अंबरनाथ : अंबरनाथजवळील कर्जत–काटई राज्यमार्गावर पाले भागातील डी-मार्टजवळ रविवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला असून, एकजण गंभीर जखमी झाला आहे. कंटेनरची धडक लागल्याने हा अपघात झाला. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
काटई कर्जत राज्यमार्गावरील बहुतांश भागाचे कॉंक्रिटीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे ज्या भागात रस्ता चांगला आहे त्या भागात वाहतुकीचा वेगही वाढला आहे. मात्र या मार्गाचा चांगला वापर करण्याऐवजी अनेकदा वाहनचालक वाहने बदरकारपणेच चालवतात. त्यामुळे अपघाताची भिती असते. या मार्गावर रस्ता ओलांडणाऱ्या स्थानिकांना मोठा संघर्ष करावा लागत असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. तर या मार्गावर बेदरकार वाहनचालकांमुळे अपघातही होऊ लागले आहेत.
रविवारी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास एका भरधाव कंटेनरने दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत वसार येथील रहिवासी सत्यम बिंद (१६) आणि शाम राजभर ( १६) या दोघांचा जागीच मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. तर त्यांच्यासोबत दुचाकीवर असलेला वैभव जाधव (१६) हा गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वैभवची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या अपघातानंतर कंटेनरचालकाने घटनास्थळावरून पलायन केले. मात्र, शिवाजीनगर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली आणि अपघाताची नोंद घेतली. कंटेनरचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक रमेश पाटील यांनी दिली.
कर्जत–काटई राज्य मार्गाचे काही महिन्यांपूर्वी सिमेंट काँक्रीटीकरण झाले असून, सकाळ-संध्याकाळ या मार्गावर वाहतुकीची प्रचंड कोंडी असते. पहाटेच्या वेळेत अवजड वाहनांचे बेदरकार वेगाने रस्त्यावर धावणे हे अपघातांना आमंत्रण ठरत आहे. स्थानिक नागरिकांनी यापूर्वीही या मार्गावरील धोकादायक वेगामुळे सुरक्षेची मागणी केली होती. या अपघातानंतर परिसरात हळहळ व्यक्त होत असून, दोन निरपराध तरुणांचे अकाली झालेले निधन सर्वांनाच चटका लावून गेले आहे.