डोंबिवली पूर्वेत पेंढरकर महाविद्यालयाच्या समोर रोटरी भवनच्या आवारात हे फुलपाखरू उद्यान विकसित करण्यात आले आहे. फुलपाखरांना येथे मुक्त वावर करता यावा अशीच रचना या उद्यानाची करण्यात आली आहे. फुलपाखरांना कोणत्या प्रकारची झाडे, वनस्पती आवश्यक आहे, याचा विचार करून या वनस्पतींची लागवड येथे करण्यात आली आहे. इक्झोरा, लॅन्टेना (घानेरी),
शालेय विद्यार्थ्यांना शाळेत फुलपाखरू, त्याचा जीवनक्रम आदी माहिती शिकविली जाते. मात्र त्यांना प्रत्यक्षात याचा अभ्यास करायचा असेल, तर हे उद्यान एक पर्वणीच आहे. शालेय विद्यार्थी त्यांच्या शिक्षकांसह येथे फुलपाखरांविषयी प्रात्यक्षिक माहिती घेऊ शकतात. त्याशिवाय फुलपाखरांचे अभ्यासकही येथे येऊन विविध प्रकारच्या, प्रजातींच्या फुलपाखरांचा अभ्यास करू शकतात, त्याशिवाय अरण्य छायाचित्रांची आवड असणारे छायाचित्रकारही येथे फुलपाखरांचे वा येथील वनस्पतींचे छायाचित्रण करण्यासाठी येऊ शकतात.
आकर्षक आणि सुंदर असल्याने फुलपाखरू कवींचेही आकर्षण असतेच. बहुतेक साऱ्या भाषेत फुलपाखरांना शब्दबद्ध करण्यात आले आहे. यातीलच काही निवडक कविता वेचून त्याचे फलक या उद्यानात लावण्यात आले आहेत. ग. ह. पाटील यांची ‘फुलपाखरू छान किती दिसते’, डॉ. परशूराम शुक्ल यांची ‘रंगीबेरंगी प्यारी तितली’ या कवितांसह विल्यम वर्डस्वर्थ यांची ‘आय हॅव वॉच बटरफ्लाय’ आणि हेर्दर बर्न्स ‘कम माय बटरफ्लाय’ या इंग्रजी कवितांचे फलक या उद्यानात लावण्यात आले आहेत. त्याशिवाय फुलपाखरांसंबंधित उपयुक्त माहितीही येथे देण्यात आली आहे. फुलपाखराचे जीवनक्रम कसे असते, त्याचे पोषण, प्रजनन, जगात व भारतात फुलपाखरांच्या प्रजाती किती आहेत, जगातील सर्वात मोठे आणि सर्वात लहान फुलपाखरू कोणते आदी माहितीही या उद्यानात फलकाद्वारे लावण्यात आली आहे. या उद्यानाच्या मागे असलेल्या भिंतीवर विविधरंगी फुलपाखरांची, त्याशिवाय त्यांच्या जीवनक्रमासंबंधित चित्रे काढण्यात आलेली आहेत.
संदीप नलावडे
फुलपाखरू उद्यान
* कुठे : पेंढरकर महाविद्यालयासमोर, एमआयडीसी, डोंबिवली (पूर्व)
* कसे जाल? : डोंबिवली स्थानकापासून पेंढरकर महाविद्यालयाकडे केडीएमसीच्या बस, त्याशिवाय रिक्षानेही जाता येते.
* कल्याण स्थानकाजवळून नवी मुंबई, बेलापूरला जाणाऱ्या बस विको नाका येथे थांबतात. तेथून काही अंतरावरच उद्यान आहे.
* काय पाहाल? : विविधरंगी, आकर्षक फुलपाखरे, विविध प्रकारच्या वनस्पती, फुलपाखरासंबंधित कविता, उपयुक्त माहिती आणि चित्रे.
* वेळ : संध्याकाळी ४ ते ८