कल्याण: टिटवाळ्यात राहणारी एक अंध महिला रात्रीच्या वेळेत कांजुरमार्ग येथून लोकलमधून प्रवास करत होती. अपंगाच्या डब्यात सुस्थितीमधील एक महिला आणि पुरूष प्रवासी बसले होते. अंध महिलेने या प्रवाशांना उठण्यास सांगताच पुरूष प्रवाशाने अंध महिलेला शिवीगाळ, मारहाण करत तिचा विनयभंग आणि तिला जीवे ठार मारण्याची धमकी दिली. कल्याण लोहमार्ग पोलिसांनी अंध महिलेला शिवीगाळ करणाऱ्या प्रवाशाला अटक केली आहे.
या घडल्या प्रकाराने अंध महिला अस्वस्थ झाली. या महिलेने कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरी कांदे यांनी तीन तपास पथके तयार करून अंध महिलेला शिवीगाळ, तिचा विनयभंग करणाऱ्या प्रवाशाचा शोध घेण्याची कार्यवाही सुरू केली होती.३३ वर्षाची अंध महिला टिटवाळा येथे राहते. त्या नोकरीनिमित्त कांजुरमार्ग येथे जातात. शुक्रवारी रात्री या अंध महिलेने कांजुरमार्ग रेल्वे स्थानकात सीएसएमटी-टिटवाळा ही लोकल पकडली.
दिव्यांगांच्या डब्यातून ही महिला प्रवास करत होती. दिव्यांग डब्यात चढल्यावर या महिलेला दोन सुस्थितीत असलेले महिला, पुरूष प्रवासी दिव्यांग डब्यात बसले असल्याचे दिसले. डब्यात बसण्यास जागा नसल्याने अंध महिलेने सुस्थितीमधील डब्यातील पुरूष प्रवाशाला आसनावरून उठण्यास सांगितले. त्या जागी आपणास बसण्यास जागा द्यावी, अशी मागणी केली.
हे दोन्ही प्रवासी आसन सोडण्यास तयार नव्हते. त्यामुळे अंध महिलेने त्यांच्यामागे उठण्याचा तगादा लावला. त्याचा राग येऊन पुरूष प्रवाशाने अंध महिलेला शिवीगाळ सुरू केली. त्याला त्याच्या सोबतच्या महिलेनेही साथ दिली. या अंध महिलेचा विनयभंग केला आणि तिला जीवे ठार मारण्याची धमकी प्रवाशाने दिली. या प्रवाशाने महिलेला मारहाण केल्याने ती जखमी झाली.
घडल्या प्रकाराने अंध महिला अस्वस्थ झाली. आपल्या हक्काच्या डब्यात आपणास मारहाण झाल्याने अंध महिलेने कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार केली.पोलिसांच्या तिन्ही पथकांनी कांजुरमार्ग ते टिटवाळा दरम्यानच्या रेल्वे स्थानकांवरील सीसीटीव्ही चित्रण तपासले. यामध्ये अंध महिलेला मारहाण करणाऱ्या पुरूष प्रवाशाची ओळख पटवली. त्याचा निवासाचा पत्ता शोधून त्याला राहत्या घरातून अटक केली.
दिव्यांगांचा डब्यात अंध, दिव्यांग, व्याधीग्रस्त प्रवासी प्रवास करत असतात. त्यांचा तो हक्काचा डबा असुनही अनेक सुस्थितीमधील प्रवासी इतर डब्यांमधील गर्दीचा त्रास टाळण्यासाठी दिव्यांगांच्या डब्यात चढतात. अशा प्रवाशांवर रेल्वे पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाच्या अध्यक्षा लता अरगडे यांनी केली आहे.