ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रातील पाणी देयकांच्या थकबाकीदारांविरोधात प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली असून यामध्ये थकबाकीदारांच्या आतापर्यंत ६११ नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या आहेत. याशिवाय, ३० मोटर पंप जप्त करण्यात आले आहेत. या पाणी देयक वसुली अभियानात आतापर्यंत सुमारे ३३ कोटी रुपयांची वसुली करण्यात आली आहे. या कारवाईमुळे थकबाकीदारांचे धाबे दणाणले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाणे महापालिकेच्या अर्थसंकल्पात विविध विभागांना कर वसुलीचे उद्दिष्ट ठरवून देण्यात येते. अशाचप्रकारे पाणी पुरवठा विभागाला पाणी देयक वसुलीचे उद्दिष्ट ठरवून देण्यात आलेले आहे. ठाणे महापालिकेची पाणी देयकाची रक्कम सुमारे २२४ कोटी रुपयांच्या घरात आहेत. त्यापैकी, ७६ कोटी रुपये ही थकबाकी आहे तर, १४८ कोटी रुपये ही चालू वर्षाच्या देयकांची रक्कम आहे. या देयकांच्या वसुलीवर पालिका प्रशासनाने लक्ष केंद्रीत केले असून त्यासाठी थकबाकीदारांविरोधात कारवाईचा बडगा उगारून नळजोडण्या खंडीत करण्याची कारवाई सुरू केली आहे. या संदर्भात ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी आदेश दिले आहेत. तसेच अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी देयकांच्या साप्ताहिक वसुलीचे लक्ष्य निर्धारित करून पाणी देयक वसुली अभियान सुरू करण्यास सांगितले होते. त्यानुसार, पाणी देयकाच्या थकबाकीसह वसुलीसाठी महापालिकेच्या सर्व प्रभागात नळ जोडणी खंडीत करणे, मोटर पंप जप्त करणे, मीटर खोलीला टाळे लावण्यात येत आहे. तसेच, पाणी देयकाचा भरणा करण्याऐवजी खंडित नळ जोडणी परस्पर पुन्हा जोडून घेणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचीही कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती उपनगर अभियंता विनोद पवार यांनी दिली.

हेही वाचा – “चकमक फेम संजय शिंदे यांनाही ससेमिरा चुकणार नाही”, माजी पोलीस अधिकारी रविंद्र आंग्रे यांचा दावा

महापालिका क्षेत्रातील घरगुती वापरासाठी असलेल्या नळ संयोजनाच्या थकीत देयकाची चालू वर्षाच्या मागणीसह पूर्ण भरणा केल्यास प्रशासकीय आकारामध्ये १०० टक्के सूट लागू करण्यात आली आहे. ही योजना १ सप्टेंबर २०२४ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत लागू राहील. या धोरणात्मक निर्णयापूर्वी ज्या घरगुती नळजोडणीधारकांनी पाणी पुरवठा देयके जमा केली असतील. त्यांना ही सवलत योजना लागू असणार नाही. तसेच ही योजना व्यवसायिक संयोजन धारकांना लागू असणार नाही, असे पालिकेने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा – कल्याणमध्ये पूर्ववैमनस्यातून तरूणाचा खून

नळजोडणी थकबाकीदारांच्या आतापर्यंत ६११ नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या आहेत. यामध्ये वागळे इस्टेटमध्ये सर्वाधिक म्हणजेच २४९, त्याखालोखाल दिवा ११२, मुंब्रा १०५ इतक्या नळजोडण्या खंडीत करण्यात आल्या आहेत. नौपाडा-कोपरी विभागामध्ये सर्वात कमी म्हणजेच १५ नळजोडण्या खंडीत करण्याची कारवाई झाली आहे. त्याखालोखाल वर्तकनगर ३५, लोकमान्य-सावरकर ३७ आणि उथळसरमध्ये ५८ नळजोडण्या तोडल्या आहेत. तर, माजिवाडा मानपाडा, कळवा याठिकाणी एकही नळजोडणी तोडण्यात आलेली नाही.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 611 water pipe connections of defaulters in thane are broken 30 motor pumps seized ssb