बदलापूरः महाराष्ट्रातील तसेच महाराष्ट्राबाहेरील दर्जेदार कादंबरी लेखकांना प्रोत्साहन देण्यासाठी बदलापुरातील आदर्श विद्या प्रसारक संस्थेतर्फे यंदापासून “आदर्श ग्रंथ पुरस्कार” सुरू करण्यात आला आहे. हा पुरस्कार कादंबरी या साहित्यप्रकारासाठी देण्यात येणार असून, निवड झालेल्या लेखकाला ५ हजार रोख, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह आणि शाल देऊन सन्मानित करण्यात येईल.

या उपक्रमाचे आयोजन आदर्श कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातर्फे करण्यात आले आहे. या माध्यमातून राज्यातील आणि राज्याबाहेरील कादंबरीकारांनी आपले साहित्य अधिक व्यापक स्तरावर पोहोचवावे आणि गुणवत्तापूर्ण लेखनाला प्रोत्साहन मिळावे हा उद्देश संस्थेचा आहे.

पुरस्कारासाठी पात्र ठरणाऱ्या कादंबऱ्या १ जानेवारी २०१९ ते ३१ मे २०२५ या कालावधीत प्रथमच प्रकाशित झालेल्या असाव्यात. इच्छुक लेखकांनी आपल्या कादंबरीच्या तीन प्रती ग्रंथपाल, आदर्श कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, कुळगाव – बदलापूर, ता. अंबरनाथ, जि. ठाणे, पिन – ४२१५०३ पत्त्यावर २० डिसेंबर २०२६ पर्यंत पाठवाव्यात असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

या पुरस्कारासाठी आलेल्या कादंबऱ्यांचे परीक्षण महाराष्ट्रातील प्रसिद्ध कादंबरीकार किंवा समीक्षक यांच्या मार्फत केले जाणार आहे. परीक्षणानंतर ११ जानेवारी २०२६ रोजी ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त वि. स. खांडेकर यांच्या जयंती दिनी विजेत्या कादंबरीची घोषणा करण्यात येईल. यानंतर मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त २७ फेब्रुवारी २०२६ रोजी आदर्श महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात सुप्रसिद्ध साहित्यिक आणि मान्यवरांच्या हस्ते आदर्श ग्रंथ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी मराठी विभागप्रमुख डॉ. संदीप भेले यांना ९८८१४२२४५३ क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.