बदलापूर: यंदाच्या वर्षात अवकाळी पावसाने मे महिना गाजवला. तर जून महिन्यातही चांगला पाऊस झाला. त्यामुळे जलस्त्रोतांमध्ये पाणीसाठा वाढलेला आहे. ठाणे जिल्ह्याची तहान भागवणारे बारवी धरण जून महिन्यातच निम्मे भरले आहे. गेल्या वर्षात बारवी धरणात अवघा २५ टक्के पाणीसाठा होता. मे महिन्यात पडलेल्या पावसामुळे बाष्पीभवन कमी झाले आणि जलस्रोतात पाण्याची भर पडली. त्यामुळे धरण निम्मे भरले आहे.

यंदाच्या वर्षात पावसाने ऐन उन्हाळ्यात बरसण्यास सुरुवात केली. मे महिन्याच्या पूर्वर्धात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. तर उत्तरार्धातही मोसमी पावसाच्या आगमन लवकर झाले. परिणामी ठाणे जिल्ह्यात मे महिन्यात विक्रमी पावसाची नोंद झाली. उल्हास नदीमुळे बदलापूर शहरात पूरस्थिती निर्माण झाली होती. एरवी २६ जुलैच्या आसपास जी स्थिती असते ती स्थिती २६ मे रोजीच उद्भवली. त्यामुळे सर्वच व्यवस्थापनांचे नियोजन बिघडले.

लवकर आलेल्या या मोसमी पावसामुळे जल चिंता मात्र मिटली. मे महिना हा सर्वाधिक उष्णतेचा महिना असतो. या काळात बाष्पीभवन वेगाने होते. तर पाण्याची मागणी ही याच काळात वाढलेली असते. यंदाचा मे महिना मात्र याला अपवाद ठरला. मे महिन्यातही जलस्त्रोतांमध्ये भर पडत होती. जून महिन्यातही पावसाने बरसण्याची परंपरा कायम राखली. त्यामुळे जलस्रोतांचे साठे झपाट्याने वाढले आहेत. ठाणे जिल्ह्याची तहान भागवणारे बारवी धरण जून महिन्यातच निम्मे भरले आहे. मंगळवारी बारवी धरणात ४९.४८ टक्के इतका पाणी साठा होता. बारवी धरणाची एकूण उंची ७२.६० मीटर इतकी आहे. मंगळवारी धरणाने ६४.९१ मीटर उंची गाठली होती. या महिन्यात बारवी धरण क्षेत्रात ९९९ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्याची पाण्याची चिंता जवळपास मिटली आहे.

विशेष म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा बारवी धरणात दुप्पट पाणीसाठा आहे. गेल्या वर्षात २४ जून रोजी बारवी धरणात २५.३६ टक्के पाणी साठा होता. तर धरण ५८.७५ मीटर उंचीवर भरले होते. त्यामुळे गेल्या वर्षाच्या तुलनेत समाधानकारक पाऊस झाल्याने पाण्याचे संकट टळले आहे.