सुभाष देसाई

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिवसेनेने पक्षाच्या स्थापनेपासूनच दसरा मेळाव्याची परंपरा जपली आहे. पहिल्या मेळाव्याला आता जवळपास ५६ वर्षे लोटली आहेत. या पार्श्वभूमीवर पहिल्यावहिल्या दसरा मेळाव्याचे पुनरावलोकन..

शिवतीर्थावर (शिवाजी पार्क) पुन्हा एकदा शिवसेनेचा दसरा मेळावा भरणार आहे. करोनाच्या महासाथीमुळे गेली दोन वर्षे हा मेळावा घेता आला नव्हता. त्यापूर्वी दोन ते तीन वर्षे वगळता १९६६ पासून ५६ वर्षे याच मैदानावर याच पक्षाचा म्हणजे शिवसेनेचा हा वार्षिकोत्सव प्रचंड उत्साहात होत आला आहे. १९८५ च्या सुमारास खूप पाऊस पडल्याने मैदान चिखलाने भरले होते आणि २००९ व २०१४ मध्ये निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे मेळावे होऊ शकले नव्हते.

मी शिवसेनेच्या पहिल्यावहिल्या दसरा मेळाव्यातील भाषणे शिवतीर्थावरील प्रचंड गर्दीत उभे राहून ऐकली. मात्र तो दिवस दसऱ्याचा नव्हता आणि तारीख होती ३० ऑक्टोबर १९६६. त्यापूर्वी १९ जून रोजी ‘कदम मॅन्शन’ या ठाकरे कुटुंबाच्या निवासस्थानी श्रीफळ वाढवून शिवसेनेची स्थापना झाली होती. मुंबईतील मराठी माणसे नोकऱ्यांपासून कशी दूर फेकली गेली आहेत, याच्या याद्याच ‘मार्मिक’मध्ये ‘वाचा आणि थंड बसा’ या शीर्षकाखाली दर आठवडय़ाला प्रसिद्ध झाल्या आणि खळबळ उडाली. लोक बाळासाहेबांना भेटून संताप व्यक्त करू लागले. याची दखल घेऊन बाळासाहेबांनी आणखी कंपन्यांच्या याद्या प्रसिद्ध केल्या. मात्र आता शीर्षक बदलून ‘वाचा आणि उठा’ असे केले होते. या याद्यांमध्ये बहुतेक परप्रांतीय आणि औषधाला एखाददुसरे नाव मराठी असे. असंतोष आणखी वाढला. घरातील व घराबाहेरील वाढती गर्दी पाहून प्रबोधनकारांनी बाळासाहेबांना विचारले- ‘‘या गर्दीला आकार उकार देण्यासाठी काही संघटना वगैरे काढण्याचा विचार आहे की नाही?’’ बाळासाहेब म्हणाले, ‘‘मी तोच विचार करत आहे!’’ त्यावर प्रबोधनकार म्हणाले, ‘‘संघटना काढणार असाल तर नाव मी सुचवतो- आणि ते नाव असले पाहिजे – शिवसेना!’’ मग मुहूर्त वगैरे न पाहता घरातील व घराबाहेर जमलेल्या काही लोकांच्या उपस्थितीत ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय!’ अशी घोषणा देत सहदेव नाईक यांच्या हस्ते शिवसेनेच्या स्थापनेचा नारळ फुटला. ‘मार्मिक’च्या पुढच्याच अंकात शिवसैनिक नोंदणीची घोषणा देण्यात आली. २५ पैशांना एक असे नोंदणी अर्ज वाटण्यात आले. अर्ज कमी पडू लागले, एवढी मागणी होती. मग प्रत्येकाला थोडे थोडे अर्ज दिले जाऊ लागले. आम्ही गोरेगावच्या काही जणांनी अर्जाचे नमुने आणले.

