‘दीड चाकाचा गाडा’ (अन्वयार्थ, ३ नोव्हेंबर) वाचत असताना आयएएसचा वरचष्मा असलेल्या नोकरशाहीवरील टीका-टिप्पणी समयोचित आहे, हे जाणवले. शासकीय निर्णयांची फळे जनसामान्यापर्यंत पोहोचविण्यास संवेदनाविहीन नोकरशाही अत्यंत कमी पडत आहे, एवढेच नव्हे तर ते पोहोचूच द्यायचे नाही यासाठी अडसर होण्यातच ही नोकरशाही धन्यता मानते, ही जनतेची नामुष्की व हतबलता आहे.
माजी सचिव डॉ. संजीव यांच्या मते आजची आयएएस केडर मोडक्या रिक्षासारखी झालेली आहे. केव्हा, कुठे बंद पडेल याचा नेम नाही. कामाच्या दडपणाखाली व/ वा प्रामाणिकपणे काम करणाऱ्या काही तुरळक अधिकाऱ्यांचा अपवाद वगळता बहुतेक अधिकारी टीए/ डीएचे फॉम्र्स भरण्यात, पेस्लिपच्या मागे वा स्वत:चे पगार- भत्ता इतरांपेक्षा कमी असता कामा नये या विवंचनेत वा होम/ कार लोनसाठी वा क्रीम पोिस्टग मिळवण्यासाठी वा नको तेथे बदली होऊ नये यासाठी वा पेन्शनचे सर्व बेनिफिट्स मिळवण्यासाठी फििल्डग लावत असतात.
आयएएस ट्रेिनग अॅकॅडमीतून बाहेर पडताना या समाजासाठी हे करेन ते करेन अशी शेखी मिरवत नोकरीवर रुजू होणारी गरम रक्ताची ही तरुण मंडळी बघता बघता वरिष्ठांच्या व/ वा नेत्यांच्या समोर नतमस्तक होण्यात, लाळघोटेपणा करण्यात धन्यता मानतात. फाइल्सची टोलवाटोलवी करीत प्रशासनाचे िधडवडे काढतात. त्यामुळे एका माजी सेक्रेटरीने बिहारच्या आयएएस केडरला उद्देशून गरम, नरम, बेशरम असे म्हटलेले होते. सुरुवातीला गरम, नंतर नरम व शेवटपर्यंत बेशरम ही वृत्ती बघण्यास मिळते. आपण सुचविल्याप्रमाणे कणखर भूमिकेला पर्याय नाही हे खरे असले तरी मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण, (भ्रष्ट) राजकीय नेतृत्व की (असंवेदनशील) वरिष्ठ अधिकारी की आणखी कुणी तरी..
– प्रभाकर नानावटी, पुणे</strong>
निषेध करायचा अन् टेंभाही मिरवायचा?
‘भटकळ यांच्याकडून पुरस्कारांची रक्कम सामाजिक संस्थांना दान’ ही बातमी (२६ ऑक्टो.) वाचली. देशात घडलेल्या असहिष्णुतेच्या घटनांचा त्यांनीही निषेध व्यक्त केला आहे ही चांगली गोष्ट आहे; परंतु निषेध म्हणून मिळालेली पुरस्काराची रक्कम ‘युसूफ मेहर अली सेंटर’ किंवा ‘महारोगी सेवा समिती’ यांना दान देणार असल्याचे त्यांनी सांगितले. या गोष्टीचे मला काही आकलन होत नाही. खरे तर जर त्यांना दान देण्याची इच्छा असेल तर त्यांनी पूर्वीच, पुरस्कार मिळाले तेव्हाच ती रक्कम दान दिली असती तर योग्य झाले असते. निषेध म्हणून कुणी दान देत नाही. प्रेमाने दान द्यायचे असते. निषेधही करायचा अन् दान दिल्याचा टेंभा मिरवायचा असे एकाच दगडात दोन पक्षी मारण्याचा हा प्रकार आहे का?
– संजीव फडके, ठाणे</strong>
अंतुलेंच्या काळातील पद्धत मंत्रालयात राबवा
‘दीड चाकाचा गाडा’ हा अन्वयार्थ (३ नोव्हेंबर) वाचला. नोकरशहा राज्यशकटाच्या आसाचे एक चाक असते असे म्हणण्याऐवजी ते शकटाचे सारथी आहेत असे म्हणणे सध्याच्या परिस्थितीत वावगे ठरणार नाही. शकटाच्या सारथ्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांची असून मंत्रिमंडळाने त्यांना साहाय्य करणे अपेक्षित आहे. पण तसे होत नसल्याने मुख्यमंत्र्यांना गाडय़ाची धाव रखडते आहे असे म्हणणे भाग पडले.
नोकरशाहीला काबूत ठेवण्यासाठी मंत्र्यांना त्यांच्याकडे सोपविलेल्या खात्यांची इत्थंभूत माहिती व जाण हवी. शासनाच्या ध्येयधोरणांची अंमलबाजवणी योग्य पद्धतीने होते आहे किंवा नाही हे जाणून घेण्याचे अनेक मार्ग आहेत. त्यातील रूढ मार्ग म्हणजे शासनाकडे येणाऱ्या तक्रारींच्या माध्यमातून येणारे माघारी वृत्त यालाच ‘फीडबॅक’ म्हटले जाते. शासनाकडे येणाऱ्या तक्रारी समजून घेण्याची यंत्रणा आज कुचकामी झाली आहे. जनतेला भेडसावणाऱ्या अडचणी तक्रारींद्वारे शासनापर्यंत येत असतात. त्यावर प्रभावीपणे कार्यवाही झाली तर नोकरशाहीवर वचक राहतो. असा अनुभव आहे की, मुख्यमंत्र्यांकडे आलेल्या तक्रारी ‘उचित कार्यावाहीसाठी’ संबंधित विभागांकडे पाठविल्या जातात; परंतु ‘उचित कार्यवाही’ झाली की नाही याची शहानिशा केली जात नाही. हे न झाल्याने नोकरशाहीच्या मनात अशी भावना निर्माण होते की, तक्रारींकडे दुर्लक्ष केले तरी आपले कोणी काही बिघडवू शकत नाही. जर अधिकाऱ्यांनी शासकीय धोरणांच्या अंमलबजावणीत कसूर केली तर अशा अधिकाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करणे सहज शक्य आहे.
