ठाणे – घोडबंदर मार्गावरील अवजड वाहतूकीचा भार कमी करण्यासाठी आखण्यात आलेल्या बाळकुम ते गायमुख या खाडीकिनारी मार्गासाठी आवश्यक असलेल्या प्रदुषण विभागासह इतक परवानग्या नुकत्याच मिळाल्या आहेत. सर्व परवानगी मिळाल्याची माहिती ठाणे महापालिकेने उच्च न्यायालयासमोर सादर केली असून न्यायालयाकडून प्रकल्पास हिरवा कंदील मिळताच प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरूवात होणार आहे, अशी माहिती पालिका सुत्रांनी दिली.
घोडबंदर मार्गावर अवज़ड वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. या वाहतूकीमुळे या मार्गावर कोंडी होते. या मार्गाला पर्याय म्हणून ठाणे खाडीकिनारी मार्ग उभारण्यात येणार आहे. खारेगाव ते गायमुख असा १३ किमी लांबीचा हा मार्ग असणार आहे. ठाणे महापालिकेने या प्रकल्पाचा आराखडा तयार केला होता. या प्रकल्पाचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत केले जाणार आहे. या प्रस्तावास २०२१ मध्ये प्राधिकरणाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली होती. सुरूवातीला या प्रकल्पासाठी १३१६.१८ कोटी रुपये इतका खर्च गृहीत धरण्यात आला होता. प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराने आराखडा सादर केल्यानंतर या खर्चात दुपटीने वाढ झाली होती. ठाणे खाडी किनारा रस्ता प्रकल्पासाठी २७२७ कोटी रुपये इतका निधी लागणा असून ‘एमएमआरडीए’च्या बैठकीत मंजुरी देण्यात आली होती. या कामासाठी एमएमआरडीएने निविदा प्रक्रीया राबवून ५ सप्टेंबर २०२४ रोजी ठेकेदार निश्चित केला आहे. असे असले तरी केंद्र शासनाच्या सीआरझेड विभागाने अद्याप हिरवा कंदील दाखविला नसल्यामुळे प्रकल्पाचे काम प्रत्यक्षात सुरू होऊ शकलेले नव्हते. यामुळेच विधानसभा निवडणुकीच्या आधी घाईगडबडीत निविदा अंतिम करून ठेकेदार निश्चित केल्याची टिका झाली होती.
परवानगी मिळाल्या
या प्रकल्पासाठी वनविभाग, सीआरझेड विभाग, वायु दल आणि केंद्रीय पर्यावरण विभागाच्या मंजुरी आवश्यक होत्या. या सर्व परवानगी पालिकेने नुकत्याच घेतल्या आहेत. प्रकल्पासाठी भूसंपादन कार्यवाही तसेच पर्यावरणविषयक मंजुरी घेण्याची जबाबदारी ठाणे महापालिकेवर आहे. भुसंपादन प्रक्रीया पुर्ण करण्याबरोबरच पालिकेने पुर्ण केलेली आहे.
उच्च न्यायालयात माहिती सादर
विविध प्रकल्पांची कामे सुरू झाल्यानंतर त्यांच्या विषयी जनहित याचिका दाखल होत होत्या. या प्रकल्पाविषयी नागरिकांचे किंवा पर्यावरण प्रेमींकडून हरकती नोंदविल्या जात होता. यामुळे प्रकल्प रखडण्याबरोबरच त्याच्या खर्चात वाढ होत होती. या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाने एक महत्वाचा निर्णय दिला होता. प्रकल्पांच्या सर्व परवानगी मिळाल्यानंतर त्यास उच्च न्यायालयाची मान्यता घ्यावी, असा निर्णय दिला होता. त्यानुसार, ठाणे खाडी किनारी मार्गाच्या सर्व परवानगी मिळताच पालिकेने १३ ऑगस्ट रोजी उच्च न्यायालयापुढे माहिती सादर केली असून त्याची सुनावणी ४ नोव्हेंबर रोजी होणार आहे, अशी माहिती पालिका सुत्रांनी दिली.
प्रकल्पाची माहीती
बाळकुम ते गायमुख खाडी किनारी मार्ग
लांबी – १३.४५ किमी
व्याप्ती – ४० मीटर रुंंद (३ अधिक ३ मार्गिका) ८.११ किमी उन्नत मार्ग आणि जमीनीवरील ५.२२ किमी रस्ता. तसेच कळवा खाडीवरील १२० मीटरचा खाडी पुल समाविष्ट आहे.
कंत्राटदार – मे. नवयुग इंजिनिअरिंग कंपनी लिमिटेड
प्रकल्प खर्च – २७२७