प्रत्येक सत्ताधारी पक्षामध्ये एक अदृश्य पद असते. ही पद्धत आजची नाही. काँग्रेसकाळापासूनचीच आहे. यूपीएच्या काळातही ती होती. काँग्रेसने केले- मग आम्ही का नाही, या भक्तवचनाला जागून भाजपनेही ती पाळली. काँग्रेसमध्ये हे अदृश्य पद कुणा दिग्विजय सिंहांकडे होते म्हणतात. भाजपमध्ये या पदावर कोण आहेत, हा प्रश्न कुणीही विचारणार नाही. तो का विचारणार नाही, याला कारणे आहेत. प्रश्न विचारण्याची पद्धत मुळात पाश्चात्त्य आहे. आपली नाही. पण आणखी एक कारण म्हणजे, त्या पदावर आता नेमके कोण आहे याची पर्यायी उत्तरे बरीच आहेत. कुणी नव्यानेच दिसू लागलेल्या परवेश वर्माचे नाव सांगेल, कुणी साध्वींचे नाव घेईल, तर कुणी योगींचे. पण विनम्रपणे नमूद करावेसे वाटते की, ही सर्व उत्तरे कालौघात चुकीची ठरतील. अनंतकाळ कायम राहणारे नाव एकच : अनंतकुमार हेगडे!

हेगडे यांच्याकडे दिग्विजय सिंहांप्रमाणे इंजिनीअिरगची पदवी नसेल. नसेना का! पण एखाद्या कुशल अभियंत्याप्रमाणे त्यांनी भाजपच्या दिल्ली विधानसभा निवडणूक प्रचाराची धुरा तोलून धरली आहे. अनंतकुमार यांनी बंगळूरुमध्ये शनिवारी कुठल्याशा कार्यक्रमात केलेल्या एका वक्तव्याने दिल्लीचे सारे मतदार केजरीवालांनाच काय, गांधींनाही विसरले आहेत. गांधी म्हणजे राहुल गांधी नव्हेत. राजीव गांधीही नव्हेत. इंदिरा गांधी तर नव्हेतच. गांधी म्हणजे महात्मा म्हणून देश ज्यांना ओळखतो, ते. बंगळूरुची ती बातमी अनंतकुमारांच्या नावासह महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, पंजाब अशा बिगरभाजपशासित राज्यांमार्गे दिल्लीत पोहोचली. दिल्लीकर मतदारांना आता फक्त सावरकर दिसताहेत आणि सावरकरांचे हिंदुराष्ट्र ११ फेब्रुवारीस दिल्लीत स्थापन होण्याची औपचारिकताच तेवढी उरली आहे. इत:पर जर भाजपच्या शीर्षस्थ नेत्यांनी दिल्लीत प्रचारसभा घेतलीच, तर तो केवळ ड्रामा किंवा नौटंकी – दिल्लीची अख्खी विधानसभा अनंतकुमार यांनी बंगळूरुमधून भाजपकडे खेचून आणलेलीच आहे.

चोवीस तास वृत्तवाहिन्यांसमोर बसण्यास किंवा वृत्तपत्रेही वाचण्यास ज्यांना वेळ नसेल, त्यांना अनंतकुमार यांच्या वक्तव्यातील नाटय़ कळणार नाही. अनंतकुमार यांचे धाडसही अशांना उमजणारच नाही. ‘केजरीवालांनी दिल्लीसाठी काहीच केले नाही’ म्हणत देशाचे गृहमंत्री जेव्हा त्या टीचभर विधानसभेचा प्रचार करीत होते, दिल्लीतील शाहीन बाग नामक कुठल्याशा रस्त्यावर चाललेले बैठा सत्याग्रहवजा आंदोलन हे देशाविरुद्धचे कटकारस्थान असल्याचे खुद्द पंतप्रधान जेव्हा सांगत होते, तेव्हा बंगळूरुच्या अनंतकुमारांनी मात्र मोठे लक्ष्य ठेवले. त्याची बातमी वृत्तवाहिन्यांनी आणि काही वृत्तपत्रांनी अशी दिली, की अनंतकुमार हे महात्मा गांधींची चळवळ म्हणजे नाटक होते असे म्हणताहेत आणि भाजपला अडचणीत आणताहेत. भाजपला अडचणीत आणणारी कोणतीही बातमी खोटीच असते, तशीच हीसुद्धा बातमी खोटी असल्याचा खुलासा अनंतकुमारांनी पक्षाकडे आणि वृत्तवाहिन्यांपुढे केला यात नवल नाही.. पण खुलासा करण्याची ही संधी मिळताच त्यांनी सावरकरांचे नाव न घेता सावरकरांच्या सशस्त्र लढय़ाच्या प्रेरणेमुळेच स्वातंत्र्य कसे मिळाले, हेदेखील सांगितले. अशा प्रकारे, सावरकरांचे नावही न उच्चारता सावरकरांची महती अनंतकुमारांनी दिल्लीत पोहोचवली. केजरीवाल यांच्याविरुद्ध बोलून दिल्ली विधानसभा जिंकता येत नसते, त्यासाठी महात्मा गांधींविरुद्धच बोलावे लागते, याचा धडा शीर्षस्थ नेत्यांना घालून दिला आणि आपल्या अनंतवाणीने पक्षातील त्या अदृश्य पदावरील आपले दिग्विजयी स्थान पक्के केले.