किशोर कोकणे
ठाणे : ठाणे,पालघर जिल्ह्यातील अवजड तसेच हलक्या वाहनांसाठी महत्त्वाच्या असलेल्या मुंबई अहमदाबाद मार्गावरील वर्सोवा पूलाजवळ साचलेल्या पाण्यामुळे मागील तीन दिवसांपासून प्रचंड ठाण्यातील गायमुख ते वसई येथील चिंचोटी पर्यंत वाहतूक कोंडी होत आहे. या वाहतूक कोंडीमुळे वाहन चालकांना अवघ्या तासाभराच्या अंतरासाठी सुमारे चार ते पाच तास लागत आहे. वेळेत कामावर पोहचत नसल्याने नोकरदारांची अर्धवेळ हजेरी लागत आहे. प्रवाशांना कोंडीचा शारिरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. महिलांचे कोंडीत अडकल्याने सर्वाधिक हाल होत आहे. अनेक रुग्णवाहिका, अत्यावश्यक सेवेतील वाहनेही कोंडीत अडकत आहे.
मुंबई अहमदाबाद मार्गावरून हजारो वाहनांची वाहतूक वसई, विरार, बोरीवली, ठाण्याच्या दिशेने होत असते. त्यामुळे हा मार्ग वाहतूकीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. भिवंडी, उरण जेएनपीटी येथून घोडबंदर मार्गे गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या अवजड वाहनांची वाहतूकही या मार्गावरून सर्वाधिक होत असते. ठाणे शहरात कामानिमित्त येणारे अनेकजण रेल्वेगाड्यांतील गर्दीचा प्रवास टाळण्यासाठी रस्ते मार्गे ठाणे गाठत असतात. बुधवारी ठाणे आणि पालघर जिल्ह्यात पडलेल्या पावसामुळेही वर्सोवा, पूलाजवळ सखल भागात गुडघाभर पाणी साचले आहे. मागील तीन दिवसांपासून या पाण्याचा निचरा होत नसल्याने ठाण्यातील घोडबंदर मार्गावरील गायमुख ते मुंबई अहमदाबाद मार्गावरील चिंचोटीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
हेही वाचा >>>नौपाडा-कोपरीत गढुळ पाण्याचा पुरवठा; पाणी उकळून आणि गाळून पिण्याचे पालिकेचे आवाहन
वसई येथून घोडबंदर, ठाणे अनेक नोकरदार कामानिमित्ताने येत असतात. वाहतूक कोंडीमुळे या नोकरदारांचे हाल होत आहे. वसईहून ठाण्यात येण्यासाठी किमान चार ते पाच तास लागत आहेत. यापूर्वी एक ते दीड तासात ठाणे गाठता येत होते. वाहतूक कोंडीमुळे अनेकजण कार्यालयात जाणे टाळत असून त्यांच्यावर घरून काम करण्याची वेळ आली आहे. तर काहीजण सकाळी ८ ते ९ वाजता घर सोडूनही दुपारी १ नंतर कार्यालयात पोहचत आहेत. वाहतूक कोंडीचा शारिरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. कार्यालयात पोहचल्यावर घरी कसे जाणार याची भिती मनामध्ये दडून असते असे काही नोकरदारांनी सांगितले. वाहतूक कोंडीमध्ये अनेक रुग्णवाहिका, राज्य परिवहन सेवा, महापालिका परिवहन सेवेच्या बसगाड्याही अडकू लागल्या आहेत. वाहतूक पोलिसांनी काही वाहनांची वाहतूक चिंचोटी- भिवंडी मार्गे वळविली आहे. हा मार्ग तुलनेने लांब असल्याने प्रवाशांना आणि वाहन चालकांना आर्थिक भुर्दंडाचाही त्रास सहन करावा लागत आहे.
हेही वाचा >>> ठाणे महापालिकेतील ८८० पद भरतीचा मार्ग मोकळा
वसईहून खासगी वाहनाने सकाळी ८.३० वाजता घरातून निघाल्यावर ठाण्यात कार्यालयामध्ये पोहचण्यास दुपारी १ वाजत आहे. रस्त्याकडेला प्रसाधनगृह नाहीत. त्यामुळे महिला प्रवाशांचे सर्वाधिक हाल होत आहे. मागील तीन दिवसांपासून कोंडीमुळे प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. घरी पोहचण्यासही रात्री ११ किंवा १२ वाजतात. प्रशासनाने पाण्याचा निचरा करण्यासाठी पावले उचलणे गरजेचे आहे. – अंजली परब, वसई.
वाहतूक कोंडीमुळे शारिरीक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. कार्यालयीन कामकाजावरही परिणाम होत आहे. – हर्षद प्रधान, वसई.
तीन दिवसांपासून वाहतूक कोंडी होत आहे. समाजमाध्यमांवर नागरिक टिका करत आहेत. प्रशासनाने येथील कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न करावे. – अदनान, वसई.