ठाणे – जिल्ह्यात यापुढे कोणत्याही महापालिका क्षेत्रात अनधिकृत बांधकामे आढळून आले तर महापालिका आयुक्तांना सर्वस्वी जबाबदार ठरवून त्यांच्यावर  कायदेशीररित्या कारवाई करण्यात येईल, असा इशारा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी मंगळवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत  दिला. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरू असल्याचा लोकप्रतिनिधींनी लावताच त्यांनी हा इशारा दिला. या सर्व अधिकाऱ्यांचा सविस्तर अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेही सादर केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> कल्याणवरून कोकणात जाणारी एकही गणपती विशेष रेल्वेगाडी नाही; कोकणवासियांचा संताप

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात जिल्ह्यातील सर्व पक्ष लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. यावेळी सर्व पक्षीय लोकप्रतिनिधींनी जिल्ह्यात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांचा पाढा वाचून दाखवला. या बैठकीत अनधिकृत बांधकामांवर रेरा अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव चर्चेला आला. त्यावेळी अनधिकृत बांधकामांवर कोणतीच ठोस कारवाई होत नसल्याचे सांगत आमदार गणपत गायकवाड यांनी नाराजी व्यक्त केली. कारवाई न करता केवळ नोटीस देण्यात येते, मात्र अनधिकृत बांधकामे सुरुच असल्याचे देखील त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. याच बरोबर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी देखील अनधिकृत बांधकामांबाबत स्पष्ट नाराजी व्यक्त केली.

स्थानिक पालिका प्रशासनाला त्यांच्या अखत्यारित उभ्या राहत असलेला अनधिकृत बांधकाबाबत सविस्तर माहिती असते. मग अशा वेळी नोटीस पाठवणे आणि त्यानंतर पुढील कार्यवाही करणे, हा सोपस्कार का पार पडला जातो, असा थेट सवाल यावेळी खासदार शिंदे यांनी उपस्थित केला. यावर उत्तर देताना यापुढे जिल्ह्यातील सर्व अनधिकृत बांधकामांवर तातडीने कारवाई करण्यात यावी. कोणत्याही पद्धतीचे सोपस्कार पार पाडण्याऐवजी ही बांधकामे थेट निष्कासित करण्यात यावी, अशा सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सर्व अधिकाऱ्यांना दिल्या. त्याचबरोबर ज्या महापालिका क्षेत्रात अशी अनधिकृत बांधकामे सुरु आहेत, त्यांच्यावर कोणतीच कारवाई करण्यात आलेली नसल्याचे निदर्शनास आले तर त्या ठिकाणच्या पालिका आयुक्तांना जबाबदार धरण्यात येईल, असा इशारा पालकमंत्री देसाई यांनी दिला.

हेही वाचा >>> ‘ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो ५’: कशेळी कारशेडच्या कामाला दीड – दोन महिन्यांत सुरुवात

आरोग्य व्यवस्था बळकट व्हावी यासाठी सर्व रुग्णालयांचा आढावा

जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था बळकट व्हावी यासाठी सर्व रुग्णालयांचा आढावा घेण्यात यावा. प्रत्येक शहरातील लोकसंख्येनुसार आरोग्य व्यवस्थेचे लेखापरीक्षण करावे. अपुरे मनुष्यबळ असल्यास त्या ठिकाणी पदे भरण्यात यावी. यासाठी जिल्हाधिकारी जिल्हा शल्य चिकित्सक तसेच आरोग्य विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली समिती स्थापन करण्यात यावी, असा विषय यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी उपस्थित केला. याबाबत लवकरच समिती स्थापन करून त्यावर योग्य पद्धतीने कार्यवाही केली जाईल. असे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केले.

बैठक लांबणीवर

नाराजी मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात झालेल्या ठाणे जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. त्यानंतर  मंगळवारी ही बैठक पार पडली. यामुळे या बैठकीला उपस्थित असलेल्या लोकप्रतिनिधींनी पालकमंत्र्यांसमोर स्पष्ट नाराजी व्यक्त केली. इतक्या मोठ्या कालावधीनंतर बैठक आयोजित केल्याने लोकप्रतिनिधींना त्यांचे विषय मांडण्यासाठी अत्यंत कमी वेळ मिळतो आहे. तसेच या बैठकीला अधिकारीच उपस्थित राहत नसल्याने त्यांच्यामध्ये देखील याबाबत गांभीर्य नसल्याचे लोकप्रतिनिधीनी सांगितले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Action against municipal commissioner if unauthorized constructions found in thane says minister shambhuraj desai zws