अंबरनाथ : हेडफोन घालून रेल्वे रूळ ओलांडताना रेल्वेच्या धडकेत एक महिलेचा मृत्यू झाला आहे. तर या महिलेला वाचवायला गेलेला तिच्या सहकारी तरुणानेही यात जीव गमावला आहे. अंबरनाथच्या मोरीवली गावाजवळ ही घटना घडली आहे. या घटनेनंतर या भागात पादचारी आणि उड्डाणपुलाची मागणी जोर धरते आहे.अंबरनाथ शहराच्या पूर्व आणि पश्चिम भागाला जोडण्यासाठी सध्याच्या घडीला दोन रेल्वे उड्डाणपूल अस्तित्वात आहेत. तर तिसऱ्या उड्डाणपुलाचे काम अर्धवट आहे.

एक पूल शहराच्या वेशीवर फॉरेस्ट नाका परिसरात आहे. तर दुसरा पूल रेल्वे स्थानकाजवळ शहराच्या मध्यवर्ती भागात आहे. या दोन पूलांमध्ये मोठी अंतर आहे. त्यामुळे बी केबिन रस्त्याशेजारी मोरीवली गावातील अनेक कामगार नागरिक शेजारच्या औद्योगिक वसाहतीत जाण्यासाठी रेल्वे रुळ ओलांडतात. यात अनेकदा अपघात होत असतात. असाच काहीसा अपघात २० जुलै रोजी झाला.

अंबरनाथच्या मोरीवली गावात राहणाऱ्या ४५ वर्षीय वैशाली धोत्रे आणि महालक्ष्मी नगरमध्ये राहणारा २९ वर्षीय आतिष आंबेकर हे दोघे अंबरनाथच्या आनंदनगर एमआयडीसीत एकाच कंपनीत कामाला होते. रविवारी २० जुलै रोजी सायंकाळी साडे ७ वाजता ते कंपनीतून घरी जाण्यासाठी निघाले. यावेळी आतिष हा वैशाली यांना सोडण्यासाठी बी केबीन रोडवरील मोरीवली गावाजवळ गेला. तिथून वैशाली या हेडफोन घालून फोनवर बोलत रेल्वे रूळ ओलांडत असतानाच रेल्वे आली. यावेळी आतिष आणि अन्य काही लोकांनी वैशाली यांना आवाज दिला. पण त्यांचे लक्ष नसल्याने आतिष हा वैशाली यांना वाचवण्यासाठी धावला. त्याचवेळी या दोघांनाही रेल्वेने जोरदार धडक दिली. यात या दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला.

आतिष याच्या दोन्ही मोठ्या बहिणींची लग्नं झालेली असून तो त्याच्या वृद्ध आईवडिलांचा एकमेव आधार होता. त्याच्या अशा अकाली मृत्यूने आई वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तर दुसरीकडे वैशाली यांना एक मुलगी आणि २२ वर्षाचा मुलगा असून त्यांचे पती रिक्षाचालक आहेत. यंदा मुलीचे लग्न करण्याची तयारी त्यांचे कुटुंब करत होते. अशातच त्यांचा मृत्यू झाल्याने कुटुंबाचा आधार हरपला आहे.

पादचारी पुलाची मागणी प्रलंबितच

मोरीवली गाव ते बी केबीन रोड असा पादचारी पूल उभारण्याची मागणी पुन्हा होऊ लागली आहे. मोरीवली गावचे माजी नगरसेवक नंदकुमार भागवत यांनी या पादचारी पुलासह बाजूला उड्डाणपूल उभारावा, अशी मागणी अनेकदा केली आहे. मात्र रेल्वे प्रशासन आणखी किती बळी गेल्यावर याकडे लक्ष देणार, असा सवाल त्यांनी विचारला आहे. हेडफोन घालून रेल्वे रूळ ओलांडत असल्यामुळे वैशाली यांचा जीव गेला, अन त्यांना वाचवताना आतिषही जीवाला मुकला. मात्र या घटनेनंतर भविष्यात अशा दुर्घटना होऊ नये, यासाठी रेल्वे प्रशासनाने वेळीच उपाययोजना करण्याची मागणी होते आहे.