loksatta@expressindia.com  

‘बिस्मिल्ला ते बोम्मई’ हा अग्रलेख (१ एप्रिल)  वाचला. मागील दोन लोकसभा निवडणुकांनंतर भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या सत्तातुरांची रीघच लागली. यात काँग्रेसचा वाटा अर्थातच लक्षणीय. कारण सत्तेची ऊब चाखलेल्यांना सत्तेवाचून राहणे म्हणजे ‘जळाविण मासा’अशी अवस्था फार काळ टिकणे अशक्य. आता भाजपमध्ये जायचे तर विचारसरणी वगैरेला खुंटीला टांगणे क्रमप्राप्त. उलट आपण किती कट्टर हिंदूत्ववादी व राजापेक्षा कसे राजनिष्ठ आहोत हे दाखवण्याच्या स्पर्धेत हे मूळ भाजपवाद्यांच्याही चार पावले पुढेच आहेत. हेमंत बिस्वा सर्मा, ज्योतिरादित्य सिंदीया, बोम्मई ही काही ठळक उदाहरणे. यामुळे आपण देशाच्या बहुरंगी, बहुधर्मीय अस्तित्वालाच आव्हान देत आहोत याची तमा कुणालाच नसल्याची बाब लोकशाहीसाठी अत्यंत धोकादायक आहे.

– डॉ. किरण गायतोंडे, चेंबूर, मुंबई

संस्कृती आणि धर्म भिन्न असू शकतात

 ‘इथे फक्त भारतीय संस्कृतीच!’ (१ एप्रिल) या लेखात ‘एका राष्ट्राची एकच संस्कृती असते, भारत किंवा हिंदूस्तान हे एक राष्ट्र आहे तर इथे संमिश्र संस्कृतीची गोष्ट करणे हे पूर्णत: अशास्त्रीय आहे’ हे सुरुवातीसच केलेले विधान केवळ इतर धर्मीयांना नजरेसमोर ठेवून केलेले दिसते. मुळात संस्कृती आणि शास्त्र किंवा संस्कृती आणि धर्म यांचा अर्थाअर्थी संबंध दाखविता येणे कठीण आहे. संस्कृती म्हणजे अमुक एक धर्म असे नसून, तिला जनसमूहाच्या रीती-भाती, आहाराच्या सवयी, पेहराव, सण, उत्सव, एकमेकांशी वर्तणूक, सामाजिक- धार्मिक- राजकीय नीतिमत्ता असा विशाल संदर्भ आहे.

 हिंदू धर्मीयांचाच विचार केला तर, पेठा-पेठा, गावागावांतील, शहरातील, जातीजमाती, आदिवासी, वेगवेगळय़ा प्रांतातील लोकांची, ते हिंदू असले तरी संस्कृती वेगवेगळी असल्याचे दिसून येईल. बहुसंख्य हिंदू राम- कृष्णाला भजणारे आहेत तर दक्षिणेतील अनेक जण रावणाची पूजा करतात. काही हिंदू मूर्तिपूजा करतात तर काही करीत नाहीत. काही वेदप्रणीत शास्त्रे मानतात तर काहींना ते थोतांड वाटते. असे असले तरी ते हिंदूच होत.

इंडोनेशियात रामायण- महाभारतातील प्रसंगावर नाटके होत असली, नोटेवर गणपती छापला असला तरी तिथे गोमांस वर्ज्य नाही हे लक्षात घेतले तर संस्कृतीच्या व्याख्येची गफलत होणार नाही. काही हिंदू धर्मीयांच्या-अगदी ब्राह्मण घरात  मोहरमचे ताबूत बसवितात, पीराला नवस बोलतात व फेडतात. त्यालाही हिंदू संस्कृती म्हणायला आक्षेप घ्यावा लागेल! त्यामुळे, राष्ट्र म्हणजे एक जन, एक संस्कृती असा ओढून ताणून किंवा मारून मुटकून मांडलेला विचार व्यक्तिगत असला तरी वस्तुस्थिती तशी नाही. हिंदू धर्मीयांमधील संस्कृतीच इतकी भिन्न भिन्न असेल तर, भारतातील इतर धर्मीयांना बळजबरीने या परिघात आणण्याचा प्रयत्न करण्यात काय हंशील आहे? किंबहुना, विभिन्न संस्कृतीचे आचरण करत असूनही आमची ओळख भारतीय आहे हा विचार रुजविला पाहिजे.

