Actor Astad kale ghodbandar road condition ठाणे : मुंबई – ठाण्यातून प्रवास करताना नागरिकांना वाहतूक कोंडी, रस्त्यावरील खड्डे अशा अनेक समस्यांना सामना करावा लागतो. त्यात घोडबंदर रस्त्यावरील समस्यांचा मुद्दा हा आता कायम चर्चेतला मुख्य ठरला आहे. गेल्या काही दिवसांपासून शशांक केतकर, जुई गडकरी, ऐश्वर्या नारकर, अपूर्वा नेमळेकर, अभिजित केळकर तसेच रूपाली भोसले या मराठी कलाकारांनी या विरोधात आवाज उठवला होता. पण, या रस्त्यांची अवस्था मात्र ‘जैसे थे’च आहे. ठाणे शहरातील रस्त्यांची दुरवस्था ही काही नवीन गोष्ट राहिलेली नाही. आता आणखी एका मराठी अभिनेत्याने नुकताच या रस्त्याच्या परिस्थितीवर थेट सरकारला जाब विचारणारा व्हिडीओ शेअर केला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला, हजारो प्रतिक्रिया आल्या, नागरिकांनीही आपला रोष व्यक्त केला आहे.

सध्या स्टार प्रवाहवर सुरू असलेली ‘हळद रुसली कुंकू हसले’ या मालिकेत ‘आढळराव’ची भुमिका साकारणारा प्रसिद्ध कलाकार अस्ताद काळे याने समाज माध्यमावर व्हिडीओ शेअर केला आहे. अस्ताद काळे या कलाकाराने आधी ‘पुढचं पाऊल’,‘सरस्वती’ अशा विविध मराठी मालिकांमध्ये काम केले आहे. आस्ताद काळे हा सोशल मीडियावर कायमच सक्रिय असतो. सोशल मीडियाद्वारे तो त्याचे राजकीय, सामाजिक विचार अगदी मुक्तपणे व्यक्त करताना दिसतो. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला ठाणे-घोडबंदर रोडच्या दुरवस्थेचा व्हिडीओ चर्चेत आहे.

“आमच्याच पैशांतून तुम्ही हेलिकॉप्टरने हिंडता…”

व्हिडीओमध्ये आस्ताद काळे म्हणतो, “हा आहे Golden Quadrilateral रोडचा भाग! घोडबंदर रोडची ही अवस्था अजून किती वर्षे राहणार आहे? गडकरी साहेब, मुख्यमंत्री साहेब, नगरसेवक, महापालिका… हे कधी सुधारणार?” तसेच आम्ही सगळ्या नागरिकांनी अजून किती वर्षे जीव मुठीत घेऊन हा प्रवास करायचा आहे?” असा सवाल केला आहे.

पुढे व्हिडीओ दाखवत सांगत आहे की, “आता बघा खड्ड्यांचा आकार… यात माझ्या गाडीचं काय हाल होतंय ते पाहा. काही दिवसांपूर्वी कामासाठी रोड बंद ठेवला होता, यंत्रसामग्री ठेवली होती, पण काम काही झालंच नाही. पाऊसही थांबला, पण तुमची इच्छाच नाही. कारण तुम्हाला हे सहन करावं लागत नाही… तुम्ही आमच्याच पैशांतून हेलिकॉप्टरने हिंडता!”

“निदान इभ्रतीचा प्रश्न म्हणून तरी लक्ष द्या!”

आस्ताद काळेचा रोष यानंतर अधिक तीव्र होतो. तो म्हणतो, “Golden Quadrilateral लिहायला लाज वाटत नाही का? रस्त्यांची ही अवस्था असताना हे नाव शोभतं का? मला उत्तर द्या… मी एक जबाबदार नागरिक आहे, टॅक्स भरतो. गडकरी साहेब, फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब… निदान इभ्रतीचा प्रश्न म्हणून तरी लक्ष द्या.”