ठाणे – आगामी निवडणुकीसाठी ठाणे महापालिका प्रशासनाने नवीन प्रारुप प्रभाग रचना आराखडा जाहीर करून ४८ तास उलटत नाही, तोच राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे नेते, माजी नगरसेवक बाबाजी पाटील यांनी कार्यकर्त्यांसह शिंदेच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केला. बाबाजी पाटील यांच्या प्रभागाला दिवा परिसर जोडण्यात आल्याने हा प्रभाग शिंदेच्या शिवसेनेसाठी पोषक झाल्याची चर्चा सुरू झाली होती. असे असतानाच, बाबाजी पाटील यांच्या शिवसेना पक्ष प्रवेशामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या पक्ष प्रवेशांच्या निमित्ताने शिंदेच्या शिवसेनेने जितेंद्र आव्हाड यांना धक्का देत या भागात आपली ताकद वाढविल्याचे चित्र आहे.
दिवा परिसरातून शिवसेनेचे आठ नगरसेवक निवडूण आले होते. यानंतर, या भागाचे प्रतिनिधीत्व करणारे शिवसेनेचे शहरप्रमुख रमाकांत मढवी यांना पक्षाने उपमहापौर केले होते. हा परिसर शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. दिवा भागातील प्रभाग क्रमांक २७ मधून शिवसेनेचे शैलेश पाटील, अंकिता पाटील, दिपाली भगत आणि अमर पाटील तर, प्रभाग क्रमांक २८ मधून शिवसेनेचे दिपक जाधव, दर्शना म्हात्रे, सुनिता मुंडे, रमाकांत मढवी असे आठजण निवडून आले होते.
प्रभाग क्रमांक २७ मध्ये दिवा, साबे, सदगुरूनगर, बीआरनगर तर, प्रभाग क्रमांक २८ मध्ये आगासन, म्हातार्डी, बेतवडे, दातीवली, भोलेनाथ नगर, बेडेकरनगर, या भागांचा समावेश होता. तर, त्याशेजारील तीन सदस्य असलेल्या प्रभाग क्रमांक २९ मध्ये खर्डी, डावले, पडले, देसाई, खिडकाळी, डायघर, कौसा तलाव या भागांचा समावेश होता. या प्रभागातून राष्ट्रवादीचे बाबाजी पाटील, नादिरा सुरमे आणि सुलोचना पाटील, हे निवडणुक आले होते. यंदा या प्रभागात दिवा साबेचा काही भाग, सागर्ली, सोनखार, डोमखार हे भाग जोडण्यात आले आहेत. यामुळे नव्या रचनेत हा प्रभाग शिवसेनेसाठी पोषक ठरणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. असे असतानाच, नवीन प्रारुप प्रभाग रचना आराखडा जाहीर करून ४८ तास उलटत नाही, तोच राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे नेते, माजी नगरसेवक बाबाजी पाटील यांनी कार्यकर्त्यांसह शिंदेच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
बाबाजी पाटील कोण आहेत ?
ठाणे महापालिकेतील राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे माजी नगरसेवक बाबाजी पाटील यांनी यापुर्वी कल्याण लोकसभा निवडणुक लढविली आहे. कल्याण ग्रामीण भागात त्यांनी काम केले असून या भागात त्यांचे वर्चस्व राहिले आहे. ते ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष होते. सोमवारी बाबाजी पाटील, त्यांचे चिरंजीव आकाश पाटील, राजेश म्हात्रे, उदय पावशे, विनायक पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. ते राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षात होते. तरी त्यांचे जिल्ह्यातील इतर पक्षातील अनेक नेत्यांशी त्यांचे जिवाळ्याचे संबंध आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्यांच्यासोबत जिव्हाळ्याचे नाते असल्याचे पक्ष प्रवेशावेळी सांगितले.
शिवसेनेची ताकद वाढणार ?
प्रभाग क्रमांक २९ दिवा साबेचा काही भाग, सागर्ली, सोनखार, डोमखार हे भाग जोडण्यात आल्याने हा प्रभाग शिवसेनेसाठी पोषक ठरणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. तसेच बाबाजी पाटील हे सुद्धा शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा रंगली होती. शिवसेनेचे प्राबल्य असलेला दिवा परिसर जोडल्यामुळे तसेच बाबाजी पाटील यांच्या पक्ष प्रवेशामुळे येथे शिंदेच्या शिवसेनेची ताकद वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर, या प्रभागात राष्ट्रवादीला फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परंतु निवडुकी निकालानंतरच काय होणार, हे स्पष्ट होईल.
नगरसेवक संख्येत वाढ नाही
ठाणे महापालिकेची पंचवार्षिक मुदत ६ मार्च २०२२ रोजी संपुष्टात आली. तेव्हापासून ठाणे महापालिकेत प्रशासकीय राजवट लागू आहे. गेल्या तीन वर्षांपासून पालिकेच्या निवडणुका रखडलेल्या आहेत. असे असतानाच, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे राज्य शासनाच्या निर्देशानुसार ठाणे महापालिकेने प्रारुप प्रभाग रचना आराखडा तयार करून तो संकेतस्थळावर प्रसिद्ध केला आहे. २०११ च्या जणगणनेनुसार शहराची लोकसंख्या १८ लाख ४१ हजार ४८८ इतकी आहे. तर, २०१७ साली झालेल्या निवडणुकीत मतदारांची संख्या १३ लाख ९० हजार ९७३ इतकी होती. परंतु करोनामुळे यंदा जनगणना होऊ शकली नाही. त्यामुळे २०११ च्या जणगणनेनुसार प्रभाग रचना आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यामुळे नगरसेवक संख्येत वाढ झालेली नाही. गेल्या म्हणजेच २०१७ प्रमाणेच यंदाच्या निवडणुकीत चार सदस्यांचा एक प्रभाग याप्रमाणे प्रभाग रचना करण्यात आली असून यामुळे यंदाही ३३ प्रभागामधून १३१ नगरसेवक निवडले जाणार आहेत. या प्रारुप आराखड्यावर महानगरपालिकेने नागरिकांकडून हरकती व सूचना मागवल्या आहेत. हरकती व सूचना सादर करण्यासाठी ४ सप्टेंबरपर्यंत मुदत आहे.