बर मंडळींनी येथील गणेश मंडळापासून सामाजिक कार्याला आरंभ केलेला दिसतो. मंडळाच्या कार्यकर्त्यापासून सुरू होणारा हा प्रवास टप्प्याटप्प्यांवर बहरत जात असतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मंडळाच्या अध्यक्षपदापासून सामजिक कार्याचा अंगी घेतलेला वसा हा हळूहळू व्यापक होतो. अध्यक्षापासून एकेक पाऊल पुढे टाकले जाते आणि ध्येयाकडे वाटचाल सुरू होते. त्याची पहिली पायरी म्हणजे नगरसेवक पद. तेथून आमदार, खासदार आणि मंत्रीपदापर्यंत पोहोल्यावरही ‘आपले मंडळ’ ही माणसे कधीही विसरत नाहीत. त्यामुळे गणेेशोत्सवाच्या मिरवणुकीत राजकारणातील पदांंचे, मानसन्मानाचे जोडे बाजूला ठेऊन ही सर्व मंडळी गणेश मंडळाच्या सामान्य कार्यकर्त्याच्या भूमिकेत रस्त्यावर उतरत आपल्या माणसांंत मिसळत असतात. अर्थातच ही किमया घडविण्याची ताकद गणेशोत्सवात आहे. त्यामुळे पुण्याच्या गणेश मंडळांंच्या माध्यमातून सांस्कृतिक एकसंधपणातून जनसामान्यांच्या जगण्याला नवा अर्थ आणि राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना नवी उमेद मिळत आली आहे.

हेही वाचा : ग्रंथसंपदेचे राखणदार

पुण्याचे राजकरण आणि राजकीय नेतृत्व यांंच्यावर प्रकाशझोत टाकल्यास या प्रत्येकाच्या मुळाशी गणेश मंडळ आणि गणेशोत्सव असल्याचे पहायला मिळते. माणसांना जगण्याचे बळ देणारा हा उत्सव परस्पर संबंधांतून मानवी मनाचा आविष्कार घडवत आला आहे. त्यातून अभिव्यक्त होणारा अनुभवाचा कसदारपणाही जाणवतो. अनंत जाणिवा वेचणारी, जीवनातील मूलभूत प्रश्नांकडे गंभीरपणे बघण्याची दृष्टी देणारा हा उत्सव लोकाभिमुख विचार करायला लावत आला आहे. त्यातूनच राजकीय नेतृत्त्व उभी राहिली आहेत.

मंडळांंमध्ये काम करताना संकटाच्या काळात धावून जाणाऱ्या कार्यकर्त्यांना समाजातील होरपळणारी मने, त्यांच्या दुःखाची जाणीव ही मंडळात प्रत्यक्ष काम करताना होते. समस्यांच्या चक्रव्यूहात अडकलेल्या माणसांना त्यातून बाहेर काढण्याचे काम गणेश मंडळांच्या माध्यमातून कार्यकर्ते करत असतात. समाजातील वास्तवता, सामाजिक विषमता, दांभिकता, अत्याचार, समाजातील विकृतता, सामान्य माणसाची विविध पातळ्यांवर होणारी होरपळ टिपण्याचे ज्ञान गणेश मंडळाच्या माध्यमातून मिळत असते. त्यातून जगण्याचा नवा अर्थ दिसून सामान्यांच्या हक्कासाठी पेटून उठणारे नेतृत्त्व उदयास येते.

अशी नेतृत्व पुण्यात उभी राहिली. त्यामुळे पुण्यातील गणेशोत्सवाला आणि राजकीय नेतृत्वाला सामजिकतेचे वलय लाभले आहे. पुण्यातील गणेश मंडळांंच्या मुशीतून तयार झालेले राजकीय नेतृत्त्व हे कायम जनजाणिवेची निष्ठा असलेले, माणसांना जगण्याचे बळ देणारे, दीन दुबळ्यांच्या आंतरिक मनाला चैतन्याची जाणीव करून देणारे राहिले आहे. संवेदना आणि सुखदुःख यांचे मिश्रण असलेल्या या नेत्यांनी पुण्याचे राजकारणही तितकेच वास्तवतेशी नाते सांगणाचे आणि संस्कारप्रणित केले आहे. याचे श्रेय अर्थातच गणेशोत्सव आणि गणेश मंडळांना जाते. पुण्यातील आजवरच्या राजकीय नेतृत्वांंचा धांडोळा घेतल्यास प्रत्येकाच्या समाज जीवनाचे मूळ हे गणेश मंडळाशी येऊन मिळते. त्यातून नातेसंबंधांंची वीण घट्ट विणली जाते.

