ठाणे : ठाणे येथील पोखरण रस्ता क्रमांक दोन भागातील वसंत विहार नाक्यावरील सिग्नलजवळील रस्त्यावरच गणेश मूर्ती विक्रीसाठी भला मोठा मंडप उभारण्यात आला आहे. या मंडपामुळे हा मार्ग अरुंद झाल्याने येथे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊ लागली आहे. या मार्गावर सकाळ आणि सायंकाळच्या वेळेत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून त्याचबरोबर पादचाऱ्यांना चालण्यासाठीही जागा राहिलेली नाही. नागरिकांची वाट अडविणाऱ्या मंडपाकडे पालिका आणि पोलिसांचे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रात सण आणि उत्सव रस्त्यावर साजरे करण्याची परंपरा गेल्या काही वर्षांपासून सुरू झाली आहे. या उत्सवासाठी रस्त्यावर मंडप उभारणे आणि काहीवेळेस कार्यक्रमांसाठी रस्ते अडविणे असे प्रकार सुरू होते. अशा प्रकारांमुळे वाहतूक कोंडी होते. त्याचा फटका रुग्णांना बसण्याची शक्यता असते. यावरूनच नागरिकांमधून नाराजीचा सूर उमटत होता. उच्च न्यायालयातही याप्रकरणी याचिका दाखल झाल्या होत्या. यानंतर न्यायालयाने उत्सव साजरे करताना मंडप उभारणीसाठी काही नियम आखून दिले. त्यानुसार आता शहरात उत्सवांचे मंडप उभारणीसाठी पालिकेकडून परवानगी दिली जात आहेत. यामुळे मंडपांचा आकार काहीसा कमी झाल्याचे चित्र दिसून येते. असे असतानाच आता गणेशमूर्ती विक्रीसाठी रस्त्यावर मंडप उभारण्याचा प्रकार सुरू झाला असून अशाच एका मंडपाने वसंत विहार भागातील रहिवाशांची वाट अडविल्याचे चित्र दिसून येत आहे.
महापालिकेकडून गणेशोत्सव, नवरात्रोत्सवात, गणेशमूर्ती आणि दुर्गामूर्तीच्या विक्रीसाठी रस्त्यालगत तात्पुरते मंडप उभारण्यास परवानगी दिली जाते. प्रामुख्याने वाहतुकीला अडथळा येऊ नये, यासाठी वाहतूक पोलिसांच्या परवानगीचीही मुख्य अट आहे. परंतु, गेल्या काही दिवसांपासून ग्लॅडी अल्वारीस रोडवरील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह ते वसंत विहार नाक्यादरम्यान गणेशमूर्ती विक्रीसाठी भल्या मोठ्या मंडपाला परवानगी दिली आहे. इतकेच नव्हे तर कंत्राटदाराने एका चारचाकी मोटारीसाठीही मंडपाचा विस्तार केला. या मंडपात गणेशमूर्ती विक्रीसाठी मांडल्या असून, गणेशमूर्ती पसंतीसाठी येणाऱ्या भक्तांची वाहने मंडपाजवळच उभी केली जातात. तर मंडपाच्या मागील बाजूला सायंकाळनंतर काही वेळा मद्यपींचा वावर आणि अंधार असल्यामुळे पादचाऱ्यांना रस्त्यावरील वाहनांच्या गर्दीतून मार्ग काढावा लागत आहे.
सिग्नलजवळच मंडप
वसंत विहार नाक्यावर काही दिवसांपासून सिग्नल सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. त्यात लांब मंडपामुळे परिस्थिती आणखी जिकीरीची झाली आहे. हा रस्ता मंडपामुळे अरुंंद झाला आहे. त्यामुळे वाहनांच्या रांगा वाढल्या आहेत. एकीकडे डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाच्या परिसरात वाहतूककोंडी कमी करण्यासाठी पोलिसांनी पार्किंगची नियमावली जारी केली आहे. मात्र, वसंत विहार नाक्याजवळ उभारलेल्या भल्या मोठ्या मंडपाबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.