– डॉ. श्रीकृष्ण ढगे, कराड</p>

संस्कृतीच्या स्वघोषित व्याख्यांचा उदोउदो

‘इथे फक्त भारतीय संस्कृतीच!’ हा रवींद्र माधव साठे (१ एप्रिल) यांचा लेख वाचून काही शंका/प्रश्न उपस्थित होतात, ते पुढीलप्रमाणे-

  • एक भूमी, एक जन आणि एक संस्कृती म्हणजेच राष्ट्र हा सिद्धांत मांडून लेखक दावा करतात की भारत किंवा हिंदूस्तान हे जर एक राष्ट्र आहे तर इथे संमिश्र संस्कृतीची गोष्ट करणे हे पूर्णत: अशास्त्रीय आहे. परंतु त्यांनी मांडलेला सिद्धांत नक्की कोणत्या शास्त्रावर आधारित आहे आणि अशा कोणत्या शास्त्रानुसार संमिश्र संस्कृती अशास्त्रीय ठरते हे स्पष्ट केलेले  नाही.
  • एका राष्ट्राची एकच संस्कृती असते असा दावा लेखकांनी केला आहे. मराठी विश्वकोशात संस्कृती या शब्दाची व्याख्या आहे ‘मनुष्य व्यक्तिश: व समुदायश: जी जीवनपद्धती निर्माण करतो आणि जीवन साफल्यार्थ स्वत:वर व बाह्य विश्वावर संस्कार करून जे आविष्कार करतो, ती पद्धती किंवा तो आविष्कार म्हणजे संस्कृती होय.’ या व्याख्येनुसार भारताच्या सांस्कृतिक इतिहासावर नजर टाकल्यास इथे एकच संस्कृती कधीही नव्हती असे दिसते. 
  • इथे प्रचलित वर्ण, जात, भाषा, वेशभूषा, वंश खानपानाच्या सवयी, इत्यादी बाबी विचारात घेतल्यास इथे भरपूर सांस्कृतिक विविधता आढळते. याच संस्कृतीचा एक मोठा जनसमुदाय अस्पृश्य (अतिशूद्र) ठरवून शतकानुशतके गावाबाहेर ठेवला गेला आहे (आणि त्याचे चटके आजही भोगत आहे.) तर त्याहून मोठा शूद्र या वर्णातला जनसमुदाय अजूनही वंचितच राहिलेला आहे. यात लेखकांना कसले एकजीव राष्ट्रीयत्व दिसते?
  •   हजारो वर्षांपूर्वीची हडप्पा, मोहेंजोदारो संस्कृती तसेच बौद्ध आणि जैन या हिंदू संस्कृतींपेक्षा भिन्न अशा संस्कृतींचा विसर लेखकांना पडलेला दिसतो आहे. बौद्ध धम्म हा एक जीवनपद्धती म्हणजे एक वेगळी संस्कृती आहे हे लक्षात घेतले पाहिजे.
  • आपली संस्कृतीच कशी ‘संस्कृती’ आहे हे पटवून देण्यासाठी तिची महत्ता सांगण्याऐवजी इस्लाम किंवा ख्रिस्ती संस्कृती यांना ‘संस्कृती’ असे म्हणताच येणार नाही हे सांगण्यावर लेखकांचा भर दिसतो. इस्लाम किंवा ख्रिस्ती हे एक धर्म असूनसुद्धा त्यांची वेगवेगळी राष्ट्रे संस्कृतीच्या आधारावर निर्माण झाल्याचा शोध ते लावतात. परंतु ऐतिहासिक संदर्भ पाहिल्यास त्यांचा हा दावा संस्कृतीचे महत्त्व बिंबविण्यासाठी ओढूनताणून केला आहे असे वाटते. त्याच वेळी, भारतवर्षांत असलेल्या विविध राष्ट्रांचे वास्तव मात्र ते सोयीस्करपणे दडवून ठेवतात.
  • इंडोनेशिया या देशातील लोक आपला मुस्लीम धर्म पाळूनसुद्धा हिंदू देव-देवतांची पूजा करतात, हिंदू सण  साजरे करतात हे उदाहरण देऊन लेखक हेच सुचवीत आहेत की भारतातील मुस्लिमांनीसुद्धा हिंदू दैवतांची आराधना करावी आणि सण साजरे करावेत. परंतु हा अट्टहास का, तसेच नास्तिकांचे काय करायचे, याचेही उत्तर लेखकांनी दिलेले नाही.  

आता आपल्या देशात भारतीय संविधान लागू आहे. त्यानुसार प्रत्येकाला आपापल्या संस्कृतीनुसार आपल्या श्रद्धा, धर्म, आराधना पद्धती यांचे स्वातंत्र्य आहे. म्हणजे इथली सांस्कृतिक विविधता संविधानाने मान्य केलेली आहे आणि ती अबाधित ठेवून त्यातून एकता कशी साधली जाईल याची तरतूद केलेली आहे. त्यानुसार आपापल्या संस्कृती, धर्म जपून देशाला पुढे घेऊन जाण्याऐवजी राष्ट्रीयत्वाच्या, संस्कृतीच्या स्वघोषित व्याख्या जनतेच्या माथ्यावर मारून आपले घोडे पुढे दामटण्याचा प्रयत्न या लेखात केलेला दिसत आहे. 

