ठाणे : महापालिका अतिक्रमण विरोधी पथकाला पाहून पळ काढणाऱ्या फेरीवाल्याच्या हातगाडीचा धक्का लागून खाली पडून एका ६५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेबाबत सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, जखमी अवस्थेत रस्त्यावर पडलेल्या वृद्धाला रुग्णालयात नेण्याची मदत करण्याऐवजी अतिक्रमण विभागाचे पथक तिथून पुढे निघून गेले. अखेर परिसरातील नागरिकांनी पुढे येऊन त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. यामुळे पालिकेच्या कारभारावरही टीका होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मनोहर सहदेव महाडिक (६५) असे मृत पावलेल्या वृद्धाचे नाव आहे. ते लोकमान्यनगर येथील लाकडी पूल परिसरातील दत्त प्रसाद इमारतीत दुसऱ्या मजल्यावर पत्नीसोबत राहत होते. ते रिक्षा चालविण्याचे काम करीत होते. परंतु वयोमानामुळे त्यांनी हे काम बंद केले होते. त्यांची पत्नी उषा या काल्हेर परिसरातील एका गारमेंटमध्ये काम करतात. मनोहर हे शनिवारी दुपारी भाजी घेण्यासाठी लाकडी पुल परिसरात आले. त्यावेळी ठाणे महापालिका अतिक्रमण विभागाचे वाहन त्या परिसरात आले. या वाहनांला पाहून फेरिवाले तेथून पळ काढत होते. याच दरम्यान एका फेरिवाल्याच्या हातगाडीचा धक्का लागून मनोहर हे खाली पडले आणि त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. नागरिकांनी अतिक्रमण विभागाचे वाहन थांबवून त्यांना रुग्णालयात नेण्याची विनंती केली. परंतु त्याकडे दुर्लक्ष करून पथक पुढे निघून गेले, असा आरोप त्यांचे बंधू सतिश महाडिक यांनी केला आहे.

हेही वाचा – समविचारी पक्षांसोबत बैठक घेऊन वेगळा संदेश देऊया… जितेंद्र आव्हाड यांचे प्रकाश आंबेडकरांना पत्र

मनोहर यांना परिसरातील नागरिकांनी जवळील एका दवाखान्यात नेले आणि त्यानंतर कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात नेले. तिथे न्युरो सर्जन नसल्यामुळे त्यांना मुंबईतील जे. जे रुग्णालयात हलविण्यात आले. तिथे उपचार सुरू असताना, त्यांचा रविवारी सायंकाळी मृत्यू झाला, असे सतिश यांनी सांगितले. असे प्रकार यापुढे घडू नयेत यासाठी पालिकेने उपाययोजना करायला हवी, असे सांगत मनोहर यांच्या मृत्यूप्रकरणी त्यांच्या पत्नी उषा यांना पालिका प्रशासनाने नुकसान भरपाई द्यायला हवी, अशी मागणीही त्यांनी केली.

हेही वाचा – कल्याणमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे ५० कोटीचे रस्ते, रस्ते कामांना पालिकेकडून ना हरकत

या संदर्भात लोकमान्य-सावरकरनगर प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त भालचंद्र घुगे यांच्याशी वारंवार संपर्क साधला असता, त्यांनी याबाबत माहिती घेऊन प्रतिक्रिया देतो, असे सांगितले. त्यानंतर मात्र वारंवार संपर्क साधूनही त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: An old man died after being hit by a peddler handcart in thane ssb