हेही वाचा : दोन नव्या धोरणांतून विज्ञानाची साथ आणि विकासाची वाट…

गणेश मंडळाचा कार्यकर्ता ते लोकप्रतिनिधी असा नावलौकिक मिळविलेल्या पुण्यातील आतापर्यंतच्या खासदारांपैकी काही मोजकी उदाहरणे सांगता येतील. माजी खासदार सुरेश कलमाडी यांनी ‘पुणे फेस्टिव्हल’च्या माध्यमातून पुण्यातील गणेश मंडळांशी संंपर्क ठेवत पुण्याचे नेतृत्त्व अनेक वर्षे हाती ठेवले होते. ऐतिहासिक परंपरा लाभलेला पुण्याचा गणेशोत्सव पुणे फेस्टिव्हलच्या माध्यमातून सातासमुद्रापार पोहोचविण्याचे काम त्यांनी केले. हे काम करताना गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याला बळ देत त्यांनी पुण्याच्या राजकारणावर एकहाती अंंमल ठेवला. १९९६ पासून २०१४ पर्यंंत पुण्याच्या राजकारणाचे पान हे कलमाडी यांंच्याशिवाय हलत नव्हते. गणेश मंडळांंची ताकद ओळखून त्यांना प्रोत्साहन आणि पाठिंबा देत कलमाडी यांनी पुण्याच्या राजकारणावर वर्चस्व राखले. गणेश मंडळांंच्या मुशीतून तयार झालेल्या पुण्यातील खासदारांंमध्ये दिवंगत खासदार गिरीश बापट हे होते. नगरसेवक पदापासून सुरू झालेल्या त्यांंच्या राजकीय प्रवासामध्ये संघटनात्मक कामकाजाबरोबरच गणेश मंडळाच्या सामान्य कार्यंकर्त्यापासून ते पदाधिकाऱ्यांंपर्यंंत सर्वांशी असलेली मैत्रीची नाळ ही त्यांना राजकारणात उपयोगी पडली. कसबा विधानसभा मतदार संघासारख्या शहराच्या मध्यवर्ती भागाचे नेतृत्त्व ते करत होते.

या भागात पुण्यातील बहुतांश ऐतिहासिक परंपरा असलेली मंडळे आहेत. त्या मंडळांंच्या साथीने त्यांनी राजकारण आणि समाजकारण केले. खासदारांंपैकी माजी खासदार अनिल शिरोळे, प्रदीप रावत यांसारखे खासदारपदापर्यंत पोहोचलेल्यांच्या नेतृत्वाचा पाया हादेखील गणेश मंडळे आणि संघटनात्मक कामापासून झाला. विद्यमान खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या सामाजिक कार्याचा श्रीगणेशा हा गणेश मंडळातूनच झालेला आहे. त्यामुळेच पुण्यातल्या गणेश मंडळाच्या मंडपापासून सुरू झालेला राजकारणाचा प्रवास हा संसदेमध्ये पुणेकरांचे प्रश्न मांडण्यापर्यंत पोहोचलेला दिसतो. पुण्यातील काही आमदारांंच्या सामाजिक जीवनाची सुुरुवात ही गणेश मंडळ आणि गणेशोत्सव यातूनच झाली आहे. त्यामध्ये दिवंगत आमदार वसंत थोरात यांंचा उल्लेख करावा लागतो. ते पुण्यातील अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष होते. १९७५-७६ या वर्षी त्यांनी पुण्याचे महापौरपद भूषविले होते. तसेच काँग्रेसचे शहराध्यक्षही होते. मंडईमध्ये येणाऱ्या शेतकरी आणि गरीब नागरिकांना मदत व्हावी म्हणून १९७४ मध्ये त्यांनी मंडईत झुणका भाकर केंद्र सुरू केले होते. १९९१ मध्ये ते आमदार झाले. अखिल मंडई मंडळाच्या माध्यमातून त्यांंची राजकीय कारकीर्द घडली. गणेश मंडळात घडून आमदार पदापर्यंत पोहोचलेल्या आमदारांंपैकी काही मोजक्या आमदारांंमध्ये शिवाजीनगरचे माजी आमदार शशिकांत सुतार, दिवंंगत आमदार विनायक निम्हण, कोथरुडचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, पर्वतीचे माजी आमदार रमेश बागवे, कसब्याचे विद्यमान आमदार रवींद्र धंंगेकर आदींचा नामोल्लेख करता येईल.

हेही वाचा : पेन्शनरांच्या पुण्याचे हे असे काय झाले?

पुण्यातील नगरसेवकांपैकी बहुतांश नगरसेवकांंचे एक गणेश मंडळ असतेच. त्या मंडळाच्या आधारावर ते राजकारणात नशीब आजमावत असतात. त्यामुळे गणेश मंडळे ही पुण्याच्या राजकारणाच्या जीवनधमन्या झाली आहेत. राजकीय नेतृत्वाला जनजाणिवेची निष्ठा आणि जनसमुदायाचे प्रतिनिधित्त्व करण्याचे जीवनशिक्षण गणेशोत्सवाच्या काळात मिळत असते. अगदी वर्गणी गोळा करणे, सजावट, रोजचे नियोजन ते विसर्जन मिरवणूक हे काम दहा दिवसांत करत असताना येणाऱ्या अडचणी आणि त्यातून मार्ग काढण्याचे मंडळाच्या कार्यकर्त्यांचे कसब वाखाणण्याजोगे असते. त्यावेळी या राजकीय नेतृत्त्वाचा कस लागतो. त्यातून जनसामान्यांच्या अगतिकेला नवा अर्थ त्यांंना कळतो आणि आपल्या हक्काची जाणीवही होते. विपरित परिस्थितीतही संवेदनशील मनांंचे दर्शन गणेशोत्सवाच्या काळात पहायला मिळतो. गणेश मंडळे गणेशोत्सवाच्या काळातच नव्हे तर एरवीही अखंडपणे कार्यरत असतात. आपत्तीच्या काळात कायम सहकार्यासाठी मंडळांंचे कार्यकर्ते पुढे असतात. आत्मिक प्रेरणांशी एकनिष्ठ राहून समाजधर्म पाळणारी कार्यकर्त्यांची ही फळी समाजाला भावनिक आधार देत आली आहे. गणेशोत्सवात मंडळाच्या मंडपात मिळणारे हे जीवनाच्या वास्तवतेचे ज्ञान पुढे समाजकारण करताना उपयोगी पडते. त्या जोरावरच राजकीय नेतृत्त्व उदयास येतात. त्यामुळे पुण्याचा गणेशोत्सव हा कार्यकर्ता घडविणारा अखंड कारखाना झाला आहे.
sujit.tambade@expressindia.com

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune youth learn politics from the ganeshotsav mandal css
Show comments