कल्याण- कल्याण पूर्वेतील मलंगगड रस्त्यावरील व्दारली गावा जवळ गुरुवारी रात्री साडे अकरा वाजता एक तरुण दुचाकीवरुन चालला होता. रस्त्यावर खड्डे असल्याने खड्डे चुकवत तो प्रवास करत होता. खड्डे चुकवत असताना त्याचा तोल जाऊन तो बाजुच्या डम्परखाली आला. डम्परच्या मागच्या चाकाखाली चिरडल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सूरज गवारी असे मयत तरुणाचे नाव आहे. तो कल्याण पूर्व भागातील चिंचपाडा भागातील रहिवासी आहे. उल्हासनगर हद्दीतील हिललाईन पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली आहे. अपघातानंतर व्दारली गावातील ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत या खड्ड्यांना जबाबदार पालिका अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली.मलंग गड, नेवाळी परिसरातील गावांमधील नोकरदार, दूध, भाजीपाला विक्रेते दररोज कल्याण रेल्वे स्थानकात येण्यासाठी मलंगगड रस्त्याचा वापर करतात. नांदिवली तर्फ ते नेवाळी नाकापर्यंतच्या मलंगगड रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. पर्यायी रस्ता नसल्याने प्रवाशांना चाळण झालेल्या मलंगगड रस्त्यावरुन प्रवास करावा लागतो.

हेही वाचा >>>ठाणे जिल्ह्यत पावसाचा जोर कायम; बदलापूर, कल्याण आणि भिवंडी शहराला तडाखा

चिंचपाडा भागात राहणारा सूरज गुरुवारी रात्री दुचाकीवरुन मलंगगड रस्त्याने चालला होता. या रस्त्यावर खड्डे असल्याने खड्डे चुकविण्याची कसरत सूरजला करावी लागत होती. व्दारली गावाजवळ पोहचल्यावर खड्डे चुकवित असताना सूरजचा दुचाकीसह तोल गेला. तो रस्त्यावर पडला. त्याचवेळी तो भरधाव वेगात असलेल्या डम्परखाली आला. डम्पर सुरजच्या अंगावरुन गेल्याने सूरजचा जागीच मृत्यू झाला. या भागाचे पोलीस पाटील चेतन पाटील यांनीही खड्ड्यांमुळे हाच अपघात झाला आहे. याप्रकरणी संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली.पाऊस सुरू झाल्यानंतर कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत दरवर्षी खड्ड्यांमुळे तीन ते चार अपघात होतात. यावेळी पाऊस सुरू झाल्यानंतर खड्डे अपघाताची ही पहिली घटना आहे.

हेही वाचा >>>ठाणे जिल्ह्यातील शाळांना उद्या सुट्टी; अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतर जिल्हा प्रशासनाची खबरदारी

गुरुवारी दुपारी कल्याण डोंबिवली पालिकेचे शहर अभियंता अर्जुन अहिरे यांनी शहर हद्दीतील खड्डे विनाविलंब बुजविण्यात यावेत असे आदेश दिले आहेत. या कामात हलगर्जीपणा करणाऱ्या ठेकेदार, अभियंत्यावर कारवाईचा इशारा आहे. या आदेशानंतर काही तासात खड्डे अपघाताची घटना घडल्याने पालिका प्रशासन मलंगगड रस्त्याचा ठेकेदार, या रस्त्याचा नियंत्रक अभियंता यांच्यावर कारवाई करते का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा >>>उल्हासनगर: धोकादायक इमारतीचा सज्जा कोसळला, इमारत रिकामी असल्याने कोणतीही जीवितहानी नाही

कल्याण पूर्वेतील यापूर्वीचे अपघात

  • २६ जुलै २०१६ रोजी मलंगगड रस्त्यावर प्राजक्ता फुलोरे दुचाकीवरुन जात असताना दुचाकी खडड्यात आपटली. बाजुने जात असलेला डम्पर अंगावरुन गेल्याने मृत्यू.
  • ११ जुलै २०१८ व्दारली येथे तबेला कर्मचारी अण्णा खड्डयात पाय मुरगळून रस्त्यावर पडला. बाजुचे वाहन अंगावरुन गेल्याने मृत्यू.
  • १४ जुलै २०१८ चिंचपाडा रस्त्यावर विलास दलाल दुचाकी खड्ड्यात आपटून गंभीर जखमी.
  • १६ जुलै २०१८ डोंबिवली निवासी सुरेश साने सूचक नाका येथे दुचाकी खड्ड्यात आपटून जखमी.
  • १८ जुलै २०१८- भारती नरे व मुलगी नेतिवली चौक येथे दुचाकी खड्ड्यात आपटून गंभीर जखमी.
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A bike rider died after falling under a dumper while dodging potholes on the malanggad road near kalyan amy