मुख्यमंत्र्यांनी मनावर घेतले तर त्यांच्या कार्यालयातील मनुष्यबळाचा वापर करून त्यांच्याकडे येणाऱ्या तक्रारींचा पाठपुरावा ते करू शकतात. अंतुले मुख्यमंत्री असताना त्यांनी या पद्धतीचा अवलंब केल्याचे स्मरते. याचे दोन परिणाम होतील : एक-नोकरशाहीला हा संदेश जाईल की त्यांच्या कामावर लक्ष ठेवले जात आहे व दोन- तक्रारींची दखल घेतली गेल्याने जनतेच्या मनात सरकारविषयी सकारात्मक भावना निर्माण होईल.
– रवींद्र भागवत
वाट पाहा, अच्छे दिन येतील
टेकचंद सोनवणे यांचे ‘लाल किल्ला’ हे सदर (२ नोव्हें.) वाचले. सरकारला विकासाचा विसर पडला आहे यावर प्रधानसेवक नरेंद्र मोदी यांची जागतिक चव्हाटय़ावरची भाषणे वाचताना पटत नाही. जागतिक चव्हाटय़ावर सतत गतिशील, प्रगतिशील भारत दिसेल याची पुरेपूर खबरदारी मोदींच्या जोडीने जेटली घेत आहेत. रेटिंग सुधारल्याच्या बातम्या मधून मधून येतच असतात. एकदा का विदेशी सफलता पदरात पडली की मग ते स्वदेशी लक्ष देतील व सगळा बॅकलॉग भरून काढतील यात शंका नाही.
बिहार आधीच मागासलेला आहे. त्यात नितीश-लालू या दुकलीला तोंड देण्यासाठी शहा-मोदी यांना आपल्या सर्व कर्त्यां मंत्र्यांसह तळ ठोकून बसावे लागले आहे. आधीच दिल्ली हातची गेली आहे. त्यात बिहारची भर नको, या विचाराने त्यांनी तिकडे लक्ष केंद्रित केले आहे. त्यातच मोदींना असहिष्णू ठरवण्याचा भयंकर कट देशात शिजला असून दादरीसारख्या प्रकरणात केंद्र शासनाची जबाबदारी नसता त्यांना लक्ष्य करणे चुकीचे आहे. आम्ही ज्या गोष्टी विरोधी पक्षात असताना केल्या त्या आज सत्तेत आल्यावर बरोबर असल्याचा साक्षात्कार होत असताना त्या वेळच्या सत्ताधाऱ्यांना तो आज खुपतो आहे ही त्यांची दुटप्पी नीती आहे. विदेशी सुबत्तेतून पुरेसा पसा हाती आला की तो वापरून सामाजिक जाणिवेची कमतरता भरून काढली जाईल. काँग्रेसच्या राज्यात इतकी वष्रे दम धरलेल्या गरिबांनी आणखी थोडे सबुरीने घ्यावे. वाट पाहा, अच्छे दिन खात्रीने येतील.
– रामचंद्र महाडिक
उटपटांग नेत्यांना
मोदींचा पाठिंबाच!
सरकारच्या असहिष्णुतेचे धोरण आणि वागणुकीबद्दल नापसंती व्यक्त करणाऱ्यांमध्ये राष्ट्रपतींखेरीज पुरस्कार परत करणारे साहित्यिक, गुलजार यांच्यासारखे कवी, ज्येष्ठ शास्त्रज्ञ ‘पद्मभूषण’ भार्गव यांच्यासह १०७ वैज्ञानिक आणि आता रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांच्यासारख्या विविध क्षेत्रांतल्या बुद्धिजीवी मंडळींचा समावेश आहे. हे सर्व लोक हे काही राजकीय हितसंबंध जपणारे, भाजपचे विरोधक असणारे डावे वा काँग्रेसजन नव्हेत. मोदी सरकारची ही ‘सुनियोजित असहिष्णुता’ असह्य़ होण्याइतकी वाढल्यामुळे विवेकी विचारवंतांची ही ‘उत्स्फूर्त विद्रोही प्रतिक्रिया’ आहे. सदसद्विवेकबुद्धी जागृत असणाऱ्या या सज्जनांनी पुरस्कार परत करताना त्यासोबत मिळालेली रोख रक्कम परत करण्याची खरे तर आवश्यकता नव्हती. ( ती नाकारायचीच असेल तर ती रक्कम कोणत्याही विवेकाचा आवाज बुलंद करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सामाजिक संस्थेला द्यावी. ) भाजपमधील बिनडोक आणि बेलगाम वक्तव्ये करणाऱ्या उटपटांग नेत्यांना पडद्यामागून पंतप्रधानांचा पाठिंबा आहे. ते स्वत: नामानिराळे राहण्याचा देखावा करतात. बेधुंदांना वेसण घालण्याची मनापासून इच्छाच त्यांना नाही हे उघड आहे.
– प्रमोद तावडे, डोंबिवली