डोंबिवली- डोंबिवली जवळील हेदुटणे गावाजवळील शेतघरात काम करणाऱ्या मजुराचा शेतघर मालक आणि त्याच्या साथीदारांनी खून केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. सहा महिन्यापूर्वी घडलेल्या या खुनाचा आता उलगडा झाल्याने मानपाडा पोलिसांनी मजुराच्या मुलाच्या तक्रारीवरुन शेतघर मालकासह त्याच्या दोन साथीदारा विरुध्द बुधवारी गुन्हा दाखल केला.
संतोष सुदाम सरकटे (४५, हेदुटणे, बदलापूर पाईपलाईन रस्ता, शनिबाबा चाळ) असे मयत मजुराचे नाव आहे. शेतघर मालक नितीन मनोहर पाटील (रा. हेदुटणे), विजय गणपत पाटील, अभिषेक प्रदीप लाड अशी आरोपींची नावे आहेत. संतोष या मजुराचा जानेवारी मध्ये हेदुटणे गावाजवळील मल्हार ढाबा परिसरातील नितीन पाटील याच्या शेतघरात खून करण्यात आला होता. मयत संतोष सरकटे यांचा मुलगा सागर याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेतला आहे.
हेही वाचा >>>ठाणे : भाईंदर रेल्वे स्थानकाजवळील जुन्या इमारतीचा एक भाग कोसळला, तीनजण जखमी
पोलिसांनी सांगितले, संतोष सरकटे हे नितीन पाटील यांच्या हेदुटणे गावा जवळील शेतघरावर मजूर म्हणून काम करत होते. त्यांच्याकडे शेतघर आवारात पाण्याचे किती टँकर भरले याच्या नोंदी ठेवण्याचे काम होते. संतोष हे शेतघरावर विश्वासने काम करत होते. त्यामुळे शेतघर मालक नितीन यांनी संतोष यांच्याकडे आपली बंदूक ठेवण्यास दिली होती. नितीन यांना बंदुकीची गरज असल्याने ते संतोष यांच्याकडे बंदुकीची मागणी करत होते. संतोष यांनी मद्यपान केले असल्याने त्या नशेमध्ये त्यांना बंदूक कोठे ठेवली आहे हे सांगता येत नव्हते. सतत विचारणा करुन संतोष बंदूक देत नसल्याने संतप्त झालेल्या नितीन पाटील यांनी मजूर संतोष यांना बेदम करण्यास सुरूवात केली. या मारहाणीत नितीनचे साथीदार विजय, अभिषेक सहभागी झाले. त्यांनी काठी, लाथाबुक्क्यांनी संतोष यांना मारहाण करुन त्यांना गंभीर जखमी केले.
हेही वाचा >>>ठाण्यात चोवीस तासात २१४ मिमी पावसाची नोंद, यंदाच्या मोसमातील सर्वाधिक पाऊस
गंभीर जखमी झाल्याने संतोष यांना आरोपींनी कोळेगाव मधील ज्ञानदेव रुग्णालयात दाखल केले. तेथे डाॅक्टरांनी त्याला मयत घोषित केले. संतोष यांच्या कुटुंबियांच्या इच्छे विरुध्द संतोष यांचा मृतदेह डोंबिवलीतील स्मशानभूमीत नेऊन तेथे आवश्यक कागदपत्र दाखल न करता संतोष यांच्या पार्थिवाचे आरोपींनी दहन केले. मारहाण, मरण झाल्याच्या कारणाचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आरोपींनी केला.या प्रकरणी कोठेही उघडपणे बोलला तर जीवे ठार मारू अशी धमकी आरोपींनी मयत संतोषचा मुलगा सागर आणि त्याच्या कुुटुंबियांना दिली होती. मानपाडा पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करुन या प्रकरणी गुन्हा दाखल केला.