ठाणे- शिंदे गट वेगळा होऊन राज्य सरकार स्थापन झाल्यानंतर ठाण्यातील राजकीय घडामोडींनाही मोठा वेग आला आहे. परंतू, मुळ शिवसैनिक बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्यातील पहिल्या महिला शिवसैनिक अनिता बिर्जे या शिवसेनेतच असल्याची माहिती समोर आली आहे. नुकत्याच ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील महिला पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये ठाणे आणि पालघर जिल्हा महिला संपर्क संघटक म्हणून अनिता बिर्जे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाणे जिल्हा हा शिवसेना पक्षाचा बालेकिल्ला मानला जातो. शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्याची कमान हाती घेतली. त्यांनी जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढविण्याबरोबरच त्यांचे वर्चस्व निर्माण केले. यामुळेच बंडखोरीनंतर त्यांना जिल्ह्यातून मोठे समर्थन मिळताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी शिंदे गटाने वेगळे होऊन भाजप सोबत सरकार स्थापन केले. जिल्हा प्रमुखापासून ते पालिका नगरसेवकांपर्यंत सर्वांनी मुख्यमंत्री शिंदे यांना समर्थन दिले आहे. त्यानंतर, ज्या मुळ शिवसैनिकांनी ३० ते ४० वर्षे शिवसेनेसाठी दिली, त्यांचे काय असा प्रश्न समोर आला होता. दरम्यान, ठाणे शहरात अशाही काही घटना घडल्या की उद्धव ठाकरे समर्थक आणि शिंदे समर्थकांनी शाखेवर दावा केला. हा वाद निर्माण झाला असतानाच, सोमवारी ठाणे, पालघर जिल्हा महिला पदाधिकाऱ्यांची बैठक मातोश्रीवर पार पडली. यामध्ये महिला पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. या नियुक्त्यांमधून ही बाब स्पष्ट झाली की, मूळ शिवसैनिक असलेल्या अनिता बिर्जे यांची ठाणे आणि पालघर महिला जिल्हा संपर्क संघटक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यावरुन त्या शिवसेनेतच असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर, ठाणे जिल्ह्यात शिवसेनेतून पुरुष जरी बाहेर पडले असले तरी, जिल्ह्यात महिलांना शिवसेना पुन्हा उभी करण्याची संधी दिली आहे का असा प्रश्न निर्माण होत आहे. धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाच्या माध्यमातून अनिता बिर्जे यांचे संघटनेतील काम घराघरात पोहोचले. दिघेंच्या काळात अनिता बिर्जे यांच्या नेतृत्वाखाली अनेक महिला कार्यकर्त्या तयार झाल्या होत्या. त्यावेळी जिल्ह्यात महिला आघाडीचाही वेगळाचं दराळा होता. बिर्जे यांचे धाडसी नेतृत्त्व असल्यामुळे दिघेही त्यांना शिवसेनेची वाघिन म्हणून संबोधत असतं. दिघेंच्या निधनानंतर अनिता बिर्जे या राजकारणात फारशा सक्रिय नसल्याचे दिसून आले. परंतू, सध्या निर्माण झालेल्या राजकीय घडामोडींमध्ये अनिता बिर्जे या पुन्हा सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे.

दिघे समर्थक बिर्जे बाई कडे पुन्हा शिवसेनेची धुरा

अनिता बिर्जे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी ठाणे आणि पालघर जिल्हा महिला संपर्क संघटक म्हणून नियुक्ती झाली असल्याची माहिती दिली, परंतू, याबाबत त्यांनी प्रतिक्रिया देण्यास टाळले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anita birje first woman shiv sainik in thane district remain in shiv sena zws