संघटनेची माहिती देण्यासाठी एखादा मेळावा घ्यावा, अशी चर्चा झाली. दसऱ्याचा दिवसही ठरला. पहिलीच सभा असल्यामुळे ती मैदानाऐवजी सभागृहात घ्यावी, असे बाळासाहेबांच्या काही सहकाऱ्यांचे म्हणणे होते, मात्र ही सभा मैदानातच होईल, यावर बाळासाहेब ठाम राहिले. शिवाजी पार्कमध्ये सभा घेण्याची तयारी सुरू झाली. पण काही कारणास्तव दसऱ्याला म्हणजे २० ऑक्टोबरला सभा होऊ शकली नाही. फार विलंब नको म्हणून ३० ऑक्टोबर हा दिवस ठरला. ‘मार्मिकमध्ये रीतसर निमंत्रण पत्रिकाच प्रसिद्ध झाली. तीसुद्धा खास बाळासाहेबांच्या शैलीत. त्यात लिहिले होते-

‘मराठी माणसांच्या न्याय्य हक्कांसाठी लढणाऱ्या शिवसेनेचा भव्य मेळावा!!’

जय महाराष्ट्र, वि. वि.

महाराष्ट्राचे दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्फूर्तिदायक चरणावर प्रतिज्ञेचा माथा ठेवून महाराष्ट्राच्या पुनरुत्थानासाठी सिद्ध झालेल्या शिवसैनिकांचा मेळावा रविवार, दि. ३० ऑक्टोबर १९६६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता शिवाजी पार्क, दादर येथे भरणार आहे. आपण महाराष्ट्राचे निष्ठावंत अभिमानी. आपण या मेळाव्याला जातीने हजर राहावे, अशी शिवसैनिकांच्या वतीने मी आपणास विनंती करतो.

आपला नम्र

महाराष्ट्र सेवक – बाळ ठाकरे

आणि शिवतीर्थावर अक्षरश: जगसागर लोटला. सभेची सुरुवात शाहीर साबळे यांच्या ‘महाराष्ट्र गीता’ने झाली. त्यानंतर बॅ. रामराव आदिक, एस. ए. रानडे आणि अ‍ॅड. बळवंत मंत्री यांची भाषणे झाली. मग प्रबोधनकारांचे भाषण झाले. ते बहुतेक खुर्चीत बसूनच बोलले. महाराष्ट्राची आणि खास करून मुंबईतील मराठी माणसाची दयनीय अवस्था यावर त्यांनी परखड भाषेत कोरडे ओढले. ‘आता अन्यायाविरुद्ध लढा उभारा’ अशी हाक देऊन ते म्हणाले- ‘आतापर्यंत ठाकरे कुटुंबात असलेला हा बाळ मी आज महाराष्ट्राला अर्पण करत आहे!’ प्रबोधनकारांच्या त्या शब्दांनी सर्वाच्या अंगावर रोमांच उभे राहिले.

स्वत: बाळासाहेब ठाकरे जेव्हा भाषणासाठी उभे राहिले, तेव्हा टाळय़ांचा कडकडाट थांबेना. त्या टाळय़ा कशाबशा थांबवत ते म्हणाले, ‘‘मीसुद्धा तुमच्यासारखाच शिवसैनिक आहे!’’ त्यावर सभेतून उत्स्फूर्तपणे ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद’ हा जयघोष घुमला. त्या सभेनेच त्यांना ‘शिवसेनाप्रमुख’ हे बिरुद दिले. ‘कठोर प्रयत्न, त्याग आणि संघर्ष केल्याशिवाय महाराष्ट्राला कधीच काही मिळाले नाही,’ हे त्यांचे उद्गार सभेच्या मनावर कोरले गेले.

दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रांनी सभेची बातमी देताना संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील सभांची आठवण झाल्याचे नमूद केले. संघटनेच्या आर्थिक मदतीसाठी काही डबे सभेत फिरविण्यात आले. मामा खानोलकर आणि त्यांच्या बंधूंकडे ही जबाबदारी होती. भालचंद्र वैद्य यांनी या सभेची छायाचित्रे टिपली. पुढे शिवसेनेच्या सर्व कार्यक्रमांचे छायाचित्रण वैद्यच करू लागले. शाम देशमुख, अशोक प्रधान आणि मालाडचे दादा कारखानीस यांनी सभेसाठी प्रचंड मेहनत घेतली होती. व्यासपीठावरील निळय़ा रंगाच्या फलकावर असलेले वाघाचे चित्र सर्वाचे लक्ष वेधून घेत होते. हा फलक भायखळा येथील भाई गुजर यांनी तयार केला होता. त्यांनी या मुख्य फलकासह बरेच फलक जय हिंद सिनेमामागच्या इराणी चाळीत तयार केले होते. हे काम सुरू असताना बाळासाहेबांनी तिथे जाऊन भाई गुजर यांची पाठ थोपटली होती. हाती ब्रश घेऊन वाघाच्या चित्रात काही सुधारणाही केल्या होत्या.

या सभेला पोलीस नव्हते. पण संरक्षणाची जबाबदारी मुंबईच्या व्यायामशाळांनी स्वत:हून शिरावर घेतली होती. हिंदमाता व्यायामशाळेचे शांताराम पुजारी मास्तर आणि भारतमाता व्यायामशाळेचे शंकरराव पालव, हळदणकर यांच्या देखरेखीखाली व्यायामपटू व्यासपीठाच्या आसपास नेमलेले होते. सभेला अपेक्षेपेक्षा मोठी गर्दी झाली, हे खरे असले तरी १९ जूनपासून ते ३० ऑक्टोबपर्यंत बाळासाहेब स्वस्थ बसले नव्हते. त्यांनी मुंबईत सर्वत्र सभा, बैठका घेतल्या. चाळीतील खोल्यांमधील छोटय़ा बैठकांपासून पटांगणातल्या सभांपर्यंत सर्वत्र जाऊन त्यांनी आपल्या संघटनेची उद्दिष्टे सांगितली. त्यांच्याभोवती गोळा झालेल्यांमध्ये गिरणी कामगार आणि गिरणगावातील तरुणवर्ग मोठय़ा संख्येने होता.

पण त्याहीपूर्वी १९६६ च्याच एप्रिलमध्ये पत्रकार विजय वैद्य यांनी बाळासाहेबांना एका भाषणासाठी चेंबूरला बोलावले होते. मुंबईत मराठी माणसाची कशी ससेहोलपट सुरू आहे आणि सरकार आपल्याच मस्तीत कसे मश्गूल आहे, याचे वर्णन बाळासाहेबांनी केले. या परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी मराठी माणसांच्या संघटनेची गरज असल्याचेही ते म्हणाले होते. दुसऱ्या दिवशी या सभेची बातमी देताना विजय वैद्य यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या तेव्हा अनामिक असलेल्या संघटनेचा गौप्यस्फोट केला.

१९६६ पासून बाळासाहेब दसरा मेळाव्यात शिवसेनेची भूमिका, विचार व पुढचे कार्यक्रम जाहीर करत. पाकिस्तानी क्रिकेट संघाला मी भारताच्या भूमीवर पाय ठेवू देणार नाही, ही गर्जना त्यांनी शिवतीर्थावरच केली. इतक्या वर्षांत देशात अनेक सरकारे आली आणि गेली, पण कोणीही आजपर्यंत पाकिस्तानचे सामने भारतात घेतले नाहीत. हा शिवसेनेचा दरारा! बाळासाहेबांनंतर उद्धव ठाकरे यांनी पक्षप्रमुख म्हणून दसरा मेळाव्यांची परंपरा कायम राखली. आजही या मेळाव्यांसाठी झाडून सर्व शिवसैनिक शिवतीर्थावर न चुकता येतात. मुंबई महाराष्ट्रातच राहावी, असे वाटणारा प्रत्येक मराठी माणूस यंदाही दसऱ्याला शिवतीर्थावरील शिलंगणाचे सोने लुटायला आल्याखेरीज राहणार नाही.

(लेखक माजी उद्योगमंत्री आणि शिवसेनेचे नेते आहेत.)

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Subhash desai article about first shiv sena dussehra rally zws
First published on: 05-10-2022 at 01:42 IST