लोकसत्ता खास प्रतिनिधी

कल्याण : पुण्यातील हिंजवाडी पोलीस ठाणे हद्दीतील एका नर्सरीमध्ये (फूल झाडांची रोपे) काम करणाऱ्या एका मजुराची दोन जणांनी हत्या केली होती. हे आरोपी बिहारमधील होते. ते कल्याण रेल्वे स्थानकातून बिहारला पळणार असल्याची माहिती पुण्याचे साहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे यांना मिळताच, त्यांनी डोंबिवलीतील मानपाडा पोलिसांना कल्याण रेल्वे स्थानक भागात सापळा लावण्यास सांगितले. मानपाडा पोलिसांनी मोठ्या कौशल्याने दोन्ही आरोपींना कल्याण पूर्व रेल्वे परिसरातून मंगळवारी अटक केली.

प्रवीण महातो असे खून झालेल्या मजुराचे नाव आहे. राजु कुमार नथुनी प्रसाद सिंग (३३, शिक्षक, रा. मछनी, ता. सकरा, जि. मुजफ्फरपूर, बिहार), धीरज कुमार रमोद सिंग (२०, रा. सकरा) अशी अटक आरोपींची नावे आहेत. साहाय्यक पोलीस आयुक्त कुराडे यांच्या आदेशावरून मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने, पोलीस निरीक्षक राम चोपडे, साहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत आंधळे यांच्या पथकाने ही अटकेची कारवाई केली.

आणखी वाचा-दरवाजे बंद न झाल्याने वातानुकूलित लोकल डोंबिवली रेल्वे स्थानकात खोळंबली

पोलिसांनी सांगितले, मयत प्रवीण महातो याचे अटक आरोपी शिक्षक राजु सिंग याच्या पत्नी बरोबर अनैतिक संबंध होते. त्याचा राग राजुला होता. तो प्रवीणचा काटा काढण्यासाठी टपून होता. प्रवीण पुण्यातील हिंजवाडी भागातील एका नर्सरीत काम करत होता. तेथे धीरज सिंग प्रवीणवर पाळत आणि त्याचा काटा काढण्यासाठी बिहारहून आला होता. धीरजने राजूला बिहारहून बोलावून घेतले. गेल्या आठवड्यात दोघांनी मिळून प्रवीणची नर्सरीमध्ये हत्या केली होती.

हिंजवाडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. हिंजवाडी पोलिसांची पथके या प्रकरणाचा तपास करत होती. साहाय्यक आयुक्त कुराडे यांना प्रवीणचा खून करून आरोपी बिहार येथे पळून जाणार असल्याची गुप्त माहिती मिळाली. यासाठी ते कल्याण रेल्वे स्थानकातून प्रवास करणार असल्याचे समजले. ही माहिती कुराडे यांनी तात्काळ मानपाडा पोलिसांना दिली. मानपाडा पोलिसांची पथके पोलीस निरीक्षक राम चोपडे, प्रशांत आंधळे यांच्या नेतृत्वाखाली तात्काळ कल्याण रेल्वे स्थानक परिसरात मंगळवारी सकाळी सहा वाजता पोहचली. त्यांनी तेथे सापळे लावले.

आणखी वाचा-भिवंडी येथील राड्यानंतर आयपीएस अधिकाऱ्याची बदली

पोलिसांजवळ आरोपींच्या प्रतीमा होत्या. या प्रतीमांच्या आधारे पथकाने कल्याण रेल्वे स्थानक, परिसरात आरोपींचा शोध सुरू केला. कल्याण रेल्वे स्थानकाबाहेर पिशव्या घेऊन एका औषध विक्री दुकानासमोर दोन जण उभे होते. पोलिसांनी त्यांना ओळखले. हेच ते बिहारला पळणारे फरार आरोपी असल्याची खात्री पटल्यावर पोलिसांंनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांचा ताबा हिंजवाडी पोलिसांना दिला. वीस मिनिटाच्या अवधीत पोलिसांनी ही धरपकड केली.