बदलापूर : बदलापुर शहरात एटीएम मशीनमध्ये कमी रक्कम जमा करून उर्वरित पैसे स्वतःच्या फायद्यासाठी वापरल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. तब्बल दोन लाख चार हजार पाचशे रुपये इतक्या रकमेत अपहार झाल्याचे स्पष्ट झाले असून, या प्रकारामुळे एटीएम सेंटरच्या पैशांच्या सुरक्षेवर आणि विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.एटीएम परिसरात एटीएमची अदराबदल करून, तिथे एटीएमधारकाला गोंधळात टाकून पैसे काढून लंपास करण्याचे प्रकार गेल्या काही वर्षात समोर आले आहेत. मात्र एटीएममध्ये पैसे भरणाऱ्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून एटीएममध्ये भरणा करण्यासाठी असलेली रोकड मीशनमध्ये न भरता तीचा वापर खासगीत करण्याचा धक्कादायक प्रकार बदलापुरात समोर आला आहे. याप्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर ही बाब समोर आली आहे.
ही फसवणूक ५ एप्रिल २०२५ ते १२ मे २०२५ या कालावधीत घडली. हिताची कॅश मॅनेजमेंट सर्विस कंपनीकडून नेमण्यात आलेले दोन एटीएम ऑपरेटर अर्थात कस्टडीयन जय पाटील आणि भुषण कडू यांच्यावर याप्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कंपनीकडून त्यांना नियमितपणे बदलापूर पूर्व रेल्वे स्टेशन परिसरातील एटीएम सेंटरमध्ये रक्कम भरण्याचे काम सोपवले गेले होते. मात्र, दोघांनी मिळून एटीएम आयडी एमपीबी ०२५६७ व एटीएम आयडी एसपीबी०३१५१ या दोन मशीनमध्ये ठरल्यापेक्षा कमी पैसे भरले. उर्वरित रक्कम त्यांनी स्वतःजवळ ठेवत स्वतःच्या फायद्यासाठी वापरली. अशा प्रकारे एकूण २ लाख ०४ हजार ५०० रुपये कंपनीकडून लंपास केले गेले.
घटनेचा तपास सुरू असताना कंपनीच्या अंतर्गत हिशोब तपासणी दरम्यान हा आर्थिक गैरप्रकार समोर आला. त्यानंतर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तातडीने बदलापुर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. या गंभीर प्रकरणी दोन्ही आरोपींवर फसवणूक आणि अपहार यांसंबंधीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिस अधिक तपास करून अचूक रक्कम, आरोपींनी पैसे कुठे खर्च केले याचा शोध घेत आहेत. एटीएमसारख्या सुरक्षित व विश्वासार्ह मानल्या जाणाऱ्या यंत्रणेतच अशी फसवणूक झाल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे. कंपनीकडून देखील भविष्यात अशा प्रकारच्या घटनांना आळा घालण्यासाठी कठोर नियम व नियंत्रण यंत्रणा उभारण्याचे संकेत दिले आहेत.नागरिकांच्या नजरेत एटीएम ऑपरेटर व कॅश मॅनेजमेंट कंपन्यांची विश्वासार्हता टिकवून ठेवणे आता मोठे आव्हान ठरणार आहे. बदलापुरातील या घटनेमुळे अशा प्रकारच्या रोख व्यवहारांवर अधिक काटेकोर देखरेखीची गरज अधोरेखित झाली आहे.