ठाणे : जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना जगभरातील विद्यार्थ्यांशी संवाद साधता यावा तसेच विविध देशांच्या संस्कृतीची ओळख त्यांना व्हावी या उद्देशाने ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यातील कान्होर इंदगाव केंद्र या जिल्हा परिषद शाळेत ‘जर्मन भाषेद्वारे जगाला जोडू या’(लेट्स कनेक्ट द वर्ल्ड थ्रू जर्मन लॅंग्वेज) हा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जर्मन भाषा शिकवली जात आहे.
जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ व्हावी ते विद्यार्थी स्पर्धा परिक्षेसाठी तयार व्हावेत यासाठी ठाणे जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्यकार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी दिशा उपक्रम सुरु केला. या उपक्रमात कृत्रीम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करुन विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते. या उपक्रमाचे राज्यस्तरावर कौतूक होत आहे. या उपक्रमासह जिल्ह्यातील काही जिल्हा परिषद शाळेतील मुख्यध्यापक आणि शिक्षक वेगवेगळे उपक्रम राबवित विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण देण्याचा प्रयत्न करत असल्याचे पाहायला मिळत आहे.
हे जागतिकीकरणाचे युग आहे. जगभरातील शिक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान आणि संस्कृती यांचा परस्परांशी सतत संपर्क वाढत आहे. अशा या बदलत्या काळात विद्यार्थ्यांनी केवळ आपल्या भाषेपुरते मर्यादित राहू नये, त्यांनी जगातील इतर भाषांचे ज्ञान घेणे गरजेचे बनले आहे. काही खासगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना विविध देशांची भाष्या अभ्यासक्रमात असते. परंतू, शासकीय शाळांमध्ये असे शिक्षण उपलब्ध नसते. परंतू, ठाणे जिल्ह्याच्या अंबरनाथ तालुक्यातील कान्होर इंदगाव केंद्र जिल्हा परिषद शाळा यासाठी अपवाद ठरली आहे. या शाळेतील मुख्यध्यापक अमोल पेन्सलवार यांच्या संकल्पनेतून शाळेत विद्यार्थ्यांना जर्मन भाषेचे प्रशिक्षण दिले जात आहेत. विद्यार्थ्यांना भविष्यवेधी शिक्षण देणे आणि त्यांना जगाशी जोडणे हा या उपक्रमाचा उद्देश असल्याची माहिती मुख्यध्यापक अमोल पेन्सलवार यांनी दिली.
अशी आहे उपक्रमाची संकल्पना
विद्यार्थ्यांना विविध देशांतील भाषा, संस्कृती आणि जीवनपद्धती यांची ओळख करून त्यांच्यात जागतिक दृष्टिकोन निर्माण करणे ही या उपक्रमाची मूलभूत संकल्पना आहे. या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना जर्मन भाषा शिकण्याची संधी मिळत आहे. तसेच जागतिक स्तरावर संवाद कौशल्य वाढविणे, सांस्कृतिक आदानप्रदान करणे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नवी दारे खुली करणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे, अशी माहिती शाळेच्या वतीने देण्यात आली.
अशा प्रकारे जर्मन भाषेचे प्रशिक्षण दिले जाते
कोणतीही भाषा हे संवादाचे प्रभावी माध्यम असते. या अनुषंगाने विद्यार्थ्यांना सुरुवातीला जर्मन भाषेतील विविध शब्दांची ओळख करून दिली जात आहे. त्यानंतर, छोट्या छोट्या वाक्यांचे संवाद याविषयी माहिती दिली जाते. त्यामुळे आता विद्यार्थी मराठी हिंदी इंग्रजी सोबतच जर्मन भाषेत सुद्धा एकमेकांशी संवाद साधत आहेत. विशेषकरुन घरी पालकांसमोर देखील ते या भाषेत बोलण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे पालकांना देखील या उपक्रमाचे कौतूक वाटतं आहे.