 – उत्तम जोगदंड, कल्याण (जि. ठाणे)

आता वैचारिक गोंधळ थांबवा

‘इथे फक्त भारतीय संस्कृतीच!’ हा रवींद्र साठे यांचा लेख वाचला. अत्यंत सरळ, स्वच्छ आणि स्पष्ट प्रतिपादन या निकषावर लेख उत्तमच ठरतो. अलीकडे मातृसंस्था रा. स्व. संघ आणि एकूण संघ परिवार यांच्या नेत्यांमध्ये जो वैचारिक गोंधळ दिसतो, तो दूर होऊ लागला की काय, असे  ‘भासवणारी’ या लेखाची मांडणी आहे. पण त्यांत काही विवाद्य मुद्दे आहेत, ते पुढीलप्रमाणे:

१. ‘संमिश्र संस्कृती अशी काही गोष्ट इथे अस्तित्वातच नाही’ – एवढे स्वच्छ, स्पष्ट मत व्यक्त करणे, राज्यघटनेने दिलेल्या अभिव्यक्तिस्वातंत्र्यात जरूर बसते, पण ती राज्यघटनाच या मताला किमान दोन ठिकाणी, तेवढय़ाच स्पष्टपणे छेद देते, ही वस्तुस्थिती आहे! ती दोन ठिकाणे अशी अ) भारतीय राज्यघटना भाग तीन, – ‘मूलभूत हक्क’मधील अनुच्छेद २९ (१) – अल्पसंख्याक वर्गाच्या हितसंबंधांचे संरक्षण – यामध्ये असे म्हटले आहे, की ‘भारताच्या राज्यक्षेत्रात किंवा त्याच्या कोणत्याही भागात राहणाऱ्या ज्या कोणत्याही नागरिक गटाला आपली स्वत:ची वेगळी भाषा, लिपी, वा संस्कृती असेल, त्याला ती जतन करण्याचा हक्क असेल.’   ब) भारतीय राज्यघटना भाग चार – क – ‘मूलभूत कर्तव्ये’मधील अनुच्छेद ५१ (च) – यामध्ये म्हटले आहे, की ‘आपल्या संमिश्र संस्कृतीच्या समृद्ध वारशाचे मोल जाणून तो जतन करणे’.

आता जर मुळात ‘संमिश्र संस्कृती अशी काही गोष्ट इथे अस्तित्वातच नाही’, तर प्रश्न असा की घटनाकारांना याची कल्पना नव्हती का? 

२. याखेरीज, संघ परिवारातील वर उल्लेखिलेला सध्याचा वैचारिक गोंधळ या लेखातही मधूनच डोकावतो. ‘येथील सर्व मुसलमान काही अरबस्थानातून आलेले नाहीत वा सर्व ख्रिस्ती रोममधून आलेले नाहीत. त्यांचे खानदान भारतीय आहे. सर्वाचे पूर्वज एक आहेत. इतिहास एक आहे आणि संस्कृती एक आहे.’  – या मांडणीत तो गोंधळ अजूनही दिसतो. इथल्या मुस्लिमांना त्यांच्या ज्या पूर्वजांविषयी अभिमान वाटतो, ते जर मध्य पूर्वेतून, अरबस्थानातून आलेले मध्ययुगीन आक्रमक असतील, तर ‘पूर्वज एक, इतिहास एक, खानदान भारतीय’ – या म्हणण्याला काय अर्थ राहतो? ख्रिश्चनांना त्यांचे जे पूर्वज धर्मप्रसारासाठीच इथे आले, आणि ज्यांनी वेगवेगळय़ा मार्गानी (ज्यांत केवळ वाद, चर्चा किंवा मतपरिवर्तन नव्हते;)  इथे धर्मप्रसार केला, त्यांचा अभिमान असेल, तर ?

राणा प्रताप आणि अकबर, छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेब यांच्या इतिहासातील नेमकी कुठली बाजू कोणाला अभिमानास्पद वाटते, हे विचारात न घेता, केवळ ‘आमचा इतिहास एक’ या टिमकीला काय अर्थ आहे? (!)

३. सगळय़ात महत्त्वाचे म्हणजे, वैचारिक गोंधळ संपवण्यासाठी, किंबहुना तो संपला आहे, असे भासवण्यासाठी, ही जी तारेवरची कसरत चाललीय, तिच्यातून ‘भारतीय संस्कृती’ हा शब्दप्रयोग जाणीवपूर्वक केला जातोय! मातृसंस्था रा.स्व. संघ आणि तिच्या संस्थापकांची – डॉ. हेडगेवार, गोळवलकर गुरुजी यांची – मूळ विचारधारा लक्षात घेतल्यास तिथे खरे तर ‘हिंदू संस्कृती’ हेच शब्द असायला हवेत, हे कोणाच्याही लक्षात येईल.

आता स्वातंत्र्यानंतरची ७५ वर्षे, आणि रा. स्व. संघाची उणीपुरी १०० वर्षे पूर्ण होत असताना, निदान आता तरी, हा वैचारिक गोंधळ थांबवावा, आणि आपल्याला या देशात नेमके काय अभिप्रेत आहे, ते संघ परिवाराने एकदाचे स्पष्ट करावे, अशी कळकळीची विनंती करावीशी वाटते.

– श्रीकांत पटवर्धन, कांदिवली, मुंबई