लोकसत्ता प्रतिनिधी
ठाणे : अवकाळी पावसामुळे भाजीपाल्याच्या पिकाचे मोठे नुकसान झाले असून यामुळे भाजीपाल्याची आवक घटल्याने त्याच्या दरात वाढ होऊ लागली आहे. त्यातही कारल्याचे दर गगणाला भिडले आहेत. गेल्या दोन दिवसात घाऊक आणि किरकोळ बाजारात कारल्याच्या दरात दहा रुपयांनी वाढ झाली आहे.
कारले ही एक औषधी भाजी आहे. त्याचे सेवन करणे, हे आरोग्यासाठी गुणकारी मानले जाते. यामुळे कारले चवीला कडू असले तरी त्याला ग्राहकांकडून प्रचंड मागणी असते. वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत नाशिक, सोलापूर आणि पुणे जिल्ह्यातून कारल्याची आवक होत असते. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातून सर्वाधिक म्हणजे ८० टक्के कारले विक्रीसाठी दाखल होत असतात. कारले उत्पादनासाठी जून महिना हा महत्त्वाचा मानला जातो. जून महिन्यात या पिकाची लागवड केली जाते आणि ॲागस्ट महिन्यात हे पीक विक्रीसाठी तयार होते. या कालावधीत एका एकरमध्ये १५ ते १६ टन कारल्याचे उत्पादन शेतकऱ्याला मिळते. यामुळे ऑगस्ट ते ऑक्टोबरपर्यंत बाजारात कारल्याची चांगली आवक असते.
आणखी वाचा-..म्हणून शरद पवार यांना बाजूला करायचे होते, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचा गौप्यस्फोट
तर, हिवाळ्याच्या कालावधीत म्हणजेच नोव्हेंबर महिन्यात कारल्याचे उत्पादन कमी होते. एक एकरमधून १२ ते १३ टन इतके कारल्याचे उत्पादन मिळते. त्यामुळे बाजारातील कारल्याच्या आवक घटून त्याचे दर वाढतात. यंदा ऐन नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे भाजीपिकांबरोबरच कारल्याच्या पिकांचे नुकसान झाले आहे. आधीच उत्पादन कमी त्यात, अवकाळीचा फटका यामुळे बाजारात कारल्याची आवक घटली आहे. यामुळेच त्याचे दर वाढले आहेत, अशी माहिती वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीमधील भाजी मार्केटचे उपसचिव मारोती पबितवार यांनी दिली.
वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीत दोन दिवसापूर्वी म्हणजेच २८ नोव्हेंबर रोजी १३२ क्विंटल कारल्याची आवक झाली होती. त्यादिवशी २५ रुपये प्रति किलोने कारले विक्री करण्यात येत होते. तर, गुरुवारी कारल्याची आवक आणखी घट झाली. बाजार समितीत गुरुवारी केवळ १०४ क्विंटल कारल्याची आवक झाल्याची माहिती वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीतून देण्यात आली. आवक घटल्यामुळे गुरुवारी घाऊक बाजारात कारल्याच्या दरात १० रुपयांनी वाढ झाली असून ३५ रुपये प्रति किलोने होत आहे. तर, किरकोळ बाजारातही ४० रुपये प्रति किलोने विक्री करण्यात येणारे कारले गुरुवारी ५० रुपये प्रति किलोने विक्री करण्यात येत होते.