मुंबई आणि ठाणे शहराच्या वेशीवर असलेल्या आणि पूर्व द्रुतगती महामार्गावरील वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या कोपरी रेल्वे उड्डाणपुलाच्या मार्गिकेच्या दुसऱ्या टप्प्यातील काम जवळ-जवळ संपुष्टात आले आहे. गुरुवारपासून प्रशासनाने कोंडी टाळण्यासाठी दोन्ही दिशेकडील एक-एक पदरी मार्गिका सुरू केली आहे. त्यामुळे ही मार्गिका आता तीन-तीन पदरी सुरू झाली आहे. येत्या काही दिवसांत मार्गिकेतील उर्वरित एक-एक पदरी मार्गही सुरू केला जाणार आहे. त्यामुळे ठाणेकरांची कोपरी पुलावर होणारी कोंडी टळणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई आणि ठाणे शहराला जोडणारा कोपरी उड्डाणपूल हा वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. हा मार्ग धोकादायक तसेच अरुंद असल्याने २०१८ पासून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) आणि मध्य रेल्वेकडून हा उड्डाणपूल तोडून त्याठिकाणी आठ पदरी पूल करण्याचे काम सुरू केले आहे. एमएमआरडीएने दोन टप्प्यात या पुलाच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले होते. सुमारे दीड वर्षांपूर्वी या पुलाच्या पहिल्या टप्प्याचे म्हणजेच, मुख्य पुलालगत दोन अतिरिक्त मार्गिका तयार करण्याचे काम पूर्ण झाले आहे. या अतिरिक्त मार्गिका सुरू झाल्यानंतर एमएमआरडीए आणि रेल्वेने मुख्य उड्डापणुलाच्या मार्गिकेच्या निर्माणाचे म्हणजेच, मुख्य पुलाचे काम हाती घेतले होते.

हेही वाचा – नागपूर शिक्षक मतदारसंघात मविआ विरुद्ध वंचित, सेनेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

हेही वाचा – नागपूर : प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्यावर कारवाई करा, लहू सेना आक्रमक

मुख्य पूलाच्या मार्गावर काम सुरू झाल्याने कोपरी येथील सेवा रस्त्यावर वाहनांचा भार वाढला होता. त्यामुळे दररोज सकाळी आणि रात्रीच्या वेळेत ठाणेकरांना वाहतूक कोंडीचा सामना सहन करावा लागत आहे. अनेकदा सकाळी तीन हात नाका उड्डाणपूलापर्यंत वाहतूक कोंडी होते. त्यामुळे मुंबईत कामानिमित्त जाणाऱ्या वाहन चालकांचे हाल होत असतात. सध्या या मुख्य पूलाचे काम जवळ जवळ संपुष्टात आले आहे. त्यामुळे प्रशासनाने मुख्य पुलावरील एक-एक पदरी मार्गिका सुरू केली आहे. उर्वरित एक-एक पदरी मार्गिका ही किरकोळ कामांसाठी बंद ठेवण्यात आली आहे. ही मार्गिकाही येत्या काही दिवसांत सुरू होईल. त्यामुळे वाहन चालकांना एकूण आठ पदरी मार्गिकेचा वापर वाहतूकीसाठी करता येईल.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Another route starts at the kopri flyover in